Diwali Festival : दीपावली :उत्सव आरोग्याचा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

दीपावली साजरी करण्यामागचे विज्ञान लक्षात घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले तर या गोष्टीचा आपण सगळे अनुभूती घेऊ शकतो.

Diwali Festival : दीपावली :उत्सव आरोग्याचा...

डॉ. भाग्यश्री झोपे

सर्वप्रथम ‘सकाळ’ व ‘फॅमिली डॉक्टर’च्या सर्व वाचकांना आत्मसंतुलन व्हिलेजकडून मनापासून शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दीपावली व नूतन वर्ष सुख-समृद्धी, आरोग्य व समाधानाचा अनुभव देणारे ठरो हीच प्रार्थना ! प्रकाशाचा महोत्सव असणारा हा उत्सव आजपासून सुरू होतो आहे. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे सांगतात त्याप्रमाणे वातावरणातील कण न् कण प्रकाशाने भारून टाकणारी दीपावली साजरी करताना तिला साजेशी आंतरिक तेजस्विता अनुभवता आली तर भारतीय संस्कृतीने योजलेल्या दीपावलीचा खरा उद्देश साध्य होऊ शकतो.

दीपावली साजरी करण्यामागचे विज्ञान लक्षात घेतले आणि ते प्रत्यक्षात आणले तर या गोष्टीचा आपण सगळे अनुभूती घेऊ शकतो. पावसाळ्याच्या शेवटी, हिवाळ्याची चाहूल लागते, रात्री धुके पडते, हवेत गारवा जाणवतो ते दीपावलीचे दिवस असतात. या वर्षी अजूनही पावसाची एखादी सर येत असली तरी हा परतीचा पाऊस असल्याने वातावरणात झालेला बदल जाणवल्याशिवाय राहत नाही.

पावसाळ्यातील दमटपणा दूर व्हावा, जीवजंतूंचा प्रभाव कमी व्हावा आणि वातावरण शुद्ध व्हावे यासाठी चांगल्या प्रतीच्या तीळ- तेलाचे दिवे घरा-दारात लावण्याची जी पद्धत आहे ती अतिशय विज्ञाननिष्ठ आणि विचारपूर्वक योजलेली आहे. इलेक्ट्रिक दिवे लावले तरी तेलाच्या पणत्या लावण्याने जी दीपज्योत उजळते ती मनाला, विचारांना उजळवण्यासाठी समर्थ असते. नैराश्य, नकारात्मकतेला आळा घालण्यास मदत करते. म्हणून अजूनही अनेक मोठमोठ्या मंदिरांत, गंगेच्या काठी लक्षावधी दिवे तेवत ठेवण्याची प्रथा कायम आहे.

आज आहे वसुबारस. सवत्स गाईची पूजा करण्याच्या निमित्ताने आजच्या दिवशी आपण निसर्गाजवळ जावे. तुपासारखं अमृत देणाऱ्या, कामधेनूस्वरूप गाईच्या संपर्कात यावे हा मागचा हेतू असतो. आयुर्वेदात काही रोगात ‘गोसेवा’ हा उपचाराचा एक भाग सांगितलेला दिसतो. त्याचीच काही अंशी पूर्तता यातून होत असते. श्रीगुरुजी सांगतात त्याप्रमाणे माणसातील पशुत्वावर विजय मिळावा म्हणून प्रयत्न करण्याचा हा दिवस. आणि यासाठी सद्‌गुरुंनी आपल्याला मदत करावी या हेतूने त्यांनाही समर्पित होण्याचा हा दिवस.

म्हणून वसुबारसेला गुरुद्वादशी असेही म्हटले जाते. वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. दिवाळीतील धनत्रयोदशीला धनाची पूजा करायची असते हे सर्वांनाच माहिती असते, मात्र हा दिवस धन्वंतरीपूजनाचाही असतो. धन म्हणजे केवळ पैसा, अडका, संपत्ती नाही; तर आरोग्य हे एक अनमोल धन आहे हेच जणू धनत्रयोदशीच्या निमित्ताने अधोरेखित होत असते.धन्वंतरींचा उगम झाला तो समुद्रमंथनातून. अमृताच्या प्राप्तीसाठी देव-दानवांनी क्षीरसागराचे मंथन केले असता त्यातून एका पाठोपाठ एक अशी चौदा रत्ने निघाली. शेवटी जे अमृत आले ते साक्षात धन्वंतरी हातात घेऊन प्रकट झाले.

आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे अमृत म्हणजे एक प्रकारचे रसायन आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण आयुर्वेदात रसायनाचा अर्थ म्हातारपण व रोग दूर करणारा योग असाच दिलेला आहे. यादृष्टीने दीपावलीत करंजी, अनारसे, लाडू अशा रसायनस्वरूप पदार्थांच्या बरोबरीने च्यवनप्राश, आत्मप्राश, धात्री रसायन, सॅन रोझ सारखी रसायने सेवन करण्यास प्रारंभ करणे उत्तम होय. यानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते.

अभ्यंग स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला अभ्यंग करून मग उटणे लावून स्नान करणे किंवा उटणे आणि अभ्यंगाचे तेल एकत्र करून तयार केलेले मिश्रण अगोदर अंगाला लावून नंतर सुगंधी जलाने स्नान करणे. अशा प्रकारच्या अभ्यंगस्नानाने ताजेतवाने वाटते, उत्साह वाढतो, शिवाय पुढील आयुर्वेदोक्त फायदेही मिळतात. " दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ । कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्-दाहपाप्मजित्‌ ॥" शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि पापांचा नाश होतो.

दीपावलीपुरते म्हणायचे झाले तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय. श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून या दिवशी नरकातून मुक्त केले याचे प्रतीक म्हणून नरकचतुर्दशीला कारंटे नावाचे विषारी फळ सकाळी स्नानानंतर पायाने चिरडायचे असते. या फळात रक्तशुद्धीकर गुण असतात, यात त्वचारोग दूर करण्याचा प्रभाव असतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. या प्रथेमुळे हा फायदा सुद्धा अप्रत्यक्षरीतीने मिळत असावा.

धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ज्या पूजा केल्या जातात त्यात प्रसाद म्हणून दाखवायच्या व नंतर सेवन करण्याच्या गोष्टींमध्ये धणे, साळीच्या लाह्या, गूळ मुख्य असते. धणे सुगंधी असते. तसेच ते पचायला हलके, रुची वाढविणारे, मधुर विपाकाचे आणि त्रिदोषशामक असते. तहान, आग-आग, उलटी वगैरे त्रासांवर विशेषतः पित्ताशी संबंधित सर्व विकारांवर औषधाप्रमाणे उपयोगी असते. लघवी साफ होण्यासाठी, त्या ठिकाणी जळजळ, खाज वगैरे काही त्रास असले तर त्यासाठी धणे हे एक पटकन गुण देणारे औषध असते.

अन्न नीट पचावे, विशेषतः शरीरात आमदोष तयार होऊ नये यासाठी धण्यासारखे साधे व प्रभावी औषध नाही. दीपावलीच्या निमित्ताने सेवन केला जाणारा फराळ नीट पचावा यासाठी पूजा- प्रसादात धण्याची योजना केलेली आढळते. साळीच्या लाह्या सुद्धा पूजेत वापरण्याचे द्रव्य म्हणून प्रसिद्ध आहे. तशाच त्या औषध म्हणूनही उत्तम आहेत. ‘षष्टिशाली’ म्हणून तांदळाचा जो एक विशेष प्रकार असतो, त्या तांदळाला भाजून फोडून त्याच्या लाह्या तयार होतात. चवीला गोड, वीर्याने थंड आणि पचायला हलक्या अशा साळीच्या लाह्या अग्निदीपनास मदत करतात.

आयुर्वेदात मधुर रस म्हणजेच गोड चव सर्वांत महत्त्वाची, शरीर-मन-इंद्रियांना हितकर अशी सांगितली आहे. आहार असो वा औषध, बहुतेक सर्व ठिकाणी थोड्या अधिक प्रमाणात ‘मधुर’ चवीचा समावेश केलेला आढळतो. आयुर्वेदाने जसे मधुर रसाला प्राधान्य दिले तसेच भारतीय संस्कृतीनेही त्याचे महत्त्व ओळखून प्रसादात काहीतरी गोड समाविष्ट करण्याची प्रथा रूढ केली. कधी साखर, कधी बत्तासा, कधी पंचामृत अशा प्रकारे नैवेद्य दाखवण्याची प्रथा रूढ झाली. दीपावलीच्या पूजांमध्ये गूळ वापरला जातो कारण तो तेव्हाच्या वातावरणाला सर्वाधिक अनुकूल असतो.

गूळ जुना असावा असे आयुर्वेद सांगतो, त्यामुळे दुकानातून आणल्यानंतर ६-८ महिन्यांनी गूळ वापरणे श्रेयस्कर असते. गूळ हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करते, संताप दूर करून मन शांत करतो, श्रम नाहीसे करतो. म्हणून थकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत असते. वीर्याने उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते, गूळ रक्तधातूपोषक व स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. दीपावलीत घराला झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचे तोरण बांधले जाते. आंब्याची पाने तिन्ही दोष कमी करतात व मनाला आल्हाद देणारी असतात असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.

झेंडूची फुले रक्तदोष नष्ट करणारी, जखमेतील पू, स्राव सुकवणारी म्हणजेच जंतुनाशक सांगितलेली आहेत. म्हणून दिवाळी, दसरा वगैरे पावसाळ्यानंतर येणाऱ्या सणांमध्ये झेंडूची फुले, आंब्याची पाने यांना अधिक महत्त्व असते. पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. ‘दीपदर्शन’ हे आयुर्वेदाने मंगलकारक, भाग्यवर्धक सांगितले आहे, नात्यांमधली ओढ तेजाने उजळून जावी, अजून पक्की व्हावी हाही उद्देश असतोच. अशा प्रकारे दीपावलीचा उद्देश लक्षात घेऊन दीपावली साजरी केली, खाणे-पिणे, मजा करणे या गोष्टींचा अतिरेक होऊ दिला नाही तर दीपावलीचा खरा आनंद घेता येईल आणि त्यातून मिळालेल्या उर्जेचा, शक्तीचा संपूर्ण वर्षभर उपयोग करून घेता येईल.