kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kojagiri purnima 2022

kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?


दरवर्षी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता सर्वांनाच कोजागिरी पौर्णिमेचे वेध लागतात. या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी चंद्राचं साजरं रुप आणि टपोरं चांदणं पाहायला मिळणार आहे. यावेळी सर्व जण रात्री बारा वाजेपर्यंत जाऊन ही पौर्णिमा साजरा करतात. आजच्या दिवसाची धार्मिक आख्यायिका काय आहे हे जाणून घेऊया..

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे. खीरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते असं मानलं जातं. या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.

हेही वाचा: kojagiri purnima 2022: कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व...

यासाठी चंद्राच्या शातल प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यसाठी लाभदायक असते. कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असे मानले जाते. यासाठी हा दिवस धन प्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात समृद्धी येण्यासाठी खूपच चांगला समजला जातो.

हेही वाचा: Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती. संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले.

पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला.जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.

टॅग्स :MilkcultureHistory