अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

श्रीगुरु दत्तजयंती आज आहे. श्रीदत्तमहाराज हे गुरुंचे गुरु. गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, आदिगुरु या साखळीतील आदिगुरु आहेत श्रीदत्त भगवान.
shri datta jayanti
shri datta jayantisakal

श्रीगुरु दत्तजयंती आज आहे. श्रीदत्तमहाराज हे गुरुंचे गुरु. गुरु, सद्गुरु, परात्पर गुरु, आदिगुरु या साखळीतील आदिगुरु आहेत श्रीदत्त भगवान.

गुरु, सद्गुरु आणि दत्तगुरुंची आवश्‍यकता काय आहे, हे आपल्याला प्रथम समजून घ्यायला हवे. सृष्टीत सर्वप्रथम आले ब्रह्मा, विष्णू व महेश. श्रीब्रह्माजींनी सृष्टी निर्माण केली. या सर्वांचे दैनंदिन व्यवहार पाहण्याचे अधिकार श्रीविष्णूंवर सोपवण्यात आले. या सृष्टीतील कुठल्याही वस्तूचा, व्यक्तीचा नाश झाल्यावर परत त्यांना सृष्टीत आणण्याची जबाबदारी शिवजींकडे देण्यात आली. हे तिन्ही देव आपापले कार्य करू लागले.

ब्रह्माजींची सरस्वती, विष्णूंची लक्ष्मी व शिवजींची पार्वती या यांच्या शक्ती. एकदा सरस्वती, लक्ष्मी व पार्वती या तिघी देवतांना जाणवले की आपल्या आपल्या तिघींच्या अधिकारापेक्षा अधिक अधिकार असलेली अनसूया नावाची अत्री ऋषींची पत्नी आहे, ती मोठी पतिव्रता आहे.

अनसूयेच्या ठिकाणी कोठल्याही प्रकारचा भेदाभेद नव्हता, तिच्या ठायी द्वेष नव्हता, तिची ताकद मोठी होती. तिघींच्या मनात द्वेष उत्पन्न झाला. तिघींना वाटले अनसूयेची परीक्षा घ्यावी. तिन्ही देवींनी आपल्या पतींना अनसूयेची परीक्षा घेण्यास, तिच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यास, तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यास सांगितले. तिन्ही देवांनी संन्यासाचा वेष घेतला आणि साधू बनून अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. कुटीत अनसूया एकटीच होती.

साधूंनी आवाज दिला ‘भिक्षां देही’. अनसूयेने कुटीत जाऊन काही पदार्थ आणले व त्यांना देऊ केले. साधू म्हणाले, ‘‘आम्हाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढण्यात यावी, तरच आम्ही भिक्षा ग्रहण करू.’ अनसूया विचारात पडली. साधू म्हणाले, ‘‘मग आम्हाला भिक्षा नको, आम्ही चाललो.’

आपल्या घरातून अतिथी विन्मुख जाणे तिला रुचले नाही. तिने काही विचार केला व म्हणाली, ‘अंमळ बसा’. तिघे खाली बसले. तिने कमंडलूतील पाणी हातात घेतले, अभिमंत्रित केले व तिन्ही साधूंवर छाटले. तिन्ही साधू तीन नवजात बालकांत रूपांतरित झाले. नंतर अनसूयेने विवस्त्रावस्थेत त्यांना दुग्धपान करवले. इकडे ब्रह्मा, विष्णू, महेश आपापल्या घरी न परतल्यामुळे सरस्वती, लक्ष्मी, पार्वती चिंतेत पडल्या, पतींच्या शोधात तिघी अनसूयेच्या कुटीत आल्या.

तेथे तीन बाळे खेळत होती. अनसूया म्हणाली, ‘आपला पती निवडा व घेऊन जा.’ असूयेमुळे काय होते हे तिन्ही देवींच्या लक्षात आले. नंतर या तिघांच्या अंशातून एक बाळ तयार झाले व हेच श्रीगुरु दत्तात्रेय. आपल्याला बंधनमुक्त करणे हे श्रीदत्तात्रेयांचे कार्य. बंधने कसली, तर बंधने अज्ञानाची, मायेची, रागाची, लोभाची, असूयेची, राग-द्वेषादिकांची. आपण या सर्व बंधनांमध्ये जखडलेले आहोत. ही बंधने सोडवली, की मग आनंदी आनंद गडे.

गुरुकृपेने हा आनंद आपल्याला मिळू शकतो. ही गुरुकृपा अखंड चालू राहावी, यासाठी श्रीदत्तात्रेय प्रभू आहेत. ते आहेत म्हणून आज धीर आहे. अवतार येतात, एखादे कार्य करतात आणि निघून जातात. आपल्याला सर्व बंधनातून मुक्त व्हायला हवे, नुसता खूप पैसा असून उपयोगाचे नाही, आनंद पाहिजे. यासाठी कृपा द्यायला सद्गुरूच समर्थ आहेत. आपले मन असूया, तुलनेत गुंतलेले असते.

आपल्याला जे काही मिळालेले आहे त्यात आपण कधी समाधानी नसतो. यामुळेच आपण या जन्मातून त्या जन्मात असे गटांगळ्या खात राहतो. तुलना करत न राहता, मनात असूया न बाळगता विवेकाचा अंकुश लावता आला पाहिजे. विवेक कसा करावा? तर ज्ञानाने विवेक होऊ शकतो. ज्ञानप्राप्ती होऊन विवेकाचे आचरण होण्यासाठी आवश्‍यकता आहे.

सद्गुरुंची. विवेक काय आहे हे समजून देणारे, जगात आपल्या कल्याणाचे काय आहे हे समजावून सांगणारे ते सद्गुरु भगवान दत्तात्रेय हे सगळ्या सद्गुरुंचे मूळ स्थान असलेले परम सद्गुरु. श्रीदत्तात्रेयांचा अंश घेऊनच सद्गुरु पृथ्वीलोकावर येतात व मनुष्यामात्राला मार्गदर्शन करतात.

आपल्यातील विवेक जागवण्यासाठी, आपल्या अंतरात्म्याला जागृत करण्यासाठी, आपला अंतर्नाद ऐकू यावा व आपल्याला भगवंतांचे मार्गदर्शन आतून मार्गदर्शन मिळावे यासाठी सद्गुरु मार्गदर्शन करतात. बाहेरच्या चमक-दमक असलेल्या वस्तूंकडे इंद्रिये आकर्षित होऊन आपल्याला ज्ञान होण्याऐवजी आत असलेल्या आत्म्याने केलेल्या मार्गदर्शनाकडे लक्ष कसे द्यावे यासाठी सद्गुरु मदत करतात.

सध्याच्या युगात सर्वांना माहीत असलेले व श्रीदत्तात्रेयांचे कार्य पुढे नेणारे म्हणून १४ व्या शतकातील श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती. श्री नरसिंह सरस्वतीच पुन्हा प्रकट झाले अशा स्वरूपातील श्री स्वामी समर्थ, श्री एकनाथ महाराज. अगदी अलीकडच्या काळात अवतार घेतलेले श्री टेंबेस्वामी अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती, शिरडीचे श्री साईबाबा, नारेश्र्वरचे श्री रंग अवधूत असे अनेक अवतारी पुरुष दिसतात.

प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका भजनात म्हटले आहे, तापत्रयाने मम देह तापला, विश्रांती कोणी न च देतसे मला. आज आपणा सर्वांना मानसिक तणाव दूर करण्याची आवश्‍यकता आहे व यासाठी विवेक व ज्ञान यांची आवश्‍यकता आहे. विमानांचा वेग किती असतो, इंटरनेट कसे वापरावे वगैरे माहिती म्हणजे ज्ञान नव्हे.

या सगळ्यांमुळे आपल्या इच्छा जागृत होतात व आपण त्यात अडकतो. शांत होण्यासाठी काय करावे हे खरे ज्ञान. शांत होण्यासाठी प्रयोजन समोर दिसत नाही म्हणून गुरुंची आवश्‍यकता आपल्याला आहे हे आपल्या लक्षात येत नाही.

आपल्याला शांत करण्यासाठी गुरुंची आवश्‍यकता असते. गुरु असले तरच ब्रह्मविद्या मिळू शकते. ब्रह्म म्हणजे आपला मेंदू. आपण शांत असलो तर मेंदूची स्मृतीव्यवस्था, विचार करण्याची व्यवस्था, निर्णयक्षमता सुधारते. असे झाले तर आपण आपल्या अंतरात्म्याला पाहू शकतो, भगवंतांना भेटू शकतो. हीच सोमविद्या.

सोमसाधनेमुळे समृद्धी, आरोग्य, आत्मसमाधान व तेजस्विता या चार गोष्टींची पूर्ती होते. शारीरिक भावाची निवृत्ती होण्यासाठी गुरुंची आवश्यकता असते. गुरु म्हणजेच दत्त. ‘दत्त’ या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो, ‘दिलेला’. तेव्हा दत्तात्रेय, सर्व गुरु कायम देत असतात.

श्रीकृष्णांनी म्हटलेले आहे, आवश्‍यकतेनुसार मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन, ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’.

यातील युगे युगे याचा अर्थ कायम. म्हणजे एकही क्षण असा नाही की ज्या क्षणी पृथ्वीवर दत्त भगवान नाहीत. दत्तात्रेय स्मर्तृगामी आहेत, म्हणजे स्मरण करताच ते मदतीला येतात. आपल्या गुरुंमध्ये दत्तात्रेयांना पाहावे. दत्तात्रेयांकडून, गुरुंकडून आपल्याला आत्मविद्येचे मार्गदर्शन मिळते. ज्ञान, ब्रह्मविद्या सद्गुरूंच्या कृपेनेच मिळू शकते.

श्रीदत्तात्रेयांचे ज्या दिवशी विश्र्वाला भान झाले तो त्यांचा जन्मदिवस म्हणजे श्रीदत्तात्रेयजयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली तेव्हा अत्री ऋषी आणि अनसूया यांच्या घरात श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाल्याचा हा दिवस. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्‌गुरुंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल यादृष्टीने उपासना करायचा हा दिवस. आज श्रीदत्तजयंतीनिमित्त आपणांवर सद्गुरूंची-श्रीदत्तात्रेयांचू कृपा व्हावी, ब्रह्मविद्येची उकल व्हावी, आत्मविद्येचे मार्गदर्शन व्हावे, अशी प्रार्थना करू या.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यान, निरुपणांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com