ज्ञानगंगे जे नाहते - शिवकथाकार देशमुख

साहित्य सम्राट न. चि. केळकरांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ बखरींच्या पानात नाही तर तो शाहिरांच्या कवनात आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSakal
Summary

साहित्य सम्राट न. चि. केळकरांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ बखरींच्या पानात नाही तर तो शाहिरांच्या कवनात आहे.

साहित्य सम्राट न. चि. केळकरांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ बखरींच्या पानात नाही तर तो शाहिरांच्या कवनात आहे. इतिहासातील प्रसंग, घटना किंवा स्थळ या संदर्भातील माहिती बखरीतून मिळू शकेल. पण, इतिहासाचे चैतन्यमय ओजस्वी रूप उभे राहते ते शाहिरीतून. केवळ ऐतिहासिक तपशील मांडणे म्हणजे इतिहास नाही, तर त्यातून राष्ट्रभावना जागविणे आणि राष्ट्रभक्ती चेतविणे हे इतिहासाचे खरे प्रयोजन ठरते. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील ओजस्विता, तर दुसरीकडे संशोधनातून मांडलेले ऐतिहासिक संदर्भ, यातून शिव चरित्राचा वेध घेत एक सर्व स्पर्शी वाङ्‌मयीन शिव दर्शन उभे राहते ते विजयराव देशमुख यांच्या ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथातून.

शिवराज्याभिषेक त्रिशताब्दीच्या निमित्ताने १९७४ मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या साक्षीने शिव चरित्र लेखनाचा संकल्प त्यांनी सोडला आणि ८ वर्ष सातत्याने देशी आणि विदेशी भाषांमधील जवळजवळ सर्व शिव चरित्र साधनांचा चिकित्सक अभ्यास करून शिवाजी महाराजांचे साधार व विस्तृत चरित्र इतिहासप्रेमी जनांसमोर ठेवले. अभ्यासपूर्ण मांडणी, भक्कम आणि अस्सल पुराव्यांचा आधार, ओघवती आणि ओजस्वी वाणी, प्रभावी वक्तृत्व तसेच ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे

तैसे ज्ञानाचे बोलणे |

आणि येणे रसाळपणे |

ज्ञानाचे बोलणे रसाळपणे मांडण्याच्या शैलीतून त्यांनी शिव चरित्र नुसते सांगितले नाही, तर शिव चरित्राचे चिंतनात्मक संकीर्तनच घडवले. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, बंगळूर एव्हढेच काय, पण परदेशातही शिव चरित्रावरील हजारो व्याख्याने देऊन महाराष्ट्राचा प्रभावी शिवकथाकार म्हणून त्यांना रसिक मान्यताही लाभली. त्यांच्या अभ्यासपूर्ण संशोधनामुळेच जिजाऊसाहेबांची जन्मतिथी आणि शिवजन्मतिथी जगासमोर आली. तसेच, त्यांनी सप्रमाण शोधून काढलेली फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारी १६३० ही शिवजन्मतिथी तारीख शासनानेही मान्य केली. ‘वैराग्याची छाटी हा इथला झेंडा होता’, ‘हर हर महादेव हा इथला मंत्र होता’, ‘हे राज्य श्रींचे हा इथला अढळ विश्वास होता’, ही हिंदवी स्वराज्याची त्यांनी केलेली व्याख्या किती समर्पक आहे हे लक्षात येते. शककर्ते शिवराय या ग्रंथाबरोबरच महाराजांच्या मुलुखात सिंहासनाधीश्वर, सिंदखेड राजा, राजा शंभु छत्रपती, सूर्यपुत्र, क्षत्रियकुलावतंस, समर्थ स्मरण, कीर्तन कौस्तुभ, हितोपदेश यासारखे त्यांचे ग्रंथ त्यांच्या अभ्यासाचे प्रज्ञा प्रतिभेचे आणि शिव चरित्राच्या आर्ततेचे द्योतक आहेत. त्यांचे गुरू श्री विष्णुदास महाराजांच्या प्रेरणेने पुढे ते पारमार्थिक कार्याकडे वळले. शुद्ध प्रयोगशील अध्यात्म, दत्त भक्तीचा प्रसार, उपासना केंद्रे संकीर्तन यातूनच एक इतिहास प्रबोधनकार ‘सद्‍गुरुदास’ या रूपात पारमार्थिक प्रबोधनकार म्हणून लोक जीवनात तितकाच प्रभावीपणे उभा राहिला. ही वाटचाल पाहता पुरुषार्थ आणि परमार्थाच्या दोन भक्कम तीरांमधून त्यांच्या जीवनाचा प्रवाह अमृताची अनुभूती घेऊन अखंड वाहतो आहे.

ज्ञानगंगे जे नाहले |

पूर्णता नेऊन घाले |

जे शांतीसी आले |

पालव नवे ||

ज्ञानदेवांच्या या रूपका प्रमाणे ते ज्ञानगंगेत न्हाऊन पूर्णत्वाची तृप्ती अनुभवत आहेत. आता सहस्त्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाला शांतीची नवी पालवी फुटो आणि या ज्ञानवृक्षाखाली दीर्घकाळ विसावण्याचे भाग्य लाभो ही शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com