Guru Pornima : सद्‍गुरू; एकच तारणहार

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक, गुरू किंवा सद्‍गुरूंचे स्थान अटळ असते. त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.
Guru Pornima
Guru PornimaSakal
Summary

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक, गुरू किंवा सद्‍गुरूंचे स्थान अटळ असते. त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.

शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌।... अर्जुनाने श्रीकृष्णांना जेव्हा ‘मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलेलो आहे, मला उपदेश करा’ अशी विनवणी केली, त्यातून श्रीमद्भगवद्गीतारूपी ज्ञानामृत साकार झाले. शिष्याने शरण येणे आणि सद्‍गुरूंनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करणे हा जीवनातला परमोच्च क्षण. या क्षणाची पुनःपुन्हा अनुभूती घेण्याचा दिवस म्हणजे आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस.

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षक, गुरू किंवा सद्‍गुरूंचे स्थान अटळ असते. त्यांच्याशिवाय जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. एवढेच नव्हे, तर यांच्याशिवाय जीवन पुढे जाणारच नाही. लहान मुलाला प्रथम बोट धरून चालण्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजे गुरू. शाळेत शिक्षक बनून वेगवेगळे विषय समजावून देणारी शक्ती म्हणजे गुरू. एखादी कला किंवा एकूणच आत्मसात करावा लागणारा अभ्यास करवून घेणारी शक्ती म्हणजे गुरू. परंतु याच्याही पलीकडे जाऊन आत्मज्ञान करून देणारी, समाधान व शांतीचा अनुभव देणारी शक्ती म्हणजे सद्‍गुरू. कर्मबंधनातून मुक्ती देणारी शक्ती म्हणजे सद्‍गुरू. ‘स्व’चा परमानंदात लय करणारी शक्ती म्हणजे सद्‍गुरू. अशा या सद्‍गुरूंना समर्पित होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा!

षट्चक्रांपैकी आज्ञाचक्राची देवता म्हणजे सद्‍गुरू. मायेच्या आवरणापलीकडे असणाऱ्या ब्रह्माला जाणायचे असेल, अज्ञानरूपी अंधाराचा कायमस्वरूपी नाश करणारी आंतरज्योती अनुभवायची असेल, तर त्यासाठी आज्ञाचक्र जागृत होणे गरजेचे असते. आणि या आज्ञाचक्राला सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे सद्‍गुरूंच्या पायावर डोके ठेवणे. ज्यांची आज्ञा पाळायची त्या सद्‍गुरूंचे मूळ स्थान येथेच असते. अर्थात, ‘गुरूंच्या पायावर डोके ठेवणे’ या नुसत्या भौतिक कृतीपुरती ही संकल्पना मर्यादित नाही. तर, प्रवृत्ती बदलण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. दुसऱ्याचे काहीही न ऐकण्याची वाईट सवय घालवणे, कुठलाही आक्षेप न घेता ऐकण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ‘गुर्वाज्ञा’ हा शब्दप्रयोग केला जातो. अर्थात, सद्‍गुरूच परमतत्त्व परमात्म्याचे स्वरूप असल्यामुळे सद्‍गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक मनुष्य ईशमय परमतत्त्वात विलीन होऊ शकतो. आत असलेले सत्य, जाणीव आणि चैतन्य सोपेपणाने जाणता यावे यासाठीच सद्‍गुरूरूपाने बाहेर प्रकट झालेले आहे, असे समजून सद्‍गुरूंसमोर नतमस्तक होणे गरजेचे. केवळ ‘मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी आपला शिष्य आहे, तुम्ही माझे गुरू आहात,’ अशी शाब्दिक बडबड म्हणजे सद्‍गुरूंना शरण जाणे नाही, तर सद्‍गुरूंना शरण जाणे ही एक प्रवृत्ती आहे. परमात्मा सर्व चराचरांत व अणुरेणूत व्यापलेला आहे आणि सद्‍गुरू हे परमात्म्याचेच स्वरूप आहे, तेव्हा अणुरेणूत वसलेल्या परमात्म्याला शरण जाणे, सर्वांभूती परमेश्र्वर वसलेला असल्यामुळे सर्वांचाच आदर करणे, मानसन्मान करणे, सर्वांना समजून घेणे, म्हणजेच शरणागत प्रवृत्ती, हेच ते सद्‍गुरूंच्या चरणावर डोके ठेवायचे रूपक.

उपासना भौतिकता आणि शक्तीची

गुरू के चरण की रज लेके दो नैनन के बीच अंजन किया ।

तिमिर मेटि उजियार हुआ, निरंकार पिया को देख लिया ॥

असे संतांनी सांगून ठेवलेले आहे. आयुर्वेदात ज्योतीने प्रकाश दिल्यावर शिल्लक राहिलेल्या काजळीवर संस्कार करून अंजन बनवले जाते, ज्याचा भौतिक डोळ्यासाठी अप्रतिम फायदा होताना दिसतो, मात्र तृतीय नेत्रासाठी वापरायचे काजळ म्हणजे गुरुचरणरज. सद्‍गुरूंच्या चरणरजामध्ये जन्मोजन्मीचा अंधकार मिटवून टाकण्याचे सामर्थ्य आहे. सद्‍गुरू त्यांचे आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी वापरत असतात, ठिकठिकाणी भ्रमण करून भक्तांवर अनुकंपा दाखवून कृपा करत असतात, म्हणून सद्‍गुरूंच्या चरणरजाला महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत सद्‍गुरू नसते तर ती कधीच लयाला गेली असती. आपण भारतीय पौर्वात्य आहोत, आपण प्रकाशाची उपासना करणारे आहोत. प्रकाशाची उपासना म्हणजे शक्तीची उपासना. ‘पाश्चिमात्य’ हे संबोधन देशाचे नसून प्रवृत्तीचे आहे. भौतिकता काही मर्यादेपर्यंत आवश्‍यक आहे, पण भौतिकतेमागे धावत राहणे आणि असे धावताना यापाठीमागे असलेल्या शक्तीला विसरणे योग्य नाही. व्यक्तीच्या आत शक्ती नसली तर व्यक्तीचा काय उपयोग? तेव्हा भौतिकता व शक्ती दोन्हींची उपासना महत्त्वाची आहे. अनेकांना असे वाटते, गुरू, मोक्ष वगैरे आम्हाला काहीही नको. आम्हाला दोन वेळची भाजी-भाकरी मिळाली, डोक्यावर छत असले तर मुलाबाळांसह आम्ही शांतीने राहू. मात्र प्रत्यक्षात असे दिसते की संसार-मुले-बाळे-घर-दार हा खेळ खेळताना मनःशांती कुठे जाते

याचा पत्ता लागत नाही. सुख हाती आले असा क्षणासाठी भास होतो, पण दुसऱ्या क्षणी रिकामेपणाची जाणीव होते. सद्‍गुरू हे एकच असे असतात जे व्यक्तिगत उत्कर्ष होण्यासाठी व व्यक्तिगत मोक्षप्राप्तीसाठीही मार्गदर्शन करू शकतात. मोक्ष म्हणजे एखादे हिल स्टेशनसारखे ठिकाण आहे, असे नाही. स्वर्गात भगवान बसलेले असतात, त्यांच्यासमोर अप्सरा नृत्य करत असतात असा आपला समज करून दिलेला असतो, मात्र हे सर्व शरीरातील चेतासंस्था व चलनवलनाचे दृष्टान्त आहेत, या सर्व रूपकात्मक गोष्टी आहेत. स्वर्गात शरीरभाव नसतो, तेव्हा अप्सरा वगैरे कोठून येणार? तेथे जडत्वच नसते, तर शरीराने घेतलेले सुख कोठून असणार? मोक्षाच्या ठिकाणी आपल्या मागण्या भौतिकतेच्या पार होतात. तेथे आपल्याला कशाचीच अपेक्षा नसते, कसल्याच मागण्या नसतात. हेच वैराग्य. खरे सद्‍गुरू संस्कृतीचे रक्षण करतात. ते आपल्याला धर्म (कर्तव्य), यश (हातात घेतलेले काम शेवटाला नेणे), श्री (आभा), ज्ञान (ब्रह्म सत्य जगन्मिथ्या हे खरे ज्ञान), वैराग्य (आपल्याजवळ असलेले इतरांना वाटून टाकणे), ऐश्र्वर्य (कार्य करायला आवश्‍यक असलेल्या गोष्टी जवळ असणे) या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन करतात.

सद्‍गुरूंना काहीही नको असते, ते तर या विश्र्वाचे मालक आहेत. त्यांना देण्यासारखे शिष्याकडे काहीही नसते. सद्‍गुरूंना आपण फक्त आपल्या हृदयात स्थान देऊ शकतो, त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करू शकतो, त्यांना समर्पित होऊन ज्ञानाचा व शांतीचा अनुभव घेऊ शकतो.

गुरूवीण नाही दुजा आधार...

योग्य टप्प्यावर गुरूची भेट झाल्यास आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळते. गुरूचा कोणत्या स्वरूपात साक्षात्कार होईल, हे सांगता येत नाही, त्याची अनुभूतीच घ्यावी लागते. तुम्ही आपल्या आयुष्यात कोणाला गुरू मानता आणि त्यांच्याबद्दलचा आपला अनुभव काय आहे, हे आम्हाला editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

(श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनसंग्रहातून संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com