
जीवनविद्या मिशनचे प्रणेते, थोर तत्त्वचिंतक, समाजसुधारक, सर्वसामान्यांचे सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या वैचारिक कार्याची ओळख करून देणारा लेख.
प्रल्हाद वामनराव पै
सद्गुरू वामनराव पै म्हणजे आमचे लाडके अप्पा. आप्पांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा लेख लिहिताना आतापर्यंतचा सर्व काळ झरझर डोळ्यासमोरून जात आहे. बालपणी आम्हालाही वडिलांसोबत खूप वेळ घालवावा असं वाटत असे. मात्र आप्पांनी यासाठी फक्त रविवार राखून ठेवला होता. बाकी सर्व दिवस ते समाजप्रबोधनाच्या कामात असत. सरकारी नोकरी सांभाळून, घरातील जबाबदाऱ्या पार पाडत, आमच्यावर अचूक संस्कार करत त्यांनी स्वीकारलेले हे विश्व सुखी करण्याचे व्रत पुढे नकळत आमच्या अंगातही भिनत गेलं.
विश्वातील प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, आपल्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, असा ध्यास घेतलेले हे सेवाव्रती व्यक्तिमत्व. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, निराशावाद आणि दैववाद पाहून त्यांना वाईट वाटायचं. आपण काहीतरी करायला हवं, या प्रेरणेतूनच या वैचारिक परिवर्तनाला सुरूवात झाली.
अर्थशास्त्रात पदवी घेतल्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामध्ये नोकरी स्वीकारली. ‘कामावर प्रेम करा’, असा इतरांना संदेश देण्यापूर्वी त्यांनी स्वतः ते कसं करायचं हे दाखवून दिलं. प्रामाणिकपणे काम करत, सुखाचा संसार करत त्यांनी प्रबोधनाचा हा वसा आयुष्यभर निस्वार्थीपणे सांभाळला. समाजप्रबोधनासाठी श्रीसदगुरूंनी १९५५मध्ये नामसंप्रदाय मंडळाची स्थापना केली. ही संस्था आज ‘जीवनविद्या मिशन’ या नावाने एक शैक्षणिक, सामाजिक आणि सेवाभावी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे.
दारिद्र्यामुळे आर्थिक विवंचनेत असल्याने लोक व्यसनांत अडकत होते. दुःख आणि समस्यांचा विचार करून, आपल्या ऋषीमुनींच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून, संताची शिकवण आचरणात आणून, स्वतःला आलेले अनेक अनुभव, त्यांचे सखोल चिंतन आणि त्यांच्या सदगुरूंची त्यांच्यावर झालेली कृपा यातून त्यांनी या तत्त्वज्ञानाची निर्मिती केली.
जीवनविद्येचे तत्त्वज्ञान धर्मातीत, वैश्विक आहे. निसर्गनियमांवर अधिष्ठित, विज्ञाननिष्ठ, तर्कशुद्ध, बुद्धिनिष्ठ, अनुभवसिद्ध आहे. गरीबांना वरदान, श्रीमंतांना आधार आणि विश्वाला उपयुक्त अशा या तत्त्वज्ञानात मानसशास्त्र, परामानसशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा सुरेख मेळ आहे. या तत्त्वज्ञानात माणसाच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतात, ज्यामुळे मानवजातीला सुखी करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. म्हणूनच नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून, आपण घडवू तसे नशीब घडेल, ही शिकवण देणारा श्रीसदगुरूंचा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा संदेश आज या तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र ठरत आहे.
‘जीवनविद्या’ ही संसार आणि परमार्थ दोन्ही सुखाचा करण्यास शिकवणारी विद्या आहे. लोक नामस्मरण करत नाहीत म्हणून मग सद्गुरूंनी पुढे विश्वकल्याणकारी प्रार्थनेची निर्मिती केली. तीमुळे लोकांकडून नकळत नाम आणि शुभचिंतन घडू लागलं. आज लाखो लोक ही प्रार्थना म्हणून त्यातून होणाऱ्या सुपरिणामांचा अनुभव घेत आहेत.
सद्गुरूंनी आयुष्यभर निःस्वार्थ भावनेने कार्य केलं. पण कधीच प्रवचनांसाठी बिदागी घेतली नाही, की स्वतःच्याच पुस्तकांसाठी रॉयल्टीदेखील स्वीकारली नाही. सदगुरू ही पदवीही त्यांनी लोकाग्रहास्तव स्वीकारली. त्यांच्या प्रयत्नवादाचे महत्त्व समजल्याने अभ्यास न करणारी अनेक मुले पुढे अभ्यासाकडे ओढली जाऊन उच्चशिक्षित झाली. अनेकांना नोकरी-धंद्यांत यश मिळू लागलं. घरातील स्त्रीचं महत्त्व पटल्याने घरात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळू लागली. संस्कार मिळाल्याने मुलं सर्वार्थाने प्रगतिपथावर जाऊ लागली. वाया जाणारा पैसा वाचल्याने लोकांच्या घरात सुबत्ता येऊ लागली.
अनेक व्यसनाधीन माणसांची व्यसने सदगुरूंच्या एका प्रवचनातही सुटलेली आहेत. सदगुरूंच्या मनात लोकोद्धाराची तळमळ इतकी होती, की निवृत्तीनंतर त्यांनी या कामात अक्षरशः वाहून घेतलं. या कार्यासाठी त्यांना सावलीसारखी साथ दिली ती आमची आई शारदामाईने. सदगुरूंनी जीवनविद्येचा प्रचार प्रसार सातासमुद्रापारही केला, त्यामुळे आज भारताबाहेरही जीवनविद्येची पाळंमुळं रुजली गेली आहेत. जीवनविद्येचं हे तत्त्वज्ञान पिढ्यान् पिढ्या लोकांना मिळावं, यासाठी लोकाग्रहास्तव सदगुरूंनी कर्जत येथे ‘जीवनविद्या ज्ञानपीठा’ची निर्मिती केली. ज्ञानपीठाच्या निर्मितीनंतर तृप्त अंतःकरणाने माझ्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवत त्यांनी २०१२मध्ये देह ठेवला.
सदगुरूंचं महानिर्वाण हे पै कुटुंब आणि जीवनविद्या कुटुंबातील सर्वांसाठी धक्कादायक होतं. लोकांना जीवनविद्या तत्त्वज्ञान सहज समाजावं यासाठी मी सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विविध अभ्यासक्रम निर्माण केले. आज हे सर्व अभ्यासक्रम (कोर्स) देश- विदेशात मूलभूत बदल घडवण्याचे काम करीत आहेत.
अमेरिकेतही ‘जीवनविद्या मिशन’चे केंद्र निर्माण झाले आहे. भारताबाहेर या मार्गदर्शनासाठी मागणी वाढत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांत ‘कॉन्फरन्स कॉल’द्वारे प्रचार प्रसार सुरू आहे. जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जग सुखी व्हावे, हा सद्गुरूंचा संकल्प पूर्ण होताना दिसत आहे. गेली तीस वर्षे मी या कार्यात आहे. मागे वळून पाहताना फक्त ज्ञानातून झालेली ही सामाजिक क्रांती पाहताना मन भारावून जातं.
सदगुरूंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांना अभिप्रेत असलेला प्रत्येक कृती राष्ट्रहिताची व विश्वशांतीची हा संकल्प आम्ही केला आहे. त्यानुसार वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. यानिमित्त वर्षभरातील उपक्रमातून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक गावांत प्रत्यक्ष जात ग्रामसमृद्धीचे कार्य केले जाणार आहे. या सर्व उपक्रमाची सांगता आम्ही एका मोठ्या भव्य दिव्य स्टेडियममध्ये करणार आहोत. जिथे एक लाख लोकांच्या उपस्थितीत विश्वप्रार्थनेचा जयघोष केला जाणार आहे. या विश्वप्रार्थना जपातून निर्माण होणारी ऊर्जा विश्वशांतीसाठी उपयुक्त ठरेल.
(लेखक ‘जीवन विद्या मिशन’चे आजीव विश्वस्त आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.