परमेश्‍वराचे आश्‍वासन

प्राण नसला तर काहीच नसते. जणू काही जगण्याच्या विशेष संकल्पनेला प्राण म्हणतात आणि प्राण हे भगवंतांनी दिलेले आश्‍वासन आहे
human made of atma spirituality significance god
human made of atma spirituality significance godSakal

सध्याच्या जगात मनुष्यमात्राला अनेक आश्‍वासनांवर भिस्त ठेवून जगावे लागते. राजकारण्यांकडून मिळालेल्या आश्‍वासनांची पूर्तता बहुतेक होणार नाही हे लक्षात घेऊन स्वतः जबाबदारी घ्यावी लागते. मनुष्याचे जीवन प्राणशक्तीवर बेतलेले असते.

प्राण नसला तर काहीच नसते. जणू काही जगण्याच्या विशेष संकल्पनेला प्राण म्हणतात आणि प्राण हे भगवंतांनी दिलेले आश्‍वासन आहे, ‘जोपर्यंत प्राणाची उपासना, प्राणाशी संबंध, प्राणाशी जवळीक राहील तोपर्यंत जीवन व्यवस्थित चालेल’ या परमेश्‍वराच्या आश्‍वासनावर जीवन निर्धास्त चालू राहते.

परमेश्‍वर आश्‍वासन देऊन तर मोकळा झाला, पण मनुष्याने त्या आश्‍वासनाची आठवण ठेवली नाही तर प्राणशक्तीपासून दूर जायला वेळ लागत नाही. परमेश्‍वराचा संकेत, प्राणशक्तीचा नियम आणि निसर्ग हे एका अत्यंत काटेकोर नियमात चालत राहतात.

त्यात कुठल्याही तऱ्हेची अनैसर्गिकता आली की दिलेले आश्‍वासन मोडण्याची मुभा परमेश्‍वराला असते. मेंदू हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हे आपल्या सर्वांना माहिती असते. परंतु श्‍वसन न मिळाल्यास मेंदूचे अस्तित्व चार मिनिटांपलीकडे नसते.

हृदय हा अवयव तर अत्यंत लाडका, आवडता व महत्त्वाचा, कारण हृदयातच प्रेम असते, सर्व शरीराला रक्तपुरवठा हृदयामार्फतच होतो आणि सर्व तऱ्हेच्या संवेदना आपण हृदयामार्फत जाणीवेत आणतो हे जरी खरे असले तरी रक्तच मिळाले नाही तर हृदय काय करणार?

अन्नापासून तयार झालेल्या रक्तातला कामाचा भाग वापरून रक्त लगेच फेकून द्यावे लागले असते तर मनुष्याला चोवीस तास खात राहावे लागले असते (अर्थात एवढे अन्न पचले असते की नाही हा भाग वेगळा).

म्हणून आहारापासून तयार झालेले रक्त पुन्हा पुन्हा प्राणमय करून पुन्हा पुन्हा वापरत राहणे एवढा एकच मार्ग शरीरापुढे उपलब्ध असतो व यासाठी शरीराला फुप्फुसांची गरज असते. फुप्फुसे श्‍वसनसंस्थेचा मुख्य आधार आहे.

तेव्हा बाहेरून आत येणाऱ्या हवेत (सर्वांना हवीहवीशी असते म्हणून हवा म्हणत असावेत) असतो प्राणवायू आणि प्राणवायूमध्ये असतो प्राण, जो सर्वांत महत्त्वाचा आहे. हवेत प्राणवायू, नायट्रोजन, हायड्रोजन वगैरेंचे प्रमाण किती आहे यांचे गणित वैज्ञानिकांना माहिती आहे,

पण त्यात असलेल्या प्राणाची उकल अजून कुणालाच झालेली नाही. हा प्राण काय आहे? तो समजून कसा घ्यायचा? त्याच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? तो अधिक आकर्षित कसा करायचा? तो आपल्या नियंत्रणात कसा ठेवायचा, हे मात्र कुणालाच कळलेले नाही.

व्यवस्थित गर्भधारणा होऊन व नऊ महिने व्यवस्थित गरोदरपण होऊनही प्रसूतीच्या वेळी प्राणहीन मूल का बाहेर आले याची कारणमीमांसा कुणालाच उमजत नाही. प्राण शरीरात केव्हा व का येतो, प्राण शरीर सोडून का जातो याचे अनेक आडाखे बांधता येतात, पण सत्य समजले असे म्हणता येत नाही.

अशा या प्राणाचे आकर्षण, संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते, कारण या प्राणावरच आयुष्य चालते, याच्या जोरावरच मनुष्य जिवंत असतो व कार्य करतो. म्हणून उठता, बसता, खाता, पिता, झोपता परमेश्‍वराचे नाव घेऊन जीवन सार्थकी लावावे असे बरेच संत सांगतात.

विशिष्ट मंत्रोच्चाराने विशिष्ट कार्य सिद्ध होऊ शकते असे म्हटले तर त्याचे कारण श्‍वसन व त्याचे नियम यावरच अवंलबून असते. म्हणून योगशास्त्रात (ज्यात जड व चैतन्य, शरीर व प्राण यांना जोडण्याची क्रिया केली जाते) प्राणायामाचे महत्त्व अवर्णनीय आहे. हवा आत घेणे, बाहेर सोडणे ही श्‍वसनाची क्रिया सतत चालूच राहते.

श्‍वसनावर लक्ष न ठेवल्यास परमेश्‍वराने दिलेल्या आश्‍वासनाचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून श्‍वसनावर लक्ष ठेवणे ही प्राणायामाची पहिली पायरी असते. मग प्राणायामाद्वारे किती श्‍वास आत घ्यायचा किती सोडायचा, त्यात असलेला प्राणवायू रक्तात शोषण होऊन रक्तशुद्धी करून शरीराला फायदा मिळण्यासाठी किती वेळ आत ठेवायचा,

याच्याच बरोबरीने चैतन्य सर्व शरीरभर कसे पसरेल व प्राणशक्तीचा लाभ होईल यावरही लक्ष ठेवावे लागते. प्राण ही जीवनशक्ती आपल्या दृश्‍य जगताच्या पलीकडची आहे. त्या प्राणाची नीती किंवा आयाम याचा अभ्यास म्हणजे प्राणायाम.

प्राण प्रकट होतो श्‍वासातून म्हणजेच श्‍वासाबरोबरील वायुतत्त्वाधारे. या वायुतत्त्वाचे बीज ‘यं’. तेव्हा या वायुतत्त्वाद्वारे प्राणापर्यंत पोचण्याच्या अभ्यासाला म्हणतात प्राणायाम (प्राण+यम्‌). प्राणायामाने प्राणादी पंचवायूंचे संतुलन साधता येणे शक्य असते.

प्राण, उदान, व्यान, समान व अपान हे पंचप्राण आपापली कामे व्यवस्थित करत असले की महास्रोत (मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग) निरोगी राहतो, हृदयाला पुरेशी प्राणशक्ती मिळाली की रक्ताभिसरण हवे तसे होऊ लागते आणि फुप्फुसांचीही शुद्धी होते. वाढते प्रदूषण, धूर, हवेतील विषारी द्रव्ये या सर्वांचा अनिष्ट परिणाम शरीरावर व फुप्फुसांवर होऊ द्यायचा नसेल तर प्राणायामादी श्‍वसनक्रियांचा नियमित अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

श्‍वसनाचे विकार झाले की जीव खरोखर मेटाकुटीला येतो, कारण अशा वेळी श्‍वास आत पूर्ण जाऊ शकत नाही व गेला तरी रक्त शुद्ध करू शकत नाही किंवा प्राणशक्ती देऊ शकत नाही. अशा अवस्थेत बिकट अवस्था प्राप्त झाली तर काही नवल नाही.

अशा अवस्थेत त्वचा काळी होणे, जीव घाबरा होणे, रक्त कमी असणे वगैरे व्याधी उत्पन्न होऊ शकतात. अशी अवस्था येऊ नये या हेतूने प्रत्येकाने प्राणायाम, भस्त्रिका यांचा अभ्यास नियमाने करणे आवश्‍यक असते. मनुष्य थकला, धावला, रागावला, त्याने आरडाओरडा केला, मोठ्या आवाजात बोलला की त्याच्या श्‍वासाची गती बदलते.

तेव्हा संथपणे श्‍वास घेत राहणे, शक्तीचा अपव्यय टाळणे हा झाला व्यावहारिक प्राणायाम. प्राणायामामुळे साध्या साध्या क्षुद्र रोगांवर तर मात करता येईलच, परंतु दम्यासारख्या अवघड रोगांवरही मात करता येईल. शिवाय प्राणाचा संबंध मनाशी असल्यामुळे प्राणायामामुळे मनःशक्ती वाढून मन शांत होईल.

एकंदरीत प्राणायामाचा उपयोग केवळ रोगनिवृत्तीसाठी न होता इतरही व्यावहारिक फायदे मिळून मनुष्य यशस्वी होऊ शकेल. प्राणायामाच्या प्रकारात श्‍वास आत घेणे, काही काळ आत धरून ठेवणे व सोडणे अपेक्षित असते.

सुरुवातीला डाव्या बाजूने श्‍वास घेऊन उजव्या बाजूने सोडणे आणि उजव्या बाजूने श्‍वास घेऊन डाव्या बाजूने सोडणे अशी प्राथमिक प्रक्रिया करणे इष्ट असते. त्यानंतर दूषित श्‍वास बेंबीपासून जोरात बाहेर

टाकणे व पोकळी उत्पन्न करून तेवढ्याच जोराने श्‍वास आत ओढून घेणे अशा भस्त्रिकेद्वाराही फायदे मिळू शकतात. तेव्हा प्राणायामाद्वारे आपण जीवनाच्या यशस्वितेचे आश्‍वासन मिळवू या किंवा श्‍वसनाचे नियम पाळून परमेश्‍वराच्या आश्‍वासनाचा लाभ घेऊ या.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com