esakal | महाराष्ट्रातील शक्तिपीठे | Shaktipeeth
sakal

बोलून बातमी शोधा

Shaktipeeth
महाराष्ट्रातील शक्तिपीठे

महाराष्ट्रातील शक्तिपीठे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- कल्पना रायरीकर

‘शक्तिपीठ’ याचा अर्थ जेथे जेथे शक्तितत्त्व प्रकट झाले ते स्थळ. सर्व देवांचे सामर्थ्य एकत्र होऊन ते तत्त्व स्त्रीरूपामध्ये, सामर्थ्यशाली स्त्रीरूपामध्ये प्रकट झाले. दैत्य, असुर संहारासाठी ते शक्तितत्त्व तयार झाले होते. भारतभर काही ठिकाणी अशा मूर्तींची स्थापना झालेली दिसते.

पुराणामध्ये शिव आणि पत्नी सती यांची कथा येते. प्रजापतीदक्षाच्या यज्ञात सतीने स्वतःची आहुती दिली, त्यामुळे क्रोधित आणि दुःखी झालेल्या शिवाने सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन भ्रमण करण्यास सुरुवात केली. सतीच्या देहाचे अवयव इकडे-तिकडे पृथ्वीवर पडले. असे अवयव पडले तेथे शक्तिपीठ तयार झाले. अशीच दुसरी श्रद्धा आहे, की आदिमायेने अनेक रूपे घेतली त्यामुळेच हे जग निर्माण झाले. त्याच्या रक्षणासाठी आदिमाया रक्षणकर्तीही झाली. मातृरूपापासून हा प्रवास सुरू होऊन विद्याकलादात्री, धनदात्री, रक्षणकर्ती असे टप्पेही झाले. अशा देवींची स्थाने महाराष्ट्रातही आहेत.

माहूरगडची रेणुकामाता

नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे रेणुकामातेचे स्थान. त्याला ‘मातापूर’ असेही म्हणतात. इथे दुसरीही एक कथा सांगितली जाते. पिता जमदग्नी ऋषींच्या सांगण्यावरून परशुरामाने आपली माता रेणुका हिचा वध केला. तिचे शिर येथे पडले. नंतर जमदग्नींकडून वर मागून परशुरामाने तिला जिवंत केलेही. तेव्हा तिने फक्त मुखरूपाचे दर्शन दिले. या कथेचे मूळ आहे रेणुकामातेच्या प्रतिमेमध्ये. मंदिरात मातेची पूर्ण मूर्ती नाही. एका शिळेवर रेणुकामातेचा फक्त शिरोभाग आणि चेहरा कोरलेला दिसतो. चेहऱ्यावर शेंदराचा लेप आहे. नाक, डोळे, तोंड आहे. शिरावर चांदीचा मुकुट आहे. मंदिर यादवकाळात १३ व्या शतकात बांधले गेले असावे; परंतु १५ व्या शतकात त्याच्या स्थापत्यामध्ये बदल झाला.

वणीची सप्तशृंगी माता

नाशिक जिल्ह्यात वणी (ता. कळवण) हे गाव आहे. या भागात सातमाळ अजंठा डोंगररांगा आहेत. यापैकी एका उंच डोंगरावर सप्तशृंगी मातेचे स्थान आहे. वणी हे लहान गाव पायथ्याशी आहे. सप्तशृंग म्हणजे सात डोंगरशिखरे. ही देवी शिखरांच्या परिसराची आहे. येथेही सतीची कथा आहे. येथे सतीचा उजवा हात पडला होता, असा पुराणात उल्लेख आहे. या देवीचे एक नाव ब्रह्मस्वरूपिणी असे आहे आणि ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून ती प्रकट झाली असेही मानले जाते. याशिवाय महिषासुराला तिने दुर्गारूपाने मारल्याची कथाही आहे. प्राचीन काळाचे हे मंदिर आता वेगळ्या रूपामध्ये आहे. वरच्या मजल्यावर देवीचे स्थान आहे. काळ्या खडकात देवी प्रतिमा कोरलेली आहे. ही देवी १८ हातांची देवी आयुधांसहित आहे.

तुळजापूरची भवानीमाता

तुळजापूर हे स्थान २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थानात होते. निजामाच्या पराभवानंतर हा परिसर महाराष्ट्रात समाविष्ट झाला. तुळजापूर आणि भवानीमाता मंदिर याविषयी अश्‍मयुगीन आणि मराठा इतिहास काळामधील कागदपत्रांमध्ये संदर्भ मिळतात. तुळजापूरच्या भवानीमातेचे स्तोत्र, शाहीर अज्ञानदास यांचा पोवाडा परमानंद यांचे ‘शिवकाव्य’ यामध्ये हे उल्लेख आहेत. मंदिराच्या दक्षिणेच्या दरवाजावर धातूपत्र्यावर कोरीव लेख दिसतो. जगदेव परमार याने देवीपुढे आत्मसमर्पण केले, असा उल्लेख त्यामध्ये आहे. भवानीमातेचे मंदिर बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये आहे. एका दरीत किंवा डोंगरउतारावर असल्यामुळे पायऱ्या उतरून मंदिरात जावे लागते. काही संशोधकांच्या मते, इसवी सनाच्या १३ व्या शतकात करम्ब राजाने मंदिर बांधले. मंदिराला संरक्षक भिंत आहे आणि भव्य प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा गाभारा प्राचीन वाटतो. मंदिरातील देवीची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. ती अष्टभूजा असून, आठ आयुधे आहेत. तिने असूराला पायाखाली दाबून ठेवले असून, हाताने त्याचे मुंडके, केस वर धरून ठेवले आहेत. पायाशी सिंह आहे. मूर्तीवर सुबक अलंकार कोरलेले आहेत. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांमध्ये ही कुलदेवता म्हणून पूजली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचीही कुलस्वामिनी होती. मराठा इतिहास काळामध्ये ती स्वातंत्र्यदेवता म्हणून पूजली जाऊ लागली. महाराष्ट्राचा मानबिंदूच समजली जाऊ लागली.

कोल्हापूरची महालक्ष्मी

कोल्हापूर किंवा करवीर क्षेत्र म्हणून हे शहर ओळखले जाते. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. येथे आदिमायाचे स्थान आहे. महालक्ष्मी, जगदंबा इत्यादी नावांनी ओळखली जाणारी ही माता अनेक घराण्यांची कुलस्वामिनी आहे. कोल्हासुर या दैत्याला मारण्यासाठी आदिमाया येथे प्रकट झाली असे मानले जाते. या नगराचे प्राचीनत्व सांगणारे काही वाङ्‌मयीन पुरावे आहेत आणि त्यासंबंधी पुरातत्त्वीय पुरावेही मिळाले आहेत. इ. स. १८७७ मध्ये ब्रह्मपुरी परिसरात दगडी पेटी मिळाली. त्यावर ब्राह्मी लिपीतील लेख कोरलेला होता. बौद्ध धर्माशी निगडित संदर्भ त्यामध्ये होता. त्यावरून लेखाचा काळ इ. पूर्व १ शतक असा मानला जातो. त्याच वर्षी पंचगंगा नदीत तांब्याचे भांडे आणि नाणी, दागिने सापडले. पोटाळे गावातील बौद्ध लेणी आणि वरील वस्तू यामुळे कोल्हापूर येथे मानवी वस्ती आणि बौद्ध धर्माचे अस्तित्व (पुरातन काळापासूनचे) सिद्ध झाले. १८४४ मध्ये ब्रह्मपुरी येथील उत्खननामध्ये ब्रॉंझच्या अनेक वस्तू मिळाल्या. त्यावरून हे एक व्यापारी केंद्र होते आणि ग्रीक रोमन लोकांची येथे ये-जा होती हे सिद्ध झाले. या काळातील राजसत्तेचे आणि राजवंशाचे पुरावेही नाणी आणि छोट्या लेखांमुळे मिळाले. बदामी चालुक्‍यांचीही सत्ता इसवी सनाच्या ७ व्या शतकात होती असे दिसते. त्यांच्याच एका प्रांतपालाने महालक्ष्मीचे लहान मंदिर बांधले असावे, असा अंदाज आहे. या लहान मंदिराचेच आता प्रशस्त मंदिर झाले आहे. हे त्रिकूट पद्धतीचे ३ गर्भगृहे आणि ३ शिखरांचे मंदिर आहे. यामध्ये महालक्ष्मी, महाकाली, सरस्वती अशा देवींच्या तीनही प्रतिमा आहेत. मंदिराच्या स्थापत्यीय रचना अशी केली आहे, की वर्षातील ठराविक दिवशी सूर्याचे किरण महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात पोचतात आणि मूर्तीला किरणांचे जणू स्नानच होते.

loading image
go to top