

- डॉ. आमोद केळकर
भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शांचे पूजन, उत्तमाचा आदर, सहकाऱ्याविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता ही श्रेष्ठ जीवनमूल्ये प्राचीन काळापासून जतन केली आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये परोपकारार्थ समर्पितांना आदराने मातेचे स्थान देऊन गौरवान्वित करण्यात आले आहे. नद्यांना लोकमाता, दिव्य औषधींना वनस्पतिमाता, भूमी ही भूमाता व गाईला गोमाता म्हणून संबोधिले जाते.
भारताच्या अनादी काळापासून चालत आलेल्या महान संस्कृतीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र, भगवान परशुराम, सर्वच ऋषिमुनी, तसेच समस्त भक्तांच्या भावजगताचे सम्राट भगवान श्रीकृष्ण यांचे गोमातेवरील प्रेम परिचित आहे. सर्व प्रकारच्या धनांमध्ये पशुधन श्रेष्ठ मानले आहे. त्यातील गोधनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय गोवंशाचे महत्त्व
योगशास्त्रानुसार भारतीय गोवंशात आढळणारे वशिंड म्हणजे पाठीवरील उंचवटा हे सूर्यकेतू व चंद्रकेतू नाडीचे संगमस्थान आहे. वेदांमध्ये सूर्यनारायणाच्या किरणांना गौ असेही म्हणतात. सूर्यकिरणात ज्योती, आयू व गौ या तीन प्रकृती आहेत. याचमुळे वनस्पती व जीवजगताला पुरेशी ऊर्जा मिळत राहते. भारतीय गोवंशाच्या वशिंडातील सूर्यकेतू नाडीच्या अस्तित्वाने गोप्रकृतीचे किरण शोषले जातात व त्या ऊर्जेचा प्रभाव गोमय, गोमूत्र, गोदुग्ध या मूळ गव्यांवर पडतो. अशी गव्ये ऊर्जावान, तेज प्रदान करणारी व बलवर्धक आहेत. भारतीय गोवंशापासून प्राप्त होणारी गव्ये (गोमय म्हणजे शेण, गोमूत्र आणि दूध) म्हणजे मानवी शरीरात उद्भवणाऱ्या अनेक प्रकारच्या रोगांवर उत्तम विकल्प आहे. गोमयामध्ये उपयुक्त २२ गुणतत्त्वे, गोमूत्रात शरीरसंतुलनासाठी उपयुक्त २४ गुणतत्त्वे आणि दुधामध्ये १८ पोषणमूल्ये आहेत, असा महत्त्वपूर्ण उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. मुळातच अत्यंत औषधी गुणधर्म असलेली ही गव्ये इतर औषधी वनस्पतींशी संयोग पावल्यानंतर व्याधींवर अधिक परिणामकारकरीत्या कार्य करतात.
पंचगव्याचे परिणाम
मानवी शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. शरीरातील या पंचतत्त्वांच्या असंतुलनाने अनेक रोग उद्भवतात. भारतीय गोवंशापासून मिळणाऱ्या गव्य आणि उपगव्य यांच्या नियमित सेवनाने शरीरातील पंचतत्त्वांचे संतुलन दीर्घकाळ राखता येते. सध्याच्या गतिमान, तणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त अशा सर्व परिस्थितीवर सखोल व गांभीर्याने विचार करून शास्त्रोक्त पद्धतीने पंचगव्य चिकित्सापद्धतीचा उपयोग मानवी स्वास्थ्य दोष निवारण व आरोग्यवर्धनासाठी करण्यात येतो.
पंचगव्य चिकित्सा पद्धतीत सर्वच औषधी अत्यंत प्राकृतिक पद्धतीने सिद्ध केलेली असल्याकारणाने त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. स्वास्थ्य संतुलनासाठी पंचगव्य सेवन व चिकित्सा हा अत्यंत प्रभावी व सुलभ उपाय आहे. पंचगव्य चिकित्सेने अनेक दुर्धर रोग समूळ बरे होऊ शकतात. त्याचबरोबर केवळ आजारांवरच नव्हे, तर आजार होऊच नयेत, मानवी स्वास्थ्य कायमस्वरूपी निरामय रहावे यासाठीही पंचगव्य सेवन आणि पंचगव्य चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे.
नमो गोभ्यः श्रीमतीभ्य सौरभेयीभ्य एव च ।
नमो ब्रह्मसुताभ्यश्चभ्यः पवित्राभ्यो नमो नमः ॥
सर्वकामदुधे देवि सर्वतीर्थाभिषेचिनि ।
पावनी सुरभिश्रेष्ठे देवि तुभ्यं नमो नमः ॥
रोगनिवारणासाठी भारतीय वंशाच्या गाईचे दूध, दही, ताक, लोणी, शुद्ध तूप, गोमूत्र व गोमय (शेण) यांचा वापर औषधीय स्वरूपात करून मनुष्याचे स्वास्थ्यरक्षण करता येते. रोगांचा उद्भव म्हणजे पंचमहाभूतांपासून (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) तयार झालेल्या भौतिक शरीरातील वात- वायू, पित्त- अग्नी, कफ- जल यांच्यात असंतुलन होणे. यापैकी कोणतेही एक तत्त्व प्रथम दूषित होते, मग कुपित होते व कालांतराने विकृत होते. याचेच पर्यवसान मनुष्यशरीरात वातजन्य, पित्तजन्य, कफजन्य आजारांमध्ये होते.
रोगनिदान
सद्यःस्थितीत रोगनिदान न करता वेगवेगळ्या यंत्रांद्वारे तपासण्या करून आजार काय, त्याची स्थिती काय यावर विचारविमर्श होतो व त्याचे निवारण करण्यासाठी शस्त्रक्रिया, लेझरकिरण किंवा विविध प्रकारची इंजेक्शन्स, औषधे यांच्या माध्यमातून अॅलोपॅथी, मॉडर्न आयुर्वेद, होमिओपॅथी इ.सारख्या पद्धतींचा वापर प्रथमतः केला जातो; परंतु रोगाच्या कारणाचा शोध मुळापर्यंत घेतला जात नाही. परिणामतः काही वर्षांतच त्याच रोगाचा उद्भव पुन्हा होऊ शकतो किंवा त्याचे विविध दुष्परिणाम मनुष्यशरीरावर दिसू लागतात. यासाठी भारतीय पौराणिक चिकित्सा म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे.
चिकित्सापद्धती
सर्वप्रथम शास्त्राच्या आधारे नाभी, नाडी, जिव्हा, त्वचा, चेहरा, ध्वनी परीक्षण इ.द्वारे अचूक रोगनिदान करून, स्थाननिश्चिती व रोगस्थिती समजून घेऊन, मानवी शरीरात उद्भवणाऱ्या रोगांवर औषधीय द्रव्यांची रचना करून, समूळ रोगनिवारण करणे आणि मनुष्याला स्वास्थ्य प्रदान करणे यालाच चिकित्सा म्हणतात. भारतीय पौराणिक चिकित्सा विज्ञान पद्धतीचा हाच शुद्ध हेतू आहे.
यानंतर आहार, पथ्य, औषधांच्या वेळा, बल व रोगस्थिती पाहून औषधांच्या मात्रा ठरवल्या जातात. यात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी किंवा रोग तीव्रता कमी करणारी द्रव्य औषधांची योजना केली जाते. रोग्याचे मनोबल उच्च व संतुलित राखण्यासाठी विवेकपूर्ण संवाद, व्यायाम व यौगिक क्रिया यांचाही उपयोग उत्साहाने केला जातो, यालाच रोग्याची संपूर्ण चिकित्सा असे म्हणतात.
वैदिक शास्त्रानुसार सिद्ध झालेले नियम, सूत्रे, सिद्धांत मानवाच्या आरोग्यरक्षणासाठी व स्वास्थ्यसंवर्धनासाठी आहेत. या सर्वांचे मूळ भारतीय आयुर्वेदशास्त्र हेच आहे. महर्षी चरक यांनी या शास्त्राला ग्रंथबद्ध केले.
गोमय, गोमूत्राधारित जैविक खतांवर पोषण झालेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला इ. शरीराच्या पृथ्वीतत्त्वाचे संवर्धन करते. गोदुग्धाच्या नियमित सेवनाने शरीरातील जलतत्त्वाचे संतुलन राखले जाते. शास्त्रोक्त पद्धतीने गाईच्या दुधापासून तयार केलेले शुद्ध तूप शरीरातील अग्नितत्त्वाचे नियमन करते. ब्राह्ममूहुर्तावर वरच्यावर धरलेले गोमूत्र सेवन केले असता शरीरातील वायुमंडल सुविहीत होत असते. मंथनप्रक्रियेतून निघालेले लोणी अग्नी व जलाचे संतुलन करते, त्याखाली राहिलेले रसायन शरीरातील अनेक रोगांवर गुणकारी औषध आहे. आकाश या सूक्ष्म तत्त्वाचे संचालन या रसायनाद्वारे होते. यालाच दही, ताक, लस्सी, छाछ व मोर असे विविध प्रदेशात संबोधिले जाते.
अमृतं क्षीर भोजनम् । शरीर बलवर्धनासाठी भारतीय गोवंशापासून मिळणारे दूध- सर्व औषधी सार असे संबोधिले आहे. आजीवन सात्म्य म्हणजे जन्मलेल्या तान्ह्या बाळापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना सहज पचणारे, शरीरातील १८ पोषणमूल्यांची पूर्तता करणारे एकच प्राकृतिक औषध! भ्रम, मद, दारिद्य, शुष्कता, भूक, जीर्णज्वर व रक्तपित्ताच्या रोगावर औषध म्हणून कार्य करते.
तक्र शक्रस्य दुर्लभ । भारतीय गोवंशाच्या गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक पचण्यास हलके, जठराग्निद्दीपक, वातनाशक, मूत्रपिंड व मूत्राशयाशी निगडित आजारांवर अत्यंत प्रभावशाली.
घृतं प्राश्य विशुद्धति । भारतीय गोवंशाच्या गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप ग्रहणशक्ती, बुद्धी व स्मृतिवर्धक, विष व ज्वरनाशक. विविध औषधांच्या संयोगाने अनेक कार्य करणारे एकमेव औषध.
गोमूत्र धन्वंतरी । गोमूत्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रक्त शुद्ध करते. अतिरिक्त मेद घटविते. अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल व अँटी ऑक्सिडंट असते.
पंचगव्य महारसायन । गोमय रस, गोमूत्र, गोदुग्ध, ताक व घृत यांच्या विविध प्रमाणांतील मिश्रणांनी तयार होणाऱ्या औषधास पंचगव्य महारसायन म्हणतात.
देशविदेशांतील विविध स्तरांतील व्यक्तींनी पंचगव्य चिकित्सेचा विलक्षण अनुभव घेतला आहे. दुर्धर, वेदनादायी, कायमचे पंगुत्व निर्माण करणाऱ्या, असाध्य वाटणाऱ्या व्याधींतून पूर्ण बरे होऊन रोगाचे समूळ निवारणही होऊन आता ते सर्व आरोग्यपूर्ण, आनंदी जीवन जगत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.