
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस.
गुढीपाडवा (Gudi Padwa) हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा विविध अंगानी महत्त्वपूर्ण मानला जातो. किंबहुना काही संतांनीदेखील आपल्या रचनांमध्ये गुढीचा उल्लेख केला आहे. चला तर मग, संत साहित्यात गुढीपाडव्याचा संतांनी काय उल्लेख केलाय ते जाणून घेऊयात.
गुढी: एक प्रतीक-
भारतीय संस्कृतीमध्ये चिन्हांना आणि प्रतीकांना खूप महत्त्व आहे. आपण स्वस्तिक , ओम काढतो यांना खूप महत्त्व आहे. भगवंताची स्वाक्षरी म्हणजे ओम आहे, असं मानलं जातं. भगवंताला पाहायचं असेल तर ते ओममध्ये पाहावं, असं म्हटले जाते. जसं ओम हे एक चिन्ह आहे. तशीच गुढी ही एक प्रतीक आहे. या प्रतीकाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमांनी झालेला आहे. संत साहित्य, भगवतगीता यांमध्येही या प्रतीकांचा उल्लेख आढळतो.
माझा जन्म किंवा अवतार का झाला? या अवतारामागचे प्रयोजन काय, हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात,
"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत | अभ्युत्थानमघर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् || धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||
म्हणजेच, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मी हा अवतार घेतला आहे.
भगवतगीतेच विवेचन करताना संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये भगवतांचा जन्म किंवा अवतार कशासाठी आहे, हे सांगताना म्हणतात,
''अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी| सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी||"
याचाच अर्थ, सज्जनांकडून सुखाची गुढी उभी करण्यासाठी मी वारंवार जन्म घेतो.
गुढीचे वेगळे महत्त्व-
गुढीला भारतीय संस्कृतीमध्ये, आध्यात्म शास्त्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे प्रतीक मानलेलं आहे. संत ज्ञानेश्वरांचा एक सुंदर अभंग आहे. त्यात माऊली म्हणतात, त्या पाडुंरंगाला भेटण्यासाठी ही गुढी मी खांद्यावर घेऊन नाचत नाचत पंढरीला जाईन. वारकऱ्यांच्या भगवी पताकेची गुढी एका खांद्यावर घेऊन जाईन. वाळवंटामध्ये ही गुढीच प्रतीक आहे. यावेळी संत चोखाबा यांनीसुद्धा सुंदर विवेचन केलेलं आहे, ''टाळी वाजवावी गुढी उभारावी| वाट ही चालावी पंढरीची|''
सानेगुरुजी म्हणायचे, पंढरपूरचा विठोबा कोण आहे, तर महाराष्ट्राच्या जनशक्तीचा तो मुका अध्यक्ष आहे आणि त्याचा दरबार कुठे भरतो, तर सर्वसामान्य जिथे एकत्र येतात त्या वाळवंटात भरतो. हे वाळवंट समतेचं आहे, या समतेच्या वाळवंटामध्ये सर्व वारकरी एकत्र आलेत. जाती धर्म विसरलेत, एकची टाळी झाली आणि समतेची गुढी उभी राहिली, म्हणून चोखोबा सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये संत झाले. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या संदर्भाने ही गुढी कधी भगवतगीतेच्या माध्यमातून तर कधी माऊलींच्या विवेचनातून, ज्ञानेश्वरीतून तर कधी चोखोबांच्या आत्मप्रवृत्तीतून ही गुढी आपल्या समोर येते आणि आपल्याला एक वेगळाच आयाम देऊन जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.