esakal | स्मरण संस्कृतीचे... : प्रसारमाध्यमातून जनजागृती I Media
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.-balaji-Tambe

स्मरण संस्कृतीचे... : प्रसारमाध्यमातून जनजागृती

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

जनताजनार्दन हे परमेश्र्वराचं खरं रूप आहे असं मानणाऱ्या श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी जीवनभरात असंख्य माणसं जोडली. त्यांच्याकडे ज्ञान होतं, आत्मीयता होती, बोलण्याचं कौशल्य होतं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आश्र्वस्त करण्याचा प्रभाव होता. म्हणूनच लहान मुलांपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत, गृहिणीपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत कोणाशीही ते सहज संवाद साधू शकत. प्रत्येकाला देण्यासारखं त्यांच्याकडे काही ना काही नक्की असे.

ध्यान, चिंतन, संशोधन, नवीन तंत्रज्ञानाची जिज्ञासा यामुळे ते कोणत्याही विषयावर बोलू शकत. श्रीगुरुजी म्हणत, ‘व्यासपीठ हे ज्ञानपीठ असतं, त्याला नमन करून एकदा बोलायला सुरुवात केली की सगळं आतून स्फुरतं.’ यामुळेच त्यांचं बोलणं खिळवून ठेवणारं असे.

त्यात रोजच्या व्यवहारातील दाखले असत, सद्यपरिस्थितीचा उल्लेख असे. विषयाची तयारी त्यांना कधीही करावी लागली नाही. मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या भाषांमध्ये ते उत्तम बोलत. संस्कृतचा त्यांचा गाढा अभ्यास होता. भाषेचा आग्रह ते धरत नसत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार पोचावेत या उद्देशाने समोरच्याला समजेल अशा भाषेत ते बोलत.

जनजागृतीसाठी त्यांनी अगदी सुरुवातीला लिखाण, व्याख्यान, सत्संग, त्यानंतर टीव्ही, ब्लॉग्ज, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यब अशा अनेक माध्यमांचा वापर केला. युरोपमधील अनेक आंतरराष्ट्रीय मासिकात त्यांचे लेख प्रसिद्ध झाले, अनेकदा टीव्ही चॅनेलसाठीही त्यांनी मुलाखती दिल्या. भारतातही सुरभी, संवाद, हॅलो डॉक्टर, हार्ट-टू-हार्ट, माझा कट्टा, यासारख्या अनेक नावाजलेल्या टीव्ही कार्यक्रमात ते सहभागी झाले. जनजागृतीसाठी त्यांनी देश-परदेशात अखंड प्रवास केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत त्यांची व्याख्याने झालेली आहेत. युरोप, अमेरिका, यूएई, हाँगकाँग, आफ्रिका वगैरे अनेक देशांमध्ये भारतीय विद्येचा प्रसार केला. लॉकडाउनच्या काळात अनेक वेबिनारच्या माध्यमातून ते सर्वांना भेटत राहिले. १९८६पासून एको हे मॅगेझिन आत्मसंतुलनमधून प्रसिद्ध होतं. ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’चा प्रवास थक्क करणारा आहे. साम टीव्हीवर संपूर्ण श्रीमद्‌भगवद्‌गीता, मनाचे श्र्लोक, भारतीय उत्सव-सण, आयुर्वेद यावर त्यांनी २००८पासून अखंड मार्गदर्शन केले. साम-संजीवनी या कार्यक्रमाची संकल्पना त्यांचीच. मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती अधिक चांगल्या प्रकारे होईल या हेतूने साम टीव्हीवर भैरोबा, मिशन दोस्ती डॉट कॉम, संगीत गुरुकुल वगैरे कार्यक्रमांची योजना केली.

लॉकडाउनच्या काळात यूट्यूबसाठी ॐकार ध्यान, गीतरामायण, आरोग्य, आयुर्वेदीय घरगुती उपायांवर अथक व्हिडिओज्‌ बनवले. अवघ्या दीड वर्षांत श्रीगुरुजींच्या चॅनेलला सात लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स मिळाले. त्यांच्या ज्ञानसंपदेतून, पूर्वीच्या रेकॉर्डिंगमधून यूट्यूबचा प्रवास असाच सुरू राहील, त्यांचं जनजागृतीचं काम पुढे जात राहील.

श्रीगुरुजींच्या लेखनात, बोलण्यात ज्ञानाचा अधिकार आहे, अनुभवातून आलेला आत्मविश्वास आहे, समोरच्याला बोध व्हावा ही तळमळ आहे, आणि म्हणूनच कधीही न भेटलेल्या व्यक्तीलाही ते ‘आपले’ वाटतात. त्यांच्या लेखनातून, रेकॉर्डिंगमधून हा ‘आपलेपणा’ सर्वांपर्यंत निरंतर पोचत राहील.

उपासक कलेचे

श्रीगुरुजी लहानाचे मोठे झाले ते बडोद्यात. पुणे हे विद्येचे माहेरघर तसं बडोदा हे कला आणि संस्कृतीचं शहर. वातावरणाचे संस्कार म्हणा की घरातील वारसा, पण त्यांना कलेचं वरदान उपजत होतं.

श्रीगुरुजींचे बाबा रोज अंगणात रांगोळी काढत, दिवाळीत तर सर्वतोभद्र, गणेशयंत्र, मंडलांच्या मोठ्या रांगोळ्या काढत. त्यांना मदत करताना श्रीगुरुजी कधी ठिपक्यांची, कधी फ्रीहँड, कधी पोर्ट्रेट अशा रांगोळ्या काढू लागले. मनातील भाव रांगोळीच्या रेषांतून आणि रंगसंगतीतून कसा प्रकट करावा हे त्यांना सहज जमले.

दहावीत असल्यापासून श्रीगुरुजींनी रांगोळीची प्रदर्शने भरवली. यासाठी रात्ररात्र जागावे लागे, सतत खाली वाकून काम करावे लागे, परंतु तपस्वी परंपरेतील श्रीगुरुजींसाठी हे पृथ्वीतत्त्वावर केलेले ध्यान असे. मिरज, सांगली, बडोदा, बिलिमोरा, पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रदर्शने भरवली. शिवाजीराव भोसले, मंगेश पाडगावकर, दत्तो वामन पोतदार, विं. दा. करंदीकर अशा अनेक दिग्गजांनी या प्रदर्शनांना भेट देऊन प्रशंसा केल्याचं श्रीगुरुजी सांगत. पुण्यातील प्रदर्शनावर त्याकाळी लीलाताई परुळेकर यांनी ‘सकाळ’मध्ये लेख लिहिला होता.

श्रीगुरुजी चित्रेही उत्तम काढत. असंख्य ॐकारांपासून श्रीगणेशांचे रेखाटलले चित्र ही त्यांची श्रेष्ठ कलाकृती. श्रीगुरुजी म्हणत, ‘कोणतीही गोष्ट तादात्म्यभावाने करायला कला शिकवते. आपल्या आराध्याशी एकरूप व्हायचं असेल, एखाद्या देवतेची किंवा सद्‌गुरूंची उपासना करायची असेल तर त्यांचे चित्र काढावे.’

रांगोळीच्या एका नव्या आविष्काराची सुरुवातही श्रीगुरुजींनी केली. कॅनव्हासवर डिंक लावून त्यावर रांगोळी चिकटवून पोट्रेट तयार करण्याची. विवेकानंदांचे असे उभे पोट्रेट त्यांच्या एका प्रदर्शनाचे आकर्षण होतं.

कामाचा व्याप वाढला तसतसे चित्रे, रांगोळ्या काढणे जमेनासे झाले पण त्यांच्यातील कला एखाद्या पुस्तकाचे मुखपृष्ठ असो, स्टेजवरची बॅकग्राउंड असो, टीव्ही कार्यक्रमासाठीचा सेट असो, ॐकाराची त्रिमितीय मूर्ती असो, हर्बल माळा असो, अशा अनेक रचनांमधून अभिव्यक्त होत राहिली.

साडेतीन मात्रा असलेल्या ॐकारात स्वतःला पाहता यावं असं ते नेहमी सांगत. ही संकल्पना मनात ठसावी यासाठी त्यांनी ॐकाराला त्या त्या देवतेची एक मात्रा लावून अतिशय सुंदर चित्रे तयार केली. उदा. मूळ ॐकाराला बासरी, मोरपीस लावले की श्रीकृष्ण, वीणा हातात घेतली की सरस्वती, ध्यानमुद्रा रेखाटली की बुद्ध वगैरे. श्रीगुरुजींमधल्या कलात्मकतेची प्रतिकरूप अशी ही चित्रे आत्मसंतुलनमधील मंदिरात पाहता येतात.

उपासना करण्यासाठी समोरचे चित्र किंवा मूर्ती पर्फेक्ट, प्रमाणबद्ध असण्याकडे त्यांचा कटाक्ष असे. म्हणून आत्मसंतुलनमधील दत्तात्रेय, कृष्ण, राम, हनुमान वगैरे सर्वच देवतांची चित्रे श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्या कलात्मक व अचूक दृष्टीतून काढलेली आहेत.

कलेचे उपासक असणाऱ्या अशा श्रीगुरुजींकडे सर्वांत मोठी कला आहे ती हृदयाला स्पर्श करण्याची, अंतरंगात बदल करण्याची! त्यांच्या संगीतातून, लेखनातून, व्याख्यानांमधून हा अनुभव आपल्याला मिळत राहो ही प्रार्थना.

loading image
go to top