गजानन महाराज प्रकट दिन : अन्न...परब्रह्म

श्री संत गजानन महाराज माघ वद्य सप्तमी शके १८०० दि.२३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह समयी तारुण्यावस्थेत असतांना प्रकट
gajanan maharaj prakat din 2022
gajanan maharaj prakat din 2022
Updated on

श्री संत गजानन महाराज माघ वद्य सप्तमी शके १८०० दि.२३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह समयी तारुण्यावस्थेत असतांना प्रकट झाले. ह.भ.प.संतकवी श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय ग्रंथात "शेगावी माघमासी|वद्य सप्तमी या दिवशी

|हा उदय पावला ज्ञानराशी|पदनता ते तारावया|ऐन तारुण्याभीतरी|

गजानन आले शेगाव नगरी|शके अठराशाभीतरी| माग वद्य सप्तमीला||"

असे वर्णन केले आहे.या घटनेला १४४ वर्षाचा कालावधी उलटला. श्री संत गजानन महाराजांनी प्रकट होतांना उष्ट्या पत्रावळीचे शोधन केले. उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली. या प्रसंगाचे वर्णन श्री दासगणू महाराजांनी अत्यंत समर्पक ओवीत केले आहे.

"ती समर्थाची स्वारी|बैसुनीया रस्त्यावरी

|शोधन पत्रावळीचे करी|केवळ निजलीलेने

|शीत पडल्या दृष्टिपत|ते मुखी उचलुनी घालीत|

हे करण्याचा हाच हेत|अन्न परब्रम्ह कळवावया||

" यातून "श्रीं" नी "अन्न हे परब्रम्ह" आहे, ते वाया घालू नका असा मोलाचा संदेश स्वतःच्या कृतीतून दिला.अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होतांना आपण नेहमी पाहतो. लग्नसमारंभासह विविध कार्यक्रमांत भोजनाच्या जेव्हा पंगती उठतात, तेव्हा पत्रावळीवर (ताटात) अन्न उष्टे टाकण्याची सवय अनेकांना जडलेली असते. जेवढे भोजन ग्रहण केले जाईल तेवढेच अन्न पानावर वाढून घेणे व ते संपविणे याचा कटाक्ष फार कमी जण पाळतात. श्रीगजानन महाराजांनी कृतीतून हा संदेश दिला असतानाही अन्नाची नासाडी होतांना आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी बघत असतो.

ही अन्नाची नासाडी म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे. एकीकडे आजही अनेकांना दोन वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही. अन्नासाठी दाहीदिशा अशी काहींची स्थिती आहे. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी काही कुटुंबे अपार कष्ट करतांना आपण पाहतो. त्यामुळे अन्नाची काय किंमत आहे हे त्यांना चांगले ठाऊक असते. त्यामुळेच श्री संत गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खाल्ली."

कांकी गर्जनो सांगे श्रुती|अन्न हेच ब्रह्म निगुती|

'अन्नम ब्रह्मोती' ऐसी ऊक्ती|उपनिषदांठायी वसे||

" उपनिषदात सुद्धा "अन्न हे परब्रम्ह" असा उल्लेख आल्याचे संतकवी दासगणू महाराजांनी लिहून ठेवले आहे. याचा अर्थ अन्नाची होणारी नासाडी थांबवणे हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला पाहिजे. श्री गजानन विजय ग्रंथाचे अवलोकन केले असता जीवनात मार्गदर्शक ठरणारे अनेक बोध यात दिसून येतात."श्रीं" च्या १४४ व्या प्रकट दिनानिमित्त गजानन भक्तांसह समस्त नागरिकांनी अन्नाची नासाडी जर थांबवली तर "श्रीं" च्या तत्त्वज्ञानाचे व कृतीचे अनुकरण समाजजीवनात होत आहे, असा अर्थ निघेल व राष्ट्राच्या विकासात एक प्रकारे तो हातभार ठरेल.

"अन्न हे ब्रह्म" आहे. आपण आपल्या आहारालाच अन्न समजतो, हे चुकीचे आहे. वास्तविक पाहता पृथ्वीवर राहणारे सर्व जीव अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नामुळे जगतात आणि अन्नातच विलीन होतात. अन्न मिळाले नाही तर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही. वनस्पती वृक्षांनाही अन्न लागते. जमिनीतून मिळणारे अन्न बंद झाले तर ते देखील जगू शकणार नाही. उपनिषदांनी अन्नाची महती गायली आहे. अन्नाची अवहेलना करू नका, असा संदेश उपनिषदाचा आहे. श्री गजानन महाराजांनी हे सत्य आपल्या उष्ट्या पत्रावळी वरील भातशीते खाण्याच्या कृतीतून दाखविले. त्यामुळे अन्नाची नासाडी थांबली पाहिजे. महाराजांच्या भक्तांनी हे आचरणात आणले पाहिजे."गजाननाचे भक्त म्हणविती|अन्न ब्रम्ह पायी तुडवती||" असे व्हायला नको.

''अन्नाप्रमाणेच पाण्याचाही सन्मान केला पाहिजे. अन्न व पाणी हे दोन्ही ब्रह्म रुपे आहेत. सध्या पाण्याची समस्या भीषण स्वरूपाची आहे. तेव्हा पाण्याची सुद्धा नासाडी थांबली पाहिजे.आपल्या गरजेपेक्षा आपण जास्त पाणी वाया घालवितो. आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी न वापरणे व वाया न घालविणे म्हणजे प्रत्यक्षपणे ईश्‍वराची पूजा करणे होय, असा संदेशही गजानन महाराजांनी दिला आहे.''

-प्रा.ऋषिकेश नानासाहेब कांडलकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com