विजयादशमी : एक सुवर्णमुहूर्त

विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, खरे पाहता हा सुवर्णमुहूर्ताचा दिवस.
vijayadashami dasara festival
vijayadashami dasara festivalsakal

गणेशोत्सवात केलेल्या गणेशोपासनेतून भौतिकातील दोष दूर केल्यानंतर, महालयातील पंधरा दिवसांच्या उपासनेतून गुणसूत्रांतील दोष, पूर्वजांच्या प्रकृतीमुळे येणारे दोष, वातावरणातील दोष दूर केल्यानंतर येतो तनाला व मनाला शक्ती देणारा नवरात्र महोत्सव. नवरात्रातील या शक्तिउपासनेनंतर येते विजयादशमी. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, खरे पाहता हा सुवर्णमुहूर्ताचा दिवस.

नवरात्रीचे नऊ दिवस २४ तास दीप प्रज्वलित ठेवणे, हवन करणे, निसर्गाची मदत व्हावी यासाठी देवीला प्रिय असणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींची पाने, फुले देवीला वाहणे, अन्नदान करणे, कुमारी पूजन, गरबा किंवा भोंडला खेळताना अनेकांनी एकत्र जमून स्वतःभोवती आणि वर्तुळात घडाळ्याच्या दिशेने वा घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने गोल गोल फिरत नृत्य करणे असे सर्व नवरात्रीच्या काळात केले जाते.

यावेळी शक्तीला आकृष्ट करून त्या शक्तीचे आवर्तिकी उत्थापन व्हावे या हेतूने नृत्याच्या मध्यभागी दीप ठेवला जातो. नवरात्रातील या शक्तिउपासनेनंतर येते विजयादशमी. हा दिवस दसरा म्हणूनही ओळखला जातो. शक्तिउपासनेनंतर हृदय उन्मीलन होण्यासाठी आणि सर्वांमध्ये समत्वभावाचा अनुभव घेण्यासाठी सर्वांना शक्ती वाटावी, या हेतूने दशमीला दसरा साजरा केला जातो.

विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, खरे पाहता हा सुवर्णमुहूर्ताचा दिवस. या सगळ्यांमुळे शरीरातील दोष गेले, अहंकाराचा नाश झाला आणि नित्यानंद-परमानंदाचा अनुभव मिळाला की, या उत्सवाचे सार्थक होते.

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांचे श्र्लोक आहेत, ज्यात भगवंतांनी शत्रूंना मारण्याचा सल्ला दिलेला आहे.

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते। सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥२-६२॥

क्रोधात्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्‍यति॥ २-६३।।

याची सांगड आयुर्वेदाशी घातली तर आपल्याला म्हणता येईल ते असे - काम (पित्त), क्रोध (पित्त-वात), लोभ (कफ), मोह (वात-कफ), मद (कफ-पित्त), मत्सर (वात), इच्छांमध्ये भरकटणारे मन, त्रिदोषज अहंकार, चित्तातील संशय आणि चुकीचे निर्णय घेणारी बुद्धी (दुर्बुद्धी) हे माणसाचे दहा शत्रू होत. या दहा शत्रूंना मारल्याशिवाय मनुष्य मुक्त होणार नाही व त्याला आत्मारामही भेटणार नाही.

या सर्वांमध्ये अति त्रास देणारे आहेत शरीरातील पित्त व वातदोष. पित्त व वातदोषांपायीच मनुष्याला एका बाजूने ऊर्मी, प्रेरणा, शक्ती मिळत असली तरी दुसऱ्या बाजूने अहंकार तयार होतो. शरद ऋतूत शरीरात पित्ताचा प्रकोप झाला की, शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात. म्हणून आयुर्वेद शास्त्राने पित्ताला शांत करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय सुचविले असून त्यातला महत्त्वाचा उपाय म्हणजे शरीरातील दूषित झालेले पित्त विरेचनाद्वारा बाहेर काढणे.

त्याला मदत करणारे वात-कफादी दोषही योग्य उपचारांनी बाहेर काढणे. शरीर, मन आणि आत्मा या सर्व पातळ्यांवर असलेले आरोग्य म्हणजेच पूर्ण आरोग्य. असे झाल्यासच आत्म्याची प्रसन्नता म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता मिळते आणि समाधान व शांती लाभते.

वर उल्लेखलेल्या दहा शत्रूंना मारून आत्मारामाला विजयी करून, स्वतःच्या आयुष्याचे सोने करून घेऊन इतरांना त्या सोन्याचा प्रसाद वाटणे यातून झाली दसऱ्याच्या उत्सवाची सुरुवात. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचे छोटे पान वाटण्याची पूर्वापार पद्धत. सोने वाटण्याच्या परंपरेत सोन्यापेक्षा प्रेमाच्या नात्याचे संबंध अधिक महत्त्वाचे असतात, हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

म्हणजे या परंपरेत सुवर्णरस वाटला जात नसून प्रेमरसच वाटला जातो. आज सुवर्णाचे महत्त्व सर्व जगाला पटलेले आहे. शरीराची प्रतिकारशक्ती भरपूर असावी, कांती तेजःपुंज असावी, शरीर उत्तम असावे, हृदय-मेंदू यांनी उत्तम तऱ्हेने काम करावे असे ज्यांना वाटत असेल त्यांना काही प्रमाणात सुवर्ण आहारात ठेवण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. सुवर्ण हा असा धातू आहे की, जो कच्च्या स्वरूपात म्हणजे सुवर्ण वर्ख या स्वरूपात सेवन करता येतो.

सीमोल्लंघनाची खूण

सोन्याऐवजी आपटा-कांचनारच्या झाडाची पाने वाटण्याचीही पद्धत आहे. त्वचेवर येणारे वात-पित्तादी दोष दूर करण्याचा गुण शमी व कांचनार-आपटा या दोन्ही वृक्षांमध्ये दिसून येतो. म्हणून ही आपट्याची पाने सोन्याची आठवण म्हणून व सीमोल्लंघन झाल्याची खूण म्हणून वाटली जातात. या वृक्षांच्या पानांचा काढा स्नानाच्या पाण्यात टाकून स्नान केले जाते, जेणेकरून त्वचेमार्फत प्रकट होऊ पाहणाऱ्या पित्ताला अटकाव होऊ शकेल.

नवरात्रातील नऊ दिवसात केलेल्या शक्तिउपासनेचे फळ, जगदंबा आदिशक्तीने दिलेली कृपा सर्वांना वाटायची तसेच ज्या गोष्टी त्रास देणाऱ्या व अकल्याणाच्या असतील त्यांना नष्ट करण्याचा मार्ग शोधून जुन्या शस्त्रांना परजून विघ्नांचा नाश करायचा असा हा विजयादशमीचा दिवस. दसऱ्याच्या दिवशी नवीन शिक्षणाची सुरुवात केली जाते, लहान मुलांच्या पाटीवर सरस्वती रेखाटून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला जातो.

या दिवशी स्वतःच्या उपजीविकेच्या साधनांची, यंत्रांची, शस्त्रांची आणि आपण वापरत असलेल्या अवजारांची पूजा केली जाते. जेणेकरून व्यवसाय हा देवत्वाशी जोडलेला आहे, हे लक्षात येऊ शकते. नैतिक अधिष्ठान ठेवूनच उपजीविका मिळवली व त्या पैशातून उदरनिर्वाह केला तरच अन्न अंगी लागते व जीवन समाधानी होते.

तेव्हा श्रमप्रतिष्ठा म्हणून आपल्या कामाच्या ठिकाणी यंत्रसामग्री, हत्यारे, अवजारे यांचे पूजन करून आपल्या कामाला देव समजून विजयादशमीचा दिवस साजरा केला जातो.

मूळ हेतू लक्षात ठेवून हा उत्सव साजरा करायचा असेल तर भारतीय परंपरा प्रेमाने जोपासून ‘एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही शपथ घेण्याचा हा विजयादशमीचा-दसऱ्याचा दिवस.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे लिखित, संतुलन आयुर्वेद द्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com