
ब्रह्मध्वज हे मानवी शरीरात घडणाऱ्या सर्जनाचे प्रतीक आहे. गर्भधारणा झाल्यावर त्यातून मानवी शरीर तयार होताना प्रथम बारीकसा ठिपका असतो व त्याला बारीक शेपूट असल्यासारखे दिसते.
उत्सव सर्जनाचा...
ब्रह्मध्वज हे मानवी शरीरात घडणाऱ्या सर्जनाचे प्रतीक आहे. गर्भधारणा झाल्यावर त्यातून मानवी शरीर तयार होताना प्रथम बारीकसा ठिपका असतो व त्याला बारीक शेपूट असल्यासारखे दिसते. पुढे ठिपक्याचे मेंदूत व शेपटीचे मेरुदंडात रूपांतर होते. त्या ब्रह्मध्वजाला मान देत घरोघर ब्रह्मध्वज उभा करून नवीन सृष्टीच्या सुरुवातीचा व सर्जनाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा ऋषिमुनींनी सुरू केली.
छोट्याशा धान्याला फुटलेला कोंब हा सर्जनाचे निदर्शन करतो आणि हाच तो ब्रह्मध्वज. तो उभा राहिल्यानंतर, तो उगवल्यानंतर सृष्टीची उत्पत्ती होते. त्या ब्रह्मध्वजाला मान देऊन त्याची आठवण ठेवण्यासाठी घरोघर ब्रह्मध्वज उभा करून नवीन सृष्टीच्या सुरुवातीचा व सर्जनाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा ऋषिमुनींनी सुरू केली. ती सुरू राहिली आहे सामान्य माणसांमुळे, त्यांना होणाऱ्या आनंदामुळे. एकूण सामान्य माणसाच्या जीवनात या गोष्टी नसल्या, तर जीवन निरर्थक होऊन शरीर आजारपणाकडे व नाशाकडे जाईल हे लक्षात आल्यामुळे या विषयाबद्दल वैज्ञानिकांनी कितीही ऊहापोह व चर्चा केली, तरी त्यात तथ्य आहे की नाही याचा निर्णय लागला नाही, तरी एकूण सर्वसामान्य नागरिक या प्रकारचे उत्सव करत राहतात.
सर्जनाचे प्रतीक
या उत्क्रांतीच्या रूपकास ‘ब्रह्मध्वज’ हा शब्द वापरला आहे. यासाठी सर्वसामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे ‘गुढी’. गुढी उभी करणे म्हणजेच ब्रह्मध्वज उभा करणे. ब्रह्मध्वज हे माणसाच्या शरीरात घडणाऱ्या सर्जनाचे प्रतीक आहे. गर्भधारणा झाल्यावर त्यातून मनुष्याचे शरीर तयार होताना प्रथम बारीकसा ठिपका असतो व त्याला बारीक शेपूट असल्यासारखे दिसते. पुढे ठिपक्याचे मेंदूत व शेपटीचे मेरुदंडात रूपांतर होते. यानंतर हात-पाय फुटतात व संपूर्ण मनुष्य तयार होतो.
कृते च प्रभवे चैत्रे प्रतिपदा शुक्लपक्षगा।
मत्स्यरूपः कुमार्यग्य अवतीर्णो हरिः स्वयम्।।
अगदी सुरवातीला श्री विष्णूंनी मत्स्यरूप घेतले व त्याची उत्क्रांती होत होत कासव, वराह तयार झाले. यात शक्ती बदलत गेली. त्याचे प्रतीक आहे आज उभी केली जाणारी गुढी. या गुढीची प्रथा पारंपरिक आणि खूप बोध व ज्ञान देणारी आहे. गुढीला फुले, हळद-कुंकू, धणे, गूळ वाहून पूजा करण्याची परंपरा आहे. माणसाच्या मेरुदंडाच्या तळाशी मूलाधारात असते सुप्त कुंडलिनी शक्ती. मूलाधारात असलेल्या सुप्त शक्ती उत्क्रांत करत ती हलके हलके हृदयात आल्यावर त्या ठिकाणी तयार झालेल्या प्रेमाच्या शक्तीचे काय मोजमाप करणार? ही शक्ती वरच्या चक्रात आल्यावर म्हणजे मस्तकाच्या ब्रह्मरंध्रात आल्यावर तेथील ब्रह्मरसाचे प्राशन केल्यानंतर मनाला, तसेच शरीराला तृप्ती लाभते. या ठिकाणी ब्रह्मदंडाची पताका फडफडायला लागली की स्वतःचा अनुभव स्वतःला घेता येतो.
ब्रह्मदंडावर डोक्याचे निदर्शन करणारा कलश उपडा ठेवला जातो. कलश हे ब्रह्माचे (मेंदूचे) स्थान व खालचा बांबू हे ब्रह्मदंड असे मिळून गुढी तयार होते. घरोघरी अशा गुढ्या उभारल्या जातात. या गुढ्यांमुळे घराला वेगळीच शोभा येते. घरासमोर गुढी उभारावी, घरासमोर रांगोळ्या काढाव्यात, चांगले संगीत लावावे. सर्वांनी हसत-खेळत राहावे, कटू प्रसंग टाळावेत, एकमेकाला आनंद देत गोडधोड खावे, नवीन वस्त्र परिधान करावे, नव्या वस्तू विकत घ्याव्यात, व्यापार-उदिमाची सुरवात करावी. एकूण सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा व सकारात्मक विचार असल्यामुळे हा दिवस मंगल मुहूर्त म्हणून मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. मुहूर्त म्हणजे सर्वांचे त्या कृतीला मिळणारे पाठबळ, त्याच्यामुळे पुढे यश मिळणे सोपे होते. अशी सकारात्मक ऊर्जा ज्या दिवसाला असते त्याला मंगल दिवस म्हटले जाते.
ब्रह्मध्वज उभा केल्यावर कलशाच्या खाली ब्रह्मध्वजाच्या भोवती चारीही बाजूंना रेशमी वस्त्र गुंडाळले जाते, हे वस्त्र जणू कलशरूपी स्वर्गातून येणारी ऊर्जा सर्व शरीराला पुरवण्याचे व शरीरातून संवेदना मेंदूला पोचविण्याचे निदर्शक आहे. ब्रह्मध्वजाला कडुनिंब व आंबा यांच्या मंगल पानांची डहाळी बांधण्याची पद्धत असते. याला साखरेची माळ घातली जाते. नंतर ब्रह्मध्वजाची पंचोपचार पूजा केली जाते. दोन पळ्या पाणी वाहून नंतर हळद, कुंकू, गंध, अक्षता वाहून, विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून नंतर बत्ताशांचा नैवेद्य दाखवला जातो. ब्रह्मध्वजाच्या पूजनामुळे तयार होणाऱ्या मंगल वातावरणाचा परिणाम म्हणून घरात काही दिवस तरी आनंद नांदतो.
नैतिकतेची गुढी
भारतीय ऋषिमुनींनी सुरू केलेली ही गुढी उभारण्याची पद्धत व ब्रह्मध्वजाचे पूजन हे कुठल्या तरी युगात जगभर पसरले असावे. घराला तोरणे बांधणे, काठी उभी करून त्यावर नवोत्पादित धान्य व फुले बांधणे अशी पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते. अनेक प्रगत देशांतही सुशिक्षित व संशोधक मंडळी या परंपरा पाळताना दिसतात. गावात काही उत्सव असला, तर तेथील परंपरेप्रमाणे कपडे घालतात व आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात आणि पूर्वजांनी सुरू केलेल्या या परंपरांविषयी जगाला व एकमेकाला माहिती देतात. या परंपरा प्रत्येकाने कसोशीने पाळण्यातच सर्वांचे कल्याण आहे. उत्क्रांती पायरीपायरीने होत असताना नैतिकतेकडे लक्ष ठेवावे लागते. शेवटी बुद्धीचीच उपासना करावी लागते. कारण शक्तीला चालना देण्याचे, तिचा उपयोग करून घेण्याचे कसब व कला केवळ बुद्धीलाच साधलेली आहे, त्यामुळे बुद्धीची उपासना नेहमीच अग्रणी राहिलेली आहे.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित)
Web Title: Dr Balaji Tambe Writes Gudi Padwa Festival Hindu New Year 2022 Celebration
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..