Dnyaneshwari : पावणेतीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित ज्ञानेश्वरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dnyaneshwari

Dnyaneshwari : पावणेतीनशे वर्षांपूर्वीची हस्तलिखित ज्ञानेश्वरी

सांगली : अध्यात्म आणि वेदांचे तत्कालीन अभ्यासक सच्चिदानंद महाराज यांची २७१ वर्षांपूर्वी प्राकृत भाषेतील हस्तलिखित ‘ज्ञानेश्वरी’ मिरजेतील त्यांच्या वंशजांनी जतन केली आहे. मिरजेतील ही हस्तलिखित प्रत सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वीची. मात्र, आजही सच्चिदानंद महाराज यांचे वंशज राजाभाऊ जोशी यांच्या कुटुंबाने ही प्रत सुस्थितीत ठेवून हा आध्यात्मिक ठेवा जपला आहे. शालिवाहन शके सोळाशे त्र्याहत्तर आणि इसवी सनाच्या १७५१ सालात हे लिखाण झाले आहे. जोशी यांचे पूर्वज सच्चिदानंद महाराज वेदाभ्यासक आणि निष्णात ज्योतिषी होते. वेद आणि ज्योतिषशास्त्रात पारंगत अशा या जोशी घराण्याची वंशावळ इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी प्रसिद्ध केली आहे.

त्यामध्ये सच्चिदानंद महाराजांचा नामोल्लेख आहे. त्याकाळी हे घराणे भिक्षुकीवर उपजीविका करताना ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक म्हणून परिचित होते. या घराण्यातील काही विद्वान मंडळींनी संन्यास घेऊन धार्मिक कार्यास स्वतःला वाहून घेतले. याच घराण्याकडे कराड ते संकेश्वरपर्यंतच्या एकशे चौदा गावांच्या भिक्षुकीचा मान होता. या सर्व गावांमध्ये या घराण्याकडे त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीही होत्या. यापैकी सच्चिदानंद महाराज यांनी संन्यास घेऊन २७१ वर्षांपूर्वी वेद आणि अध्यात्माचा अभ्यास करीत ‘ज्ञानेश्वरी’चे हे लिखाण केले. हे लिखाण नेमके कोठे केले, याची माहिती उपलब्ध नाही.

याबाबत जोशी म्हणाले, ‘‘माझे वडील पांडुरंग ज्योतिष-पंचांगशास्त्राचे अभ्यासक होते. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी सेवा केली. त्यांना लाभलेल्या सुमारे ९४ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ज्ञानदानाबरोबरच बेडग पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सेवा केली. ते पूर्वज सच्चिदानंद महाराजांविषयी सांगायचे.

त्यांच्यापासून आलेले ज्योतिषशास्त्राचे ग्रहज्योतिष, होरा मकरंद अशी ग्रंथसंपदाही त्यांनी जपली होती. ती त्यांनी आमच्याकडे सोपवली. ज्योतिषशास्त्रातील अनेक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आम्ही जपली आहेत. ज्ञानेश्‍वरी ग्रंथही त्यापैकीच एक आहे. ’’

संत नामदेवांकडून नामकरण

शके १२१२ किंवा इ.स. १२९० मध्ये गोदावरी काठी नेवासे येथे महालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस एक कालदर्शक ओवी आहे ती अशी, ‘शके बाराशतें बारोत्तरे तैं टीका केली ज्ञानेश्वरें’ या ग्रंथाचे नामकरण स्वतः ज्ञानदेवांनी केले नाही. संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ‘ज्ञानदेवी’, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘गीताटीका’ असा तीन नावांनी केला आहे.

Web Title: Dnyaneshwari Manuscript Dated Three Hundred Years Ago Written By Satchidananda Maharaj

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..