स्मरण संस्कृतीचे... : झाले बहु, होतील बहु ....परी या सम हे

१९४० मध्ये ज्येष्ठ अष्टमीला वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेवशास्त्री आणि सौ. लक्ष्मीबाई तांबे यांच्या घरात श्रीगुरुजींनी जन्म घेतला आणि एका अद्‌भुत जीवनप्रवासाची सुरुवात झाली.
Dr Balaji Tambe
Dr Balaji TambeSakal

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांचं व्यक्तित्व अगदी असंच. त्यांचे विचार, त्यांचं कोणत्याही विषयातील ज्ञान, थेट हृदयाला स्पर्श करणारा स्वर, भारतीय संस्कृती, वेद, आयुर्वेद यांचा अभिमान, कोणतीही गोष्ट मनापासून आणि समरसून करण्याची वृत्ती, त्यांची प्रसन्न मुद्रा हे सगळंच असामान्य.

१९४० मध्ये ज्येष्ठ अष्टमीला वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेवशास्त्री आणि सौ. लक्ष्मीबाई तांबे यांच्या घरात श्रीगुरुजींनी जन्म घेतला आणि एका अद्‌भुत जीवनप्रवासाची सुरुवात झाली. घरात आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी संस्कारांच्या समृद्धीची उणीव नव्हती. श्रीगुरुजींवर षोडशसंस्कारांतील लहानपणी करायचे सर्व संस्कार यथासांग झाले. त्यांचं खरं नाव ‘भालचंद्र’ असलं तरी आईवडील प्रेमानं ‘बाळाजी’ म्हणत. श्रीगुरुजींचे बाबा सांगत, ‘लहान वयातही बाळाजीने कधी वेळ वाया घालवला नाही. सतत काही ना काही काम करत राहणे हा त्याचा सहजभाव होता.’ शाळेत असताना वडिलांनी घर बांधायला घेतलं तेव्हा विटा बसविण्यापासून ते भिंतीला रंग देण्यापर्यंत सगळ्या कामांत त्यांनी मदत केली. श्रमप्रतिष्ठेचा घरातून झालेला हा संस्कार त्यांना भविष्यात कायम मदतीला आला. आत्मसंतुलन उभं करताना सुरुवातीला ‘सेतू बांधा रे’ शीर्षकाखाली श्रीगुरुजींसह परिवारातील सर्व रोज एकत्र येऊन श्रमदान करत, आत्मसंतुलनची शोभा असणारा ‘मनमंदिर’ हा तलाव यातूनच साकारलेला आहे.

श्रीगुरुजींकडे माणसं जोडण्याची कला होती. प्रत्यक्ष संपर्कात न आलेल्यांनाही त्यांच्याबद्दल आज नितांत आदर आहे तो यामुळेच. त्यांचं नुसतं असणं हे सुद्धा आश्र्वस्त करणारं असे. श्रीगुरुजी हे खऱ्या अर्थाने उत्सवमूर्ती होते. जीवन नुसतं जगायचं नसतं, ते उत्सव म्हणून साजरं करायचं असतं, असं ते म्हणत आणि ते स्वतः असंच जगले.

त्यांनी स्वतःत आणि लोकांमध्ये आपल्या ज्ञानाचा, मोठेपणाचा पडदा कधीच येऊ दिला नाही. जात, धर्म, श्रीमंती, पद या सगळ्यांपेक्षा त्यांनी समोरच्या व्यक्तीतील भाव जाणला. म्हणूनच शाळकरी मुलीपासून उच्चशिक्षित व्यक्तीपर्यंत कोणालाही त्यांच्याबरोबर संवाद साधताना दडपण येत नसे. मंदिर असो, प्रदर्शन असो, विमानतळ असो की महाबळेश्र्वरमधील शॉपिंगची गल्ली असो, लोक त्यांना पाहून आनंदून जात, सेल्फीचा आग्रह धरत, आपणहून पाया पडत. अनेक युवक-युवती त्यांना भेटल्यावर ते कसे ‘कूल’ आहेत असं आश्र्चर्याने म्हणत.

त्यांच्यातील उत्साह, काम करण्याचा आवाका, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची उर्मी त्यांच्या वयाचा विसर पाडणारी होती. एका मागोमाग परस्परभिन्न विषयांवर निर्णय घेण्याची क्षमता असामान्य होती. वेळी-अवेळी विचारलेल्या प्रश्र्नाचं उत्तरही ते न कंटाळता देत. एखाद्याकडून चूक झाली तर ते रागावत परंतु पुढच्या क्षणी स्मितहास्य देऊ शकत.

प्रत्येक गोष्ट ते पूर्ण जाणिवेनिशी करत. लक्ष न देता कसं तरी काम उरकून मोकळं होणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. खांद्यावर घेण्यापूर्वी शालीची घडी कशी करावी, देवाला फुले कशी वाहावीत, जेवायचे ताट कसे वाढावे आणि अशा सगळ्या गोष्टी ते विलक्षण व्यवस्थितपणे करत. गोंधळ, गैरसमजातून निर्माण होणारा मनस्ताप त्यांना मुळीच पटत नसे. ‘मला वाटलं’ असं कुणी म्हटलेलं त्यांना चालत नसे. ‘वाटून घेण्याने परिस्थिती बिघडते, नातेसंबंध दुरावतात, त्यापेक्षा एक प्रश्र्न विचारणे सोपे’ असं ते सांगत.

‘संवेदना संवादे सहवेदना जपताना’ हा भाव त्यांच्यात कायम असे. कोणत्याही मंदिरात गेल्यावर मंदिराच्या बाहेर असणाऱ्या छोट्या टपरीवजा दुकानातून काही ना काही ते नक्की घेत. ते म्हणत, ‘भक्तांच्या सोयीसाठी यांनी दुकाने टाकली, आपण काही विकतच घेतलं नाही तर यांना चार पैसे कसे मिळणार? ’ दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीला त्यांना नुसतं भेटल्याने बरं वाटायला लागायचं ते याच भावामुळे. श्रीगुरुजींची कर्मभूमी असणाऱ्या आत्मसंतुलनमध्ये प्रवेश केल्याक्षणी मनावरचा ताण कमी होतो, आपोआप बरं वाटायला लागतं, हा अनुभव आजही येतो.

‘भिक्षापात्र अवलंबिणे, नको जिणे लाजिरवाणे’ याचा अवलंब त्यांनी कायमच केला, आत्मसंतुलन आत्मनिर्भर बनवलं. डाळ-तांदुळाच्या, दुधा-तुपाच्या, औषधे बनविण्याच्या आणि अजून कितीतरी बाबतीत आत्मसंतुलन स्वतंत्र आहे ते श्रीगुरुजींच्या दूरदृष्टीमुळे. आयुष्यात कधीही कोणाकडूनही त्यांनी डोनेशनची मागणी केली नाही. कोणाकडून मोफत ते कधीच घेत नसत.

श्रीगुरुजी कायम उत्स्फूर्त बोलत. बोलताना ते समोरच्या श्रोत्यांसह अक्षरशः एकरूप होत. मनातील न विचारलेल्या प्रश्र्नांचं अचूक उत्तर ते देतात, अशी चर्चा त्यांच्या सत्संगानंतर अनेकदा होत असे. एकदा एकाने यावर प्रयोग करायचा ठरविले. सत्संग सुरू असताना एकाने कागदावर इंद्रधनुष्याबाबत प्रश्र्न लिहिला, घडी घालून खिशात ठेवून दिला. आणि आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे बोलण्याच्या ओघात श्रीगुरुजी खरोखरच इंद्रधनुष्याचे सात रंग, त्यांच्या फ्रिक्वेन्सीज्, ॐ कार मंदिरावरचा सप्तरंगी ध्वज या बद्दल बोलले. सत्संगानंतर त्याने स्वतः ही गोष्ट सर्वांना सांगितली.

श्रीगुरुजींच्या संकल्पांना सिद्धी होती. ‘प्रयत्नांती परमेश्र्वर’ असं आपण म्हणतो, परंतु श्रीगुरुजींच्यामागे प्रत्यक्ष परमेश्र्वर उभा आहे व त्यांच्या कार्याला मदत करतो आहे असा विश्र्वास होत असे. कारण कधीही काही अडचण आली, स्वतःच्या परीने प्रयत्न करूनही सुटली नाही तर अनपेक्षित मदत दारात उभी राही. श्रीगुरुजींचं काम करणाऱ्या प्रत्येकालाही हाच अनुभव आधीही येत असे, आत्ताही येतो.

प.पू. श्री वासुदेवानंदसरस्वती महाराजांची एक प्रार्थना श्रीगुरुजी नेहमी म्हणत, ‘स्मर्तृगामी स माऽवतु’ म्हणजे सद्गुरु श्रीदत्तात्रेय स्मरण करताक्षणी प्रकट होतात व भक्ताचे रक्षण करतात. श्रीदत्तात्रेयांचा साक्षात्कार झालेले श्रीगुरुजी सुद्धा आपल्यातच आहेत, नुसतं त्यांचं स्मरण करण्याने आपल्या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरं मिळतील, त्यांचं अलौकिक जीवनकार्य युगानुयुगे पथदर्शी ठरेल.

श्रीगुरुजींच्या आवाजातील ॐ कार आणि इतर प्रार्थनांसह ‘सोम ध्यान’ झूमवरून दर १५ दिवसांनी शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आयोजित केले जाते. यात सहभागी होण्यासाठी ९६८९९२६००२ यावर ‘LINK’ असे लिहून पाठवावे ही विनंती.

(समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com