अहिंसा तीर्थमध्ये गो संगोपन, उपपदार्थ निर्मिती

कुसुंबा (ता. जि. जळगाव) येथे अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये देशी गोवंशाचे संगोपन केले जाते.
Cow
CowSakal

कुसुंबा (ता. जि. जळगाव) येथे अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये देशी गोवंशाचे संगोपन केले जाते. याचबरोबरीने दूध, तूपनिर्मिती, शेणापासून सेंद्रिय खत, दंतमंजन निर्मिती होते. शाकाहार प्रसार तसेच सेंद्रिय, जैविक शेतीबाबतही संस्थेतर्फे मार्गदर्शन केले जाते.

देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धनामध्ये कुसुंबा (ता. जि. जळगाव) येथे १९९९ पासून अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र कार्यरत आहे. सव्वीस एकरांवर या केंद्राचा विस्तार आहे. या ठिकाणी राठी, साहिवाल, गीर, कांकरेज, खिल्लार आणि गावठी गाईंचे संवर्धन, संशोधन केले जाते. जैन मुनी श्री तरुणसागरजी, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे श्री श्री रविशंकर आदी अनेकांनी अहिंसा तीर्थला भेट दिली आहे. तरुणसागरजी यांच्या सूचनेनुसार या गोसेवा केंद्राचे ‘अहिंसा तीर्थ’ असे नामकरण करण्यात आले.

सध्या या केंद्रात सुमारे २३०० गाईंचे संगोपन होत आहे. या केंद्रामध्ये १५० जणांना बारमाही रोजगार मिळाला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून सरासरी दररोज साठ हजारांची मिळकत होते. मजूर, वीज, इंधन, दुरुस्ती आदींवर दररोज दीड लाख रुपये खर्च होतात. व्यावसायिक दृष्टिकोनापेक्षा सामाजिक उपक्रमांवर केंद्राने सतत भर दिला आहे. यामुळे अनेक वर्षे हे केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू आहे. केंद्रात पंचगव्यापासून गो उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. केंद्रातर्फे जनजागृतीसाठी विविध गावांमध्ये अहिंसा रथ फिरविण्यात येतो. केंद्रामध्ये वीजनिर्मितीसाठी गोबर गॅस प्रकल्प आहे.यावर केंद्रातील काही पथदिवेही कार्यरत आहेत. केंद्रात २४ तास पशू चिकित्सालय आहे. शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबाबत जनजागृतीसंबंधी कृषी संमेलनाचे आयोजन केले जाते.

अहिंसा तीर्थमधील पारसराणी गोशाळेच्या दर्शनी भागात तीर्थचे संस्थापक रतनलाल बाफना यांचे वडील चुन्नीलालजी बाफना आणि माता सायराबाई यांच्या प्रतिमा स्थापन केल्या आहेत. याचबरोबरीने विविध संत, महा पुरुषांच्या प्रतिमादेखील या ठिकाणी पाहायला मिळतात.

गाईंसाठी स्वतंत्र व्यवस्था

  • भाकड गाईंसाठी जीवदया धाम, मुक्तांगण उभारणी.

  • लहान वासरारांसाठी इंद्रायणी आणि गायत्री गोठा.

  • दुधाळ गाईंसाठी मनोरमा, शारदा, प्रीतीसुधा गोठा.

  • वासरांना दूध पाजण्यासाठी सीता, भगवती आणि वसुंधरा गोठा.

  • विविध प्रजातींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र गोठा. यामध्ये ५०० गाईंचे संवर्धन.

  • केंद्रामध्ये गोमाता प्रसूतिगृह, गर्भवती गाईसाठी स्वतंत्र गोठा.

  • विना आईच्या वासरांसाठी स्वतंत्र गोठा.

  • अंध, अपंग, वृद्ध गाई, बैलांसाठी आश्रमाची स्वतंत्र व्यवस्था.

संस्थेचे विविध उपक्रम

  • अहिंसा तीर्थमध्ये गरजवंतांच्या मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली आहे. वृक्ष वाटिका, उद्यान आणि ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे. वृद्धांसाठी दादा-दादी पार्क आहे. सामाजिक गरजा लक्षात घेऊन केंद्राने या प्रकल्पांची उभारणी केली आहे.

  • केंद्राच्या ठिकाणी पक्ष्यांची भूक भागविण्यासाठी राजा मेघरथ कबूतरखाना उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पक्ष्यांना खाद्य, पाण्याची व्यवस्था आहे. अहिंसा तीर्थचे संस्थापक रतनलाल बाफना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुशील बाफना हेदेखील या कबूतरखान्यात आठवड्यातून किमान तीनदा येऊन पक्षिसेवा करतात.

  • अहिंसा तीर्थ परिसरात गो प्रदक्षिणेसाठी सप्त गोमाता प्रदक्षिणा मंदिर उभारण्यात आले आहे.

  • शाकाहार प्रसार, प्रेरणेसाठी जनजागृती तसेच शाकाहार संग्रहालय आहे. या ठिकाणी शाहाकाराची गरज याबाबतचे संदेश देणारे चित्र, विचार आहेत. अहिंसा तीर्थचे संस्थापक रतनलाल बाफना यांच्या सामाजिक, गोसेवेच्या कार्यासंबंधी मिळालेली सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक पाहावयास मिळतात.

  • अहिंसा तीर्थ परिसरात धेनूरक्षक आवास, जीवदया कार्यालय, क्षमाद्वार, दयाद्वार, शांतिद्वार, दूध पॅकिंग आणि वितरण केंद्र कार्यरत आहे. तसेच तीन पाणी साठवण तलाव, फुलांची रोपवाटिका आहे.

  • कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, अतिथिगृह, खुले व्यासपीठ, उपाहारगृहाची व्यवस्था.

उत्पादनांची निर्मिती आणि विक्री

  • दररोज ६०० लिटर दूध संकलन. जळगावातील ग्राहकांना थेट विक्री.

  • दररोज सहा लिटर तूपनिर्मिती. कल्याणी तूप ब्रॅंडने विक्री.

  • गोमूत्रापासून अर्क, शेणापासून अगरबत्ती, दंतमंजन उत्पादन.

  • गोमूत्रापासून कीटकनाशक निर्मिती. शेतकऱ्यांकडून चांगली मागणी.

दरवर्षी केंद्रातर्फे उत्पादित कल्याणी खताच्या विक्रीतून ८० ते ९० लाखांची उलाढाल होते. या केंद्रामधून शेतकरी सेंद्रिय खतांची खरेदी करतात. याचबरोबरीने मागणीनुसार पुरवठादेखील केला जातो. केंद्राच्या परिसरामध्ये तूप, धूपबत्ती, दंतमंजन, गोमूत्र अर्क विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था आहे.

उपपदार्थांचे दर (रुपये)

  • दूध (प्रतिलिटर) ५५

  • तूप (प्रतिलिटर) १६००

  • धूपबत्ती (३० नग) ३०

  • दंतमंजन (५० ग्रॅम) ३०

  • गोमूत्र (२०० मिलि) २०

  • गोमूत्र अर्क (२०० मिलि) ४०

  • कल्याणी पॉवर प्लस सेंद्रिय खत (५० किलो) ४००

  • कल्याणी गोल्ड खत (५० किलो) ३५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com