‘दीपज्योती नमोऽस्तुते’

दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव. अंधाराने व्यापलेले विश्‍व, चराचर दिव्याने उजळते. तसेच अविचार, अज्ञान दूर करून सत्‌विचार, सद्‌मूल्याचा प्रकाश निर्माण करणारा हा उत्सव.
‘दीपज्योती नमोऽस्तुते’
Updated on

दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा उत्सव, प्रसन्नतेचा उत्सव. अंधाराने व्यापलेले विश्‍व, चराचर दिव्याने उजळते. तसेच अविचार, अज्ञान दूर करून सत्‌विचार, सद्‌मूल्याचा प्रकाश निर्माण करणारा हा उत्सव. हा केवळ उत्सव नव्हे तर जिव्हाळा, ममता, प्रेम बंधुत्व, बांधिलकी जपणाऱ्या स्नेहसंमेलनाचा उत्सव आहे.

लक्ष्मीपूजन, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे प्रत्येक दिवशीचे आगळेवेगळे भावनिक आणि सांस्कृतिक विचारधारेचे, सुंदरसे, एकत्रीकरण, सुरेख गुंफण दिसते. वैदिक काळात सणाला क्षण म्हणत असत. पहिल्यापासूनच दीपावली ही क्षणाची सम्राज्ञी आहे. सामाजिक, कौटुंबिक, धार्मिकदृष्ट्या हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. या आणि अशा क्षणाच्या साक्षीने प्रेमाच्या प्रकाशात सारे आसमंतच उजळायचा आहे.

दिवाळी ज्या ऋतूत असते, तो ऋतूकाळ विलक्षण सुखाचा, समृद्धी, जगण्याची उमेद, ऊर्जा घेऊनच, निसर्गही बहरतो. शेतात पिकेही डुलायला लागतात. बळिराजाही जरा-जरा सुखावतो. धरित्री सरिता सारेच धुंदीने सजतात. अनेक वेदना काहींचे दुःखाचे ओझे, समस्या झेलणाऱ्या मानवी मनाला आत खोलवर, कुठेतरी आशेचा किरण डोकावतोच. वर्षभरातील कटू, नकोशा आठवणींचे कंगोरे दूर करून, दीपोत्सवात रंगवून जाण्याचा हा क्षण, उत्सव. दुःख भरले, क्षण काहीसं दूर करून वर्षभराकरिता लागणारी ऊर्जा, आनंद पुढील काही काळासाठी उमेद देतो. जगण्यालाही आशयघन प्राप्त होतो. दिवाळी हे प्रकाशाचे क्षण साठवल्याचा क्षण आहे. उजेडाची मुक्तपणे उधळण करायची आहे. साऱ्या चराचरात उजेड पसरावयाचा आहेच; पण आतील हृदयात अविवेक, षडरिपू असे सारे विकार दूर केले तरच प्रकाश पसरेल विवेकाचा, सद्‌शीलतेचा, सदवर्तनाचा.

संत ज्ञानदेव म्हणतात,

‘मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप

उजळी ते योगिचा पाहबे निरंतर दिवाळी’’

अविवेकाचा नाश करण्याकरिता करायची आहे प्रकाशाची उधळण.

दीपावली म्हणजे आत्मदीप ज्ञानाचा. तो हृदयात तेवत ठेवायचा असून, प्रत्येकाच्या जीवनात, जगण्यातही प्रकाशित करायचा आहे. समाजाच्या समृद्धतेसाठी प्रार्थना करायची आणि कृतज्ञतेचा आदर, सन्मानाचा दीपही उजाळायचा आहे. दिवाळी उत्सव म्हणजे ‘जीवन तेजोमय’ आणि दिव्याच्या ज्योतीसत्रात पवित्र करण्याचा सण, दीपावली म्हणजे उत्सवी दिवसाचा समुदाय. दिवाळी या तीन शब्दातच या सणामागे दडलेला प्रकाशाचा सकारात्मक ऊर्जेचा, जगणंच साजरं करायचा विचार व्यक्त करतो. आकाशकंदिलाची आरास पण त्यांचा लखलखाट, कोपरा न कोपरा प्रकाशमान करणारी, पणतीची ज्योत, लक्ष्मीची समृद्ध पाऊले, ऐश्‍वर्यशाली आगमन, मांगल्याची तोरणे आणि सोबत शुभेच्छा हे दिवाळीचे खरे सुखद स्वरूप आहे. त्या स्वरूपाने, प्रकाशाने आपण सारेच भारावल्यासारखे होतो. आनंदित होत असतो.

उपनिषदांमध्ये ‘तमसो माँ ज्योतिर्गमय’ अशी प्रार्थना केली आहे. ‘तमसो माँ ज्योतिर्गमय’ अशी प्रार्थना म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे आम्हाला ने. काळोख म्हणजे तमाकडून प्रकाशाकडे जाणे, तसंच अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखाकडून आनंदाकडे, नैराश्‍याकडून आशावादाकडे, अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे, दुष्कृत्यातून सत्कृत्याकडे जाणं असते. माझे मन कोळाखाने, उषःकालाने नाही तर प्रकाशाने भरून जाऊ दे. काहीतरी सत्कार्य माझ्या हातून घडू दे. या कार्यामुळेच मला अमरत्व प्राप्त व्हावे, अशी प्रार्थना करायची आहे.

भारत वर्ष, अगदी प्राचीन काळापासून तेजाची उपासना करीत आहे. ध्येयनिष्ठ जीवन, श्रद्धा, तपश्‍चर्या, अलौकिक यश, इंद्रिय विजय पराक्रम, कृतज्ञता आणि यथाशक्ती दातृत्वही जीवन, तेजस्वी करणारे स्रोत आहेत. उग्र तपश्‍चर्येने, ध्यानधारणेने, ऋषीमुनी साधकांनी हा तेजाचा मार्ग प्रशस्त केला. अंधारातून प्रकाश, त्यातून अमरत्व प्रकटवीनच हे महान सत्य आणि तेजस्वी होण्याचे रहस्य आहे. अशाच प्रकाशामुळे जगण्याच्या अर्थाला महत्त्व प्राप्त होईल.

प्रकाशाकडून अधिक प्रकाशाकडे नेणारा हा उत्सव म्हणूनच महत्त्वाचा संदेश देणारा आहे. ‘दीपज्योती नमोऽस्तुते’ संकल्प म्हणजे नावीन्यपूर्ण प्रकाशाचा निर्धार. तिमिराकडून झेपणाऱ्या, अभूतपूर्व तेजाचा, प्रकाशाचा, संकल्प पूर्ण करण्याचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com