दिलखुलास : एका नानची ‘चुर-चुरी’त गोष्ट

मैत्रिणींनो, नुकतीच माझी दिल्लीवारी झाली
Friends
Friends sakal

मैत्रिणींनो, नुकतीच माझी दिल्लीवारी झाली. अशी तर मी असंख्य वेळेला दिल्लीला गेलेली आहे. आमचं एक घरच दिल्लीला होतं, त्यामुळे असेल कदाचित; पण इतक्या वेळेला दिल्लीला जाऊनसुद्धा कित्येक अशा जागा आहेत, ज्या ठिकाणी मी या वेळेला पहिल्यांदा गेले. खरं सांगायचं तर दिल्ली या शहरात दोन वसाहती आहेत.

एक म्हणजे नवी दिल्ली आणि दुसरी जुनी दिल्ली. नवी दिल्ली म्हणजे गार्डन सिटी. कारण ही जागा एक सुव्यवस्थित शहररचनाच आहे म्हणा ना. जागोजागी मोठमोठाल्या बागा. प्रचंड मोठाली लॉन्स, त्यामधे राजकारणी लोकांचे सफेद बंगले. मोठमोठाली पंचतारांकीत हॉटेल्स व मोठमोठाले लॉन्स. याउलट जुनी दिल्ली म्हणजे जागोजागी मुघल साम्राज्याच्या खुणा. अतिशय अरुंद रस्ते, गल्ल्याच म्हणा ना. त्यातून तुम्ही फक्त चालूच शकता किंवा रिक्षात बसून जाऊ शकता. दुतर्फा बऱ्यापैकी अस्वच्छता आणि आजूबाजूला लोकच लोक. अर्थात यातही एक प्रकारची मौज आहे; पण तिथं चालताना तुमच्या मनात ती जागा पाहण्यासाठीची प्रचंड इच्छाशक्ती लागते. उदाहरणार्थ, जामा मशीद, लाल किल्ला, पराठेवाली गल्ली, चांदनी चौक, हौज खास व्हिलेज.

दरवेळेला मी पराठेवाली गल्ली हे नुसतं ऐकायची. तिकडचा चूर चूर नान, काली डाल व छोले अतिशय प्रसिद्ध आहेत. खाल्लेच पाहिजेत, असं वाटायचं; पण नवी दिल्लीत खान मार्केटमधून वेळ मिळायचाच नाही. यावेळेला मात्र नक्की केलं आणि पराठेवाली गल्लीमधे गेले. गाडी एक ठरावीक ठिकाणी सोडून मग खुल्या रिक्षेतून अतिशय अरुंद गल्लीतून पराठेवाली या ठिकाणी गेले. गल्ली इतकी अरुंद आणि गजबजलेली आहे, शिवाय दुतर्फा छोटी छोटी दुकानं. ज्यात प्रामुख्यानं कपडे, साड्या, खाण्याचे स्टॉल्स, पर्सेस, लग्नात लागणारं सर्व सामान मिळत होतं.

कढाईकाम, कशिदाकाम, गोरा वर्क, जर्दोसी वर्क इतकं चमचम करणार होतं ना, की कुठल्याही मुलीनं ते घातले, की ती अप्सराच दिसली पाहिजे. बरं, गल्ली इतकी अरुंद, की रिक्षातून हात बाहेर काढला, की बाहेरच्या मॅनेक्विनलाच हात लागेल. ही पण एक मजाच होती. थोडं पुढे बोल्यावर पराठेवाली गल्ली आली. तिथं बोर्डावर पंचवीस प्रकारचे पराठे लिहिलेले होते. इतक्या छोट्या जागेतही कष्टकरी, कामगार लोक उभे राहून, तर काही बसून खात होते. हे पराठे चक्क मोठ्या कढईत तळून काढले जात होते.

आम्ही चूर-चूर नान खायला एक छोट्याशा खोकेवजा हॉटेलात गेलो. नानची आर्डर दिली. त्यानं दोन थाळ्या तयार केल्या. त्यात काळी डाळ, पनीर मखनी, छोले, थोडा कांदा-लिंबू व चूर-चूर नान होता. त्या हॉटेलचा तंदूर बहुदा माळ्यावर लावला असावा, कारण तो नान वरून टाकायचा व हा माणूस खालून त्याला एका टोपलीत पकडायचा.

त्याला हातांनी चुरायचा व त्यावर बटर लावून सर्वांना द्यायचा. पण मैत्रिणींनो, काय अप्रतिम चव होती त्या चूर चूर नानची. आमचं खाऊन झाल्यावर मी माझ्या ड्रायव्हरसाठी नान पॅक करून घेतला. तसाच एक त्या रिक्षावाल्यासाठीही घोतला खाऊन झाल्यावर रिक्षा उभी होती. तिथे गेलो व रिक्षावाल्याला गरम गरम चूर चूर नान फॉईलमधे बांधून दिला व त्याला सांगितलं, ‘‘हा खा. गरम आहे. आम्ही थांबतो इथं पाच मिनिटं.’’ त्यानं तो नान खाल्ला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

मला म्हणाला, ‘‘मॅडमजी, हम यहाँ २२ साल से रिक्षा चलाते है! बहुत सुना है की खूब स्वाद होता है चूर चूर नान, लेकीन पेहेली बार खाएं है।’’ मी अवाक् झाले. मनात विचार आला, आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा झाली, की आपण लगेचच ‘झोमॅटो’ किंवा ‘स्विगी’वरून ऑर्डर करून ती मागवून घेतो, खातो आणि तृप्त मनाने झोपतो. इकडे हा माणूस रोज रिक्षा चालवतो; पण मन मात्र मारतो.

रिक्षा सोडताना त्याला विचारलं, ‘‘किती पैसे द्यायचे?’’ तो म्हणाला, ‘‘मैंने आपका नमक खाया है, जो भी आपकी इच्छा। न दो तो भी चलेगा।’’ मी स्मित केलं आणि त्याच्या हातावर त्यानं सांगितल्यापेक्षा पन्नास रुपये जास्त ठेवले व त्याला सांगितलं, ‘‘घरवालों के लिए भी एक प्लेट ले जाना चूर चूर नान!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com