स्मरण संस्कृतीचे... : सिद्ध आयुर्वेदाचार्य

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचं आयुर्वेद क्षेत्रातील योगदान पाहिलं तर ती परमेश्र्वरी योजना होती याचा प्रत्यय येतो. ते म्हणत, ‘कुणी मला माझा धर्म विचारला तर मी अभिमानाने म्हणेन, ‘आयुर्वेद’.
Dr Balaji Tambe
Dr Balaji TambeSakal

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचं आयुर्वेद क्षेत्रातील योगदान पाहिलं तर ती परमेश्र्वरी योजना होती याचा प्रत्यय येतो. ते म्हणत, ‘कुणी मला माझा धर्म विचारला तर मी अभिमानाने म्हणेन, ‘आयुर्वेद’. आयुर्वेद हे जीवनशास्त्र आहे, असं त्यांनी नुसतं सांगितलं नाही, तर ते प्रत्यक्षात आणलं. आयुर्वेदीय जीवनशैली जेथे अनुभवता येते, ते ‘आत्मसंतुलन’ उभारलं.

लहानपणापासून घरातच आयुर्वेदाचे संस्कार झाले. गरज पडल्यास घरात आयुर्वेदाचाच आधार घेतला जायचा. त्यांच्या घराजवळ अनेक नामांकित वैद्य राहत असत. लहानपणापासून वैद्यांकडे जाणे, औषधे बनविण्यासाठी मदत करणे हे सुरू होतं. श्री. दत्तूशास्त्री हे अनुभवी वैद्य श्रीगुरुजींना म्हणत, ‘उपासनेचे बळ असल्याने तुझ्या हाताला सिद्धी आहे.’ याचा प्रत्यय आजवर अगणित लोकांनी घेतला.

‘आयुर्वेद विशारद’ झाल्यानंतर ते पुण्यात, राहत्या घराच्या मागच्या जागेत रुग्ण तपासत, मोफत औषधे देत, पदरचे पैसे खर्चून! रुग्णांची संख्या वाढली, आयुर्वेदाची जगाला असणारी आवश्यकता लक्षात आली, तशी त्यांनी कार्ल्याजवळ निसर्गरम्य परिसरात जागा घेतली. पुण्यातील व्यवसाय आणि जम बसलेली प्रॅक्टिस सोडून शहरापासून इतके दूर जाण्याचे धाडस करू नये, असे श्रीगुरुजींना अनेकांनी सुचवले; पण दूरदृष्टी, आत्मविश्र्वास आणि परमेश्र्वरी योजनेवरील श्रद्धेच्या जोरावर त्यांनी हे पाऊल उचलले आणि आयुर्वेदाच्या प्रसाराचे, शास्त्रशुद्ध पंचकर्म करण्याचे, संस्कारपूर्ण औषधे बनविण्याचे स्वप्न साकार झाले.

श्रीगुरुजींकडे नेहमी अवघड रुग्णच आले, परंतु आयुर्वेदामुळे रुग्णाला गुण यायलाच हवा, उपचारांना सिद्धी मिळायलाच हवी हा भाव त्यांच्या मानत कायम असे. नाडीपरीक्षणातही त्यांच्याजवळ सिद्धी होती. ते म्हणत, ‘उपासनेचे पाठबळ असले, वैद्याकडे संवेदनशीलता असली तर नाडीतून सर्व समजू शकते.’ नाडी पाहून ते हृदयवाहिनीमध्ये ब्लॉक्स आहे का हे अचूक सांगत. रुग्णाची फाईल न पाहता त्याला काय काय त्रास आहेत हे सांगत, कधी कधी आई-वडिलांच्या घराण्यात काय दोष होते हे सुद्धा सांगत. तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्यातील असामान्यत्व भावल्याशिवाय राहत नसे.

हार्ट अटॅक आलेला, ऑपरेशनशिवाय फार तर १-२ वर्षे आयुष्य आहे असं सांगितलेलं, परंतु संतुलन उपचारानंतर २०-२० वर्षे सामान्य जीवन जगलेली कितीतरी उदाहरणे आहेत. कॅन्सर असो, किडनी फेल्युअर असो, मधुमेह असो, यासारखे अनुभव आलेल्या असंख्य व्यक्ती आहेत. आज आत्मसंतुलनखेरीज पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, अहमदाबाद, म्युनिक-जर्मनी, झेन्ट्रुम-स्टुटगार्ट येथे संतुलनच्या शाखा आहेत. श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आजवर तीन लाख रुग्णांनी आयुर्वेदाचा अनुभव घेतलेला आहे. या यशामागे श्रीगुरुजींचे सिद्ध वैद्यत्व तर आहेच, बरोबरीने त्यांची आयुर्वेदावरील श्रद्धा, औषधे बनविताना शास्त्रशुद्धतेचा पाठपुरावा, समर्पित काम करणाऱ्या व्यक्ती यांचीही जोड आहे.

आयुर्वेदाच्या अष्टांगांपैकी शल्यतंत्र वगळता इतर सर्व तंत्रांमध्ये त्यांनी भरघोस कार्य केले. रोगानुरूप औषधे व पंचकर्म (काय), स्त्रीआरोग्य, गर्भसंस्कार (बाल), धूप-यज्ञ-प्रार्थनादी उपचार (ग्रह), मेंदूचे विकार, इंद्रियांची देखभाल (ऊर्ध्वांग), विषतत्त्वाचा निचरा, दंशोपचार (अगद), कायाकल्प (रसायन), बीजसंस्कार, वंध्यत्व उपचार (वाजीकरण) या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

श्रीगुरुजींनी कायम ‘शास्त्राला’ प्राधान्य दिलं, ‘सोयीला’ नाही. म्हणूनच आत्मसंतुलनमध्ये पंचकर्म असो, औषधोपचार असो की औषधनिर्माण, तडजोडीला स्थान नसतं. ४० घटकद्रव्ये असणाऱ्या औषधातील एखादं जरी द्रव्य हव्या त्या गुणवत्तेचे मिळालं नाही तर उत्पादन ‘होल्ड’वर ठेवण्यात येतं. स्वतःच्या जागेतील वनस्पती काढताना आयुर्वेदात सांगितलेल्या प्रार्थना केल्या जातात. फार्मसीमध्ये काही विशिष्ट प्रक्रिया समंत्र केल्या जातात. आजच्या काळातही त्यांना हे जमले कारण त्यांनी औषधे बनवली ती रुग्णाला बरं वाटावं म्हणून, त्याची रोगापासून सुटका व्हावी म्हणून! पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांत समतोल संगम साधण्याचे कौशल्य श्रीगुरुजींकडे होते. गुणवत्तेवर परिणाम होणार नाही, पण अनावश्यक श्रम वाचतील या दृष्टीने त्यांनी संतुलन फार्मसीत उपकरणे बनवून घेतली. कधी उत्पादनांची मागणी वाढली तर रात्रीचा दिवस करून काम केले, मात्र गुणवत्ता कधीच घसरू दिली नाही.

श्रीगुरुजींनी काळाची गरज कायम ओळखली. पंचकर्म हा शब्दही जेव्हा माहिती नव्हता तेव्हा शास्त्रशुद्ध पंचकर्माची सुरुवात केली; तूप म्हणजे काहीतरी भयंकर अशी समाजधारणा होती तेव्हा साजूक तुपाचे महत्त्व पटवले; गर्भधारणा होत नसली तर लगेच IUI, IVF करण्याचा पायंडा पडत असताना ‘गर्भसंस्कार’चा सुरक्षित पर्याय दिला; संगणक युगाला सुरुवात झाल्या झाल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ‘अंजन’ विकसित केले, कोरोना उंबरठ्यावर असताना प्रतिकारशक्तीसाठी ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला के२’ तयार केले.

कौरव-पांडवांच्या युद्धात शस्त्रास्त्रे, कुशल योद्धे दोन्ही पक्षांकडे होते, पण शेवटी पांडव विजयी झाले ते श्रीकृष्णांनी सांगितलेल्या चार युक्तींच्या गोष्टींमुळे. आयुर्वेदातील या ‘युक्ति’प्रमाणाचं श्रीगुरुजींना जणू वरदान मिळालेलं असावं. न मिळणाऱ्या वनस्पतींना शोधलेले समर्पक पर्याय, पंचकर्मामध्ये योग, संगीत, ध्यानाचा कल्पकतेने समावेश, औषध घेताना ते अधिक गुणकारी ठरावं यासाठी म्हटले जाणारे श्र्लोक अशा कितीतरी ‘युक्त्या’ त्यांनी योजल्या.

श्रीगुरुजींकडे आयुर्वेदाचा अभ्यास व अनुभव दोन्ही होते, हाताला गुण होता, शब्दांमध्ये आश्र्वस्त करण्याचे सामर्थ्यही होते. अवघ्या महाराष्ट्राचे ते खऱ्या अर्थाने ‘फॅमिली डॉक्टर’ होते. अनेक जण त्यांना ‘आधुनिक धन्वंतरी’ संबोधत. श्रीगुरुजी विश्र्वासाने सांगत, ‘एक काळ असा येईल, जेव्हा आयुर्वेद ही प्रमुख उपचारपद्धती असेल’. त्यांचा हा विश्र्वास प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्यांचे संस्कार, ज्ञान, मार्गदर्शन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संतुलन’ सदैव वचनबद्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com