दिल दोस्ती : ‘सोशली’ फुललेली दूरस्थ मैत्री! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

friendship

दिल दोस्ती : ‘सोशली’ फुललेली दूरस्थ मैत्री!

मित्र या शब्दानं आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, हक्क सगळं काही सामावून घेतलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हा असतोच. मित्राला आपण भेटलो नसलो तरी, ते आपली काळजी आणि विचारपूस करीत असतात. असाच एक मैत्रीचा प्रकार आपल्याला अभिनेत्री मोनालीसा बागल आणि अभिनेत्री आदिती द्रविड यांच्या मैत्रीमध्ये आढळून येतो. यांची मैत्री ही सोशल मीडियाद्वारे झाली असली, तरी ही मैत्री बालपणाच्या मैत्रीप्रमाणे घट्ट झालेली आहे.

मोनालीसा आणि आदिती यांच्या मैत्रीसंदर्भात सांगताना मोनालिसा म्हणाली, ‘‘आदिती माझी सोशल मीडियावर झालेली मैत्रीण आहे. तिने साकारलेल्या मालिकांमधील व्यक्तिरेखा उत्तम आहेतच, पण ती अभिनय करताना आपला संपूर्ण जीव ओतते. तिने साकारलेली आतापर्यंतची माझी आवडती व्यक्तिरेखा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मलिकेमधील आहे. ‘माझ्या घरात’मध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखा मी प्रचंड आवडीने पाहायचे. माझी आई आदितीची चाहती आहे. त्यानंतर आमची ओळख वाढत गेली, आमच्यातला संवाद वाढत गेला. आम्ही एकमेकींच्या पोस्टवर कॉमेंट करायचो. एकमेकींच्या आगामी प्रोजेक्ट्सचे कौतुक करायचो आणि अशा प्रकारे आमची मैत्री वाढत गेली. मुख्य म्हणजे आम्ही कधी प्रत्यक्षात भेटलो नाही, परंतु, आमच्यातली मैत्री कायम राहिली आहे.’’

आदिती मोनालिसाच्या उत्तम गुणाबदल बोलताना म्हणाली, ‘‘मोनालिसा मनमिळाऊ आणि समजून घेणारी मैत्रीण आहे. तिच्यातला गोडवा भारावून टाकणारा आहे. ती नेहमी माझ्या आगामी प्रोजेक्ट्ससंदर्भात मला प्रोत्साहित करीत असते. अर्थात, आमची मैत्री सोशल मीडियावरून झाली असली तरीही ती मैत्री घट्ट होत चालली आहे. ती अतिशय सोज्वळ आणि गोड मुलगी आहे. ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करते, तेव्हा मला तिचं खूप कौतुक वाटतं. ती खूप जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या करिअरमध्ये पुढे जात आहे आणि तिची ही गोष्ट मला आत्मसात करायची आहे. तिला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम विलक्षण आहे. मुख्य म्हणजे तिला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. आणि हीच गोष्ट मला जास्त भावते. ती अशीच पुढे जात राहो, हीच इच्छा आहे.’’

‘‘आदिती आणि माझ्यात फारसा संवाद आणि भेटणे नसले, तरी ती माझे काम पाहून कौतुक करण्यात पुढे असते. तिचा पाठिंबा माझ्यामागे नेहमी असतो. या सिनेसृष्टीतील ती अशी एक व्यक्ती आहे, जी आतापर्यंत माझ्या कामाचं कौतुक म्हणा किंवा इतर काही गोष्टींसाठी ती नेहमी माझ्या कायम पाठीशी उभी राहिली आहे. मला तिच्याकडून खूप काही शिकायचे आहे, परंतु मुख्य म्हणजे मला तिच्याकडून नृत्यकला ही शिकून घ्यायची आहे. आदिती नृत्य फार अप्रतिम करते, ती एक क्लासिकल डान्सर आहे. ही तिची गोष्ट मला आत्मसात करायला आवडेल. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कार्यक्रमातील तिचे आत्ताचे पात्र देखील अप्रतिम आहे. खास तिच्यासाठी हा मी कार्यक्रम आवर्जून पाहते,’’ असे मोनालिसाने नमूद केले.

आदिती म्हणते, ‘‘आम्ही दोघी प्रत्यक्षात कधी भेटलो नाही, मात्र, आम्हा दोघांना लवकरच भेटायचे आहे आणि आम्ही लवकरच भेटू. आम्हा दोघांनाही फिरायला आवडते. सध्या मोनालिसा पुण्यात आणि मी मुंबईत असल्यामुळे भेट होणार नाही. परंतु, दोघांच्या प्रोजेक्ट्सच्या वेळेनुसार आम्ही एकमेकींसाठी वेळ काढू आणि भेटू.’’

(शब्दांकन ः भाग्यश्री कांबळे)