Gauri Ganpati 2022: या वर्षी ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या तारीख, वेळ, पूजा विधी

अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं.
Gauri-Ganpati
Gauri-GanpatiEsakal

ज्येष्ठा गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे,त्यामुळे ज्येष्ठा गौरीच्या या तिन दिवसात स्वतः पार्वती माता माहेरपणाला येते अशी मान्यता आहे.

भाद्रपदाची चाहूल लागताच लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरु होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. यंदा भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 31 ऑगस्टला गणराज भक्तांच्या भेटीला येणार आहेत. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये गणपतीसह ज्येष्ठा गौरीचे सुद्धा आगमन होते. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विविध पद्धतीने केले जाते.


गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे, स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. यंदा महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचे आवाहन कधी आहे याची तारीख, वेळ व पूजा विधी आपण जाणून घेऊयात…अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. या वर्षी 3 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन व 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. 4 सप्टेंबर गौराईचे पूजन केले जाणार आहे.

Gauri-Ganpati
Ganpati 2022: बाप्पाला वाहल्या जाणाऱ्या ‘दुर्वां’चे हे आहे खास आरोग्यदायी महत्त्व

आता बघू या पंचांगानुसार ज्येष्ठागौरी पूजन तिथी

ज्येष्ठा गौरी आवाहन तारीख: 3 सप्टेंबर (शनिवार )

वेळ: रात्री 10 वाजून 56 मिनिटांपर्यंत

ज्येष्ठा गौरी पूजन तारीख: 4 सप्टेंबर (रविवार)

ज्येष्ठा गौरी विसर्जन तारीख: 6 सप्टेंबर (सोमवार)

वेळ: रात्री 7 वाजून 05 पर्यंत


अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन करुन नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जन होतं. गौरीपूजन यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.

एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.

Gauri-Ganpati
Ganpati Decoration Ideas 2022: घरच्या घरी 'या' सोप्या आयडिया वापरून करा गणपती बाप्पासाठी खास सजावट

पूजा विधी

हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये परंपरेनुसार धातूची, मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात. गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात. थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात.

महापूजनात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळवतात. हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी,16 चटण्या,16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात.संध्याकाळी हळदी-कुंकवाचा समारंभ केला जातो.अनेक जागी रात्री झिम्माफुगड्या,घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते. तिसर्‍या दिवशी खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com