विठू माऊली तू माऊली जगाची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadhi Ekadashi 2022 Waluj Pandharpur wari

Ashadhi Ekadashi 2022 विठू माऊली तू माऊली जगाची...

वाळूज : छोट्या पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध ठिकाणच्या दिंड्या येथे दाखल झाल्या झाल्या आहेत. भजन-कीर्तन, नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला आहे. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तर पोलिस प्रशासनानेही सुमारे आठशे पोलिसांचा ताफा संरक्षणासाठी ठेवल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

मंदिरात शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक, पूजा व महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यंदा, लाखो भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर श्री. विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या विश्वस्त मंडळाने भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून रांगा लावण्यासाठी लोखंडी संरक्षण कठडे उभारण्यात आले आहे. अनेक भाविक दिंड्यांमधून दाखल होतात, त्यांच्यासाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. तर यावेळी २५० वर पायी दिंड्यांमधून भाविक येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार यांनी सांगितले.

परिसराला छावणीचे स्वरूप

यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने मोठी संरक्षण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यात दीडशेंवर अधिकारी व साडेआठशेंवर पोलिस कर्मचारी आहेत. मंदिर परिसरासह ए.एस.क्लब ते वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार चौकादरम्यान ही पोलिस संरक्षण यंत्रणा लावण्यात आली आहे. यात वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी वेगळे आहेत. मुख्य महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून शनिवारी रात्री नऊ वाजेपासून ओअॅसिस चौक ते कामगार चौकादरम्यानची वाहतूक औद्योगिक वसाहत मार्गाने वळविण्यात आली आहे. त्याचबरोबर नगरकडून येणारी वाहने ही बजाज ऑटो कंपनीसमोरून वाल्मी मार्गाने शहराकडे सोडली जात आहेत.

तर मुख्य महामार्गावर कुठलेही पूजेच्या साहित्यांची अथवा खेळणी विक्रीची दुकाने थाटण्यास मनाई आहे. महिला भाविकांनी सोबत किमती वस्तू आणणे टाळावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी केले. मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्यावतीने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर उजळून निघाले आहे. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार, सचिव अप्पासाहेब पाटील झळके, कोषाध्यक्ष रत्नाकर पाटील शिंदे, विश्वस्त हरिभाऊ शेळके, कृष्णा झळके, हरीश साबळे, बंकटलाल जैस्वाल आदी पुढाकार घेत आहेत.

Web Title: Ashadhi Ekadashi 2022 Waluj Pandharpur Wari Bhajan Kirtan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top