esakal | स्मरण संस्कृतीचे... : पंचकर्म आणि ‘संतुलन क्रियायोग’
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Balaji Tambe

स्मरण संस्कृतीचे... : पंचकर्म आणि ‘संतुलन क्रियायोग’

sakal_logo
By
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे

अध्यात्म असो की आयुर्वेद, संस्कारांना आणि संस्कारांमुळे होणाऱ्या शुद्धीला मोठे स्थान असते. आयुर्वेदाने मुख्यत्वे भौतिक शुद्धीसाठी मार्गदर्शन केले, तर अध्यात्माने आत्मशुद्धीसाठी. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे सांगत, ‘आपल्याला वाटतं, आनंद शरीराला होतो, पण प्रत्यक्षात आनंद शरीरामार्फत मनाला किंवा आत्म्याला मिळत असतो. आनंद अनुभवण्याचे शरीर केवळ साधन, म्हणूनच शरीर शुद्ध असायला हवं’.

पुण्यात असताना त्यांच्याकडे मोठ्या संख्येने रूग्ण येत, अचूक निदान करून, उत्तमोत्तम औषधं देऊनही हवा तसा गुण का येत नाही, हा प्रश्र्न उद्‍भवे, आणि म्हणून ‘ये तु संशोधनैर्शुद्धाः न तेषां पुनरुद्भवः’ म्हणजे ‘बिघडलेले दोष शरीराबाहेर काढल्यास ते पुन्हा रोगनिर्मिती करत नाहीत’ या सूत्राचा त्यांनी प्रत्यय घ्यायचे ठरवलं. त्याकाळी पंचकर्म क्वचितच केलं जायचं. शास्त्रशुद्ध पंचकर्म तर जवळजवळ नाहीच. परंतु आयुर्वेदाचे संस्कार, शास्त्रांचे ज्ञान व रोगाला मुळापासून बरं करण्याचा ध्यास यांच्या जोरावर श्रीगुरुजींनी पुण्यातच पंचकर्माची सुरुवात केली.

शास्त्रातील सर्व नियम सांभाळून पंचकर्म करण्याचा त्यांचा निर्धार तेव्हाही तितकाच पक्का होता. रुग्णाला कधी सॅनेटोरियममध्ये, कधी भाड्याच्या जागेत, वेळप्रसंगी घरी ठेवून ते पंचकर्म करत. या शास्त्रशुद्ध पंचकर्माचे अविश्र्वसनीय परिणाम मिळाले. पंचकर्म करून घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली हे पाहून श्रीगुरुजींनी कार्ल्याला आत्मसंतुलन उभारलं, जेथे देशविदेशातील हजारो व्यक्तींनी संतुलन पंचकर्माचा लाभ घेतला आहे.

‘पंचकर्म’ म्हणजे ‘पाच कर्मे’ असे नसून ‘पंचकर्म’ म्हणजे ‘पंचतत्त्वांची शुद्धी’ होय. स्थूल महाभूतांपासून बनलेल्या शरीराची शुद्धी वमन, विरेचनादी उपचारांनी करता येते, परंतु अग्नी, आकाश, मन वगैरे सूक्ष्म तत्त्वांच्या शुद्धीसाठी योग, संगीत, ‍ॐकार ध्यान हे उपचार आवश्यक असतात, असं ते नेहमी सांगत. संतुलन पंचकर्मात या सर्वांचा समावेश असतो. सत्संग, आयुर्वेदीय जीवनशैलीचे मार्गदर्शन, संतुलन फार्मसीला भेट, अन्नयोगाचे प्रात्यक्षिक, प्रश्र्नोत्तरे यांचाही अंतर्भाव असतो. अशा पंचकर्मामुळे शारीरिकच नाही तर मानसिक, भावनिक, आध्यात्मिक स्तरांवर काम करणे शक्य होते.

आयुर्वेदात पंचकर्माचा अंतर्भाव स्वस्थवृत्तात म्हणजे निरोगी राहण्यासाठीच्या उपायांमध्ये केलेला आहे. तेव्हा रोग होऊ नये, आरोग्य कायम राहावं यासाठी पंचकर्म करणं अधिक श्रेयस्कर असतं. मात्र काही त्रास असला तर मूळ शरीरशुद्धीनंतर विशेष उपचार योजले जातात. उदा. कुंडलिनी मसाज, शिरोधारा, शिरोबस्ती, नस्य, उद्वर्तन, हृदबस्ती, पिंडस्वेदन, उत्तरबस्ती वगैरे. हे सर्व श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनानुसार आणि २५-३० वर्षांपासून त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या, आयुर्वेदाला आणि श्रीगुरुजींच्या कार्याला समर्पित टीमद्वारा होते. सध्या आत्मसंतुलनमध्ये चार निवासी डॉक्टर आणि १८ थेरपिस्ट आहेत. आत्मसंतुलनच्या धर्तीवर ११९४मध्ये श्रीगुरुजींनी जर्मनीतील स्टुटगार्टजवळ अशाच निसर्गरम्य परिसरात ॐकुर्-झेन्ट्रुम नावाने पंचकर्म केंद्र सुरू केले. येथेही पंचकर्माचे उत्तम परिणाम मिळतात.

हार्ट अटॅक आल्यावर बायपासचा सल्ला मिळाला होता, मात्र संतुलन पंचकर्म केलं आणि ऑपरेशन टळलं. फार फार तर दोन वर्षं हाती आहेत असे ऐकलं.परंतु पंचकर्म केलं आणि आज २० वर्षे उलटून गेली, अजूनही सामान्यजीवन सुरू आहे. आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागेल असं सांगितलेलं पण पंचकर्म करता करताच इन्शुलिन थांबलं ते परत घ्यावं लागलं नाही. गर्भधारणा होत नव्हती, तपासण्यांनंतर IVF शिवाय पर्याय नाही असं सांगितलं पण पंचकर्मानंतर तीन महिन्यांत दिवस राहिले. अशी कितीतरी उदाहरणे. पंचकर्मानंतर त्वचा उजळते, डोळ्यांत तेज येतं, व्यक्ती तरुण दिसू लागते. पंचकर्मानंतर घरी परतलं लोक ‘तुम्ही काय केलं’ असा प्रश्र्न आवर्जून विचारतात, हाही अनेकांचा अनुभव असतो.

पंचकर्माला येणारे बहुतांशी रुग्ण ‘गंभीर’ आजाराने ग्रस्त असतात. मात्र श्रीगुरुजींनी येथील वातावरण गंभीर होऊ दिलं नाही. येथील शुद्ध हवेत, निसर्गरम्य परिसरात, सकारात्मकतेने भारलेल्या वातावरणात गांभीर्यातून मुक्त करण्याची किमया आहे आणि ती श्रीगुरुजींनी येथील कणाकणात रुजवली आहे. आंतर्स्नेहनात औषधी तूप वा विरेचनाचा काढा पिताना छान कॉफी मग वापरायचे व एकमेकांना ‘चिअर्स’ करून प्यायचे ही कल्पना त्यांचीच. वृक्षसंपदा, मनमंदिर, ॐमंदिर, गाई, कासवे, बागेमध्ये बसण्यासाठी झोपाळे, चालण्यासाठी हिरवळी, साजरे होणारे उत्सव, वाढदिवस, त्यानिमित्त मिळणारा एखादा गोड पदार्थ अशा वातावरणात पंचकर्माचाही जणू उत्सव होतो.

श्रीगुरुजींच्या अथक प्रयत्नांतून साकार झालेल्या संतुलन पंचकर्मामुळे आजवर हजारोंनी आरोग्याचा आणि सकारात्मकतेचा अनुभव घेतला आहे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे हे कार्य यापुढेही सुरू राहील.

संतुलन क्रियायोग

भारतीय परंपरेतील एक समृद्ध तत्त्वप्रणाली म्हणजे योग! योग म्हणजे फक्त योगासने नव्हे, व्यायाम तर मुळीच नव्हे. पतंजलींनी योगसूत्रे आणि हठयोगातील क्रिया यांच्या समन्वयातून श्रीगुरुजींनी ‘संतुलन क्रियायोग - SKY’ विकसित केला, जो करायला सोपा, कमीत कमी वेळेत अधिकाधिक गुण देणारा, रुग्णांनाही सहजतेने करता येणारा आहे, यामुळे शरीराच्या बरोबरीने मनावर तसंच हॉर्मोन्सच्या संतुलनावर विशेष परिणाम मिळतात.

श्रीगुरुजी म्हणत, ‘आयुर्वेद जीवन जगण्याची पद्धत आहे, तर योग जीवनाचे लक्ष्य साधण्याचे शास्त्र. चंचलता हा मनाचा धर्मच. पण मनोवृत्तींचे अनुशासन करणे, सर्व काही मीच करतो असं न समजता परमतत्त्वाच्या अस्तित्वामुळे सारं घडतं आहे ही ठाम श्रद्धा म्हणजे योग. तेव्हा आसन-प्राणायामाबरोबरीने त्याग व सेवा, अनुशासन व प्रेम तसेच सर्वांभूती परमेश्र्वर पाहण्यानेच ‘योग’ सिद्ध होईल’. आत्मसंतुलनमधील आचारामध्ये हे तत्त्व श्रीगुरुजींनी सहजपणे सरमिसळून टाकलेले आहे.

संतुलन पंचकर्मात रोज सकाळी स्काययोग शिकवला जातो. याचे सचित्र पुस्तक मराठी व इंग्रजीत उपलब्ध आहे. पुस्तकातील मार्गदर्शनानुसार घरच्या घरीही क्रियायोगाची सुरुवात करता येते.

‘योगः कर्मसु कौशलम्’ कर्मात कुशलता म्हणजे योग असं श्रीकृष्ण सांगतात. ‘कुशलकर्मयोगी’ श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनामुळे सर्वांचं जीवन योगसंपन्न होवो हीच पार्थना.

loading image
go to top