
माझी आणि बाबांची पहिली भेट बाबांनी घेतलेल्या एका व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात साधारण २७ वर्षांपूर्वी झाली. तेव्हा मी बारावीत शिकत होते. ‘योगासन म्हणजे फक्त व्यायाम’ असा समज घेऊन मी या शिबिरात दाखल झाले. तिथला मोकळेपणा, साधेपणा आणि जोडीला बाबांचे प्रेमळ मार्गदर्शन यामुळे मनातील भीती, शंका दूर होऊन योग साधनेविषयी गोडी वाटू लागली. नंतर माझे पुढील शिक्षण, नोकरी, संसार यातील व्यग्रतेमुळे साधनेत काहीकाळ खंड पडला.
एकीकडे दैनंदिन ताणतणाव मात्र वाढतच होते. त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत होता. त्या दरम्यान योगाद्वारे ताणाचे नियोजन कसे करावे, या विषयावरील बाबांचे ‘योग आणि मन’ हे पुस्तक वाचनात आले. योगाद्वारे ताणाचे नियोजन कसे काय होऊ शकते, असा प्रश्न घेऊन मी पुन्हा एकदा बाबांना भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजात योगसाधना सुरू केली. ध्यान, ध्यानमय आसने आणि ध्यानमय जीवन ही त्रिसूत्री अंतर्भूत असलेल्या अभिजात योगसाधनेमुळे मनावरचा ताण कमी होऊ लागला आणि त्याचा सहज परिणाम म्हणून माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले. दैनंदिन योग साधना करताना बाबांशी वेळोवेळी साधनेविषयी बोलणे होत होते. त्या संवादातून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत गेली, की बाबा कधीही उपदेश करत नाहीत.
त्यांची मते कोणावर लादत नाहीत. उलट, ते नेहमीच आम्हा सर्व योग साधकांना विचार करण्याचं, प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य देतात. बाबा नेहमी म्हणतात की, योग म्हणजे नुसता व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे. इतकच म्हणून ते थांबत नाहीत, तर योग जीवनात उतरवण्याविषयी सूक्ष्म मार्गदर्शन तळमळीने करतात. त्यामुळे योग जगणाऱ्या साधकांचा एक छानसा परिवार विकसित होत आहे. बाबांचे आणि सर्व साधकांचे गुरू-शिष्य नाते अतिशय साधे, दडपण विरहित आणि मैत्रीपूर्ण आहे. ज्ञानाचा अथांग सागर असणारी ही आमची गुरुमाऊली आम्हा साधकांवर मुक्तहस्ताने ज्ञानाची उधळण करत आहे. तिच्याविषयी गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता व्यक्त करते आणि अशी गुरुमाऊली मला लाभली म्हणून ईश्वराचे आभार मानते.
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ किंवा ‘व्यासपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गुरूंविषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. खरंतर अनेक नाती आपल्या परिचयाची असतात. पण, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य नातं सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मी अशाच एका गुरू-शिष्य परंपरेची घटक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आत्मयोग गुरू डॉक्टर संप्रसाद विनोद हे गुरू म्हणून लाभले, हे मी माझे भाग्यच समजते!
- प्रज्ञा दीपक केळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.