स्त्री शक्तीचा जागर...!

स्त्री शिवाय जीवनाचा कोणताही अविष्कार होणे अशक्य आहे
adimaya
adimayasakal

नवरात्रामागे धार्मिक कारणांबरोबरच स्त्री शक्ती जागराचा उत्सव म्हणूनही पाहिले जाते. यातील धार्मिक कार्यक्रमाला असलेल्या अधिष्ठानामागे भक्कम असा शक्तिपूजनाचा संस्कार जोडलेला आहे. वेगवेगळ्या रूपांतील देवीचे पूजन करताना शक्तीचा, मातृत्वाचा गौरव करणे हा भाव दडलेला आहे.

- सुनीला सोवनी

(स्त्रीविषयक प्रश्नांच्या अभ्यासक)

‘मी रुद्र, वसु, आदित्य. विश्वदेव यांच्या समवेत त्रिभुवनात संचार करते. मी देवांना धारण करते. देवांना संतुष्ट ठेवणाऱ्या यजमानासाठी मी द्रव्य बाळगते. मी ज्ञान प्राप्त करून देणारी अधिष्ठात्री जगत्‌स्वामिनी आहे. अशाप्रकारे मी विविध रूपांनी नटलेल्या आणि भूतमात्रात जीवरूपाने राहणाऱ्या मला देव सर्व प्रकाराने भजतात. जो अन्न खातो, पाहतो, बोललेले ऐकतो... तो हे सर्व माझ्यामुळेच करतो. मला न जाणणारे ज्ञानास पारखे होतात. ज्याच्याविषयी मला इच्छा होईल, त्यास मी प्रगल्भ, ब्रह्मज्ञानी, त्रिकालदर्शी व उत्कृष्ट बुद्धिमान करते. मी त्या ईश्वराच्या मस्तकावर असलेल्या आकाशाची निर्मिती करते, अथांग सागर हे माझे उत्पत्तिस्थान आहे. मी अखिल विश्वास व्यापून स्वर्गासही स्पर्श करते. समस्त विश्वाची निर्मिती करणारी मी वायूप्रमाणे संचार करते. माझे माहात्म्य स्वर्गापेक्षा व या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे....’ ऋग्वेदामधील देविसूक्तात वाकभ्रूणीचे हे उद्‍गार आलेले आहेत. (दशम मंडल-१२५ वे सूक्त)

सृष्टीनिर्मितीला कारण होणाऱ्या, समस्त सृष्टीचे संचालन करणाऱ्या, जिच्याशिवाय जगाचा व जीवनाचा कुठलाही आविष्कार होणे केवळ अशक्य आहे, अशा चित्तशक्तीची, जगन्मातेची, मूळ शक्तीची ओळख वाकभ्रूणी आपल्याला करून देते. स्त्रीत्वाचे हे सूक्ष्मांतील सूक्ष्म, विराटाहून विराट, अमोघ, अजस्र, रूप सृष्टिचक्राचे अस्तित्वच सर्वस्वी तिच्याच हातात आहे, हे अगदी ठासून सांगते.

सकल ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली ही आदिमाय असंख्य रूपे, गंध, रस, ध्वनी, आकार, रंग यांच्याद्वारे आविष्कृत होत राहते. पंचमहाभूतात्मक सृष्टीच्या निर्मिती वैभवाने दिपून गेलेल्या मानवाने जगत्कारणाचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने निर्माणाचे, संचालनाचे व संहाराचेही सारे श्रेय स्त्री तत्त्वाकडे देऊन टाकले! जगन्माता - विश्वजननी विषयीच्या या उदात्त कल्पनेमुळे माता ‘पृथ्वि: पुत्रो: अहम पृथिव्याम।’ ही वैश्विक बंधुतेची, सर्व मंगलतेची भावना स्फुरली. ‘सर्वेऽपि सुखिन:सन्तु सर्वे सन्तु निरामय:’ हे भव्य दिव्य ध्येय प्राप्त करणे हे मनुष्याच्या जगण्याचे कारण बनले!

शक्तिपूजन

भारतीय संस्कृतीची अनेकविध वैशिष्ट्ये आहेत, त्यात बाकी जगातून पूर्णपणे हद्दपार झालेले शक्तिपूजन हे प्रमुख आहे. शक्ती म्हणजे ईश्वराची आनंदस्वरूप पूर्णावस्था असल्याचे प्रतिपादन विद्वानांकडून केले जाते. महानशक्ती पूजक योगी अरविंद म्हणतात ‘आदिशक्तीची तीन रूपे आहेत. पहिले रूप म्हणजे दृश्य जगताच्या पलीकडील महान शक्ती; ज्यामुळे जगत व परमेश्वर यांना जोडणारा दुवा निर्माण होतो. तिच्यामुळेच दृश्यास रूप गुणांची जाणीव होते. दुसरे रूप महाशक्तीचे होय. तिचे कार्य विश्व उत्पत्तीनंतर सुरू होते. जगताचे नियमन करणारी ती असते. तिसरे रूप वैयक्तिक आहे. पहिल्या दोन रूपातील शक्तीच्या स्वरूपाची मानवास जाणीव देऊन त्याचा व दैवी शक्तीचा संबंध प्रस्थापणे हे तिसऱ्या रूपाचे कार्य आहे.’ ते पुढे म्हणतात ‘या महाशक्तिपुढे हृदयाची सर्व द्वारे खुली झाली पाहिजेत.’

हृदयाची सर्व द्वारे खुली करण्याचा मार्गच सर्वसामान्य भक्तांसाठी सर्व शक्तिपीठे, देवालये, घरा-घरातील परंपरा याद्वारे उपलब्ध करून दिला जातो.

सामान्यतः नवरात्रीवेळी मातीच्या घटाची स्थापना करून त्या समोर धान्याची पेरणी केली जाते. अखंड नंदादीप तेवत असतो. कुणाकडे ललिता पंचमी, अष्टमी, नवमी या दिवशी देवतेची विशेष पूजा केली जाते. अनेक घरांतून कुमारी पूजन, घागरी फुंकणे, जागरण-गोंधळ या सारखे कार्यक्रमही चालतात. अनेक व्रतस्थ नवरात्रात नऊ दिवसांचा उपवास करतात. विविध प्रकारे मातेला भजतात. यातली कुठलीच गोष्ट निरर्थक नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे फार मोठा आशय दडलेला आहे. दिवा हे तर तेजाचे प्रतीक. वर्धिष्णू होण्याचे सामर्थ्य तेजाने प्राप्त होते, तर घट देहाचे प्रतिनिधित्व करतो. घटस्थापना याचा आशय खरेतर मानवामधील शक्ती जागरणाशी, जीवनाच्या उन्नत अवस्थेला पोचण्यासाठीच्या प्रतिबद्धतेशी आहे.

धान्यपेरणीचा संबंध कृषी संस्कृतीशी आहेच त्याबरोबरीने तो सृजनाशी आहे. भूमीमधील निर्माण कार्याला वंदन करण्याशी आहे. पंचमहाभूतांचे जागरण या प्रकृती पूजनातून होते. भूमी ही तर कृषकांच्या जगण्याचे साधन. तिच्यामधील शक्तीला अभिवादन होणे अगदी साहजिक आहे! कोणाकडे दीपाकडे ज्ञानदीप (सरस्वती) म्हणून पाहतात, कुणी धान्य पेरणीला वैभवाचे, समृद्धीचे (लक्ष्मी) लक्षण समजतात. देवीच्या उग्र (काली) रूपाचे पूजन विशेष प्रतीकांद्वारे केले जाते. महन्मंगला नारायणीच्या आशीर्वादाने मानवी देहाची यात्रा सफल संपूर्ण व्हावी हाच नवरात्री व्रताचा, उत्सवाचा मुख्य उद्देश असतो.

नवरात्रीचे पूजन

कुमारिका पूजनासारख्या प्रथा अर्थपूर्ण आहेत, प्रत्येक ठिकाणी शक्तीचा अंश असतो. कुमारिकेमध्ये अमर्याद स्वरूपात निर्माण शक्ती भरून राहिलेली असते. अशा कृतज्ञतेतून तिचे पूजन होते. ‘यत्र नार्यस्तु पूज्य ते रमन्ते तत्र देवता:’ अशा विश्वासातून हे पूजन व्हावे असा गाभा आहे. अर्थात, स्त्रीची उपेक्षा, अवहेलना, अत्याचार हे राक्षसी कृत्य ठरते हा विचार रुजविण्याचा प्रयत्न आहे. चराचरांत भरून असलेल्या शक्तीचा महोत्सव म्हणजे नवरात्र! मातृत्वाचा गौरव म्हणजे नवरात्र! अनंत, अपार, अगाध प्रकृतीचे गुणगान म्हणजे नवरात्र! आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राचा उद्देशच मुळी त्या महामायेसमोर कृतज्ञ भावनेने नतमस्तक होऊन शक्ती जागरण संचारण घडावे हा असतो. शक्ती उत्सवाची प्रथम वंदना चिद् शक्ती आदिमाया विश्वजननी, जगतस्वामिनीला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com