

गौ या शब्दाचा अर्थ इंग्रजीमधील ‘काऊ’ किंवा मराठीत ‘गाय’ असा नक्कीच नाही. संस्कृतमधील ‘गौ’ या शब्दाचा अर्थ आहे... जी हलते, हालचाल करते. त्याचा दुसरा अर्थ ज्ञान (नॉलेज) असाही आहे. गाय हलतच असते, मात्र ज्ञान तुम्हाला हलवून तुमच्या ध्येयापर्यंत नेते, तुमचे पोषण करते, बळ देते आणि त्यामुळे तिला ‘गौ’ असे म्हणतात. संस्कृतमध्ये ‘गौ विश्वस्य मातरम्’ अशी म्हण आहे. तिचा अर्थ ‘गाय विश्वाची माता आहे,’ असा होतो.
‘गरुडपुराणा’मध्ये एखादी व्यक्ती मरणशय्येवर असताना गाय आणि तिचे वासरू दान करण्याच्या एका विधीबद्दलचा उल्लेख आढळतो. लोक याचा शब्दशः अर्थ घेत गायींचे दान करण्यास सुरवात करतात... मात्र याचा खरा अर्थ ‘लोकांना ज्ञान वाटणे’ असा आहे. भारतीय वंशाच्या गायी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. असे म्हणतात की, एक सुदृढ गाय एक संपूर्ण कुटुंबाचा आधार बनू शकते. आपण आपल्या गायींचे संरक्षण करण्याची आणि शेतकऱ्यांना चांगल्या स्थितीमध्ये जगण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. भारतात, विशेषतः खेडेगावांत गाय कोणत्याही कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. लोक स्वतः खात असलेले अन्नच गायींना खाऊ घालतात. खरेतर, गायींपासून मिळणारी प्रत्येक गोष्टच आपल्या उपयोगाची असते. त्यामध्ये गायीच्या शेणापासून तुपापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचा समावेश होतो. तुमचे जेवण दही, दूध किंवा तुपाशिवाय पूर्ण होते का? त्यामुळेच लोकांच्या मनात गायीबद्दल विशेष ममत्व आहे.
प्रयत्न गायींची संख्या वाढविण्याचे
भारतीय पौराणिक कथांमध्ये प्रत्येक देवाला किंवा देवीला प्राणी किंवा पक्षाच्या रूपात एक वाहन देण्यात आलेले दिसते. गणेशासाठी उंदीर, तर हत्ती लक्ष्मीच्या एका विशिष्ट रूपासाठीचे वाहन आहे. भगवान सूर्यनारायणाचे वाहन घोडा आहे, तर भगवान शंकराचे वाहन बैल आहे. शितळादेवीचे वाहन गाढव हा प्राणी आहे. या प्रत्येक प्राणी अथवा पक्ष्यामागची मान्यता अशी आहे, की त्या देवतेशी संबंधित कंपने या प्राण्यांच्या माध्यमातून पृथ्वीवर पोचतात. आजचे संशोधकही हे मान्य करतात, की यापैकी एक जरी प्राणी अस्तंगत झाल्यास पृथ्वी वाचू शकणार नाही.
भारतामध्ये आपण हे सत्य कायमच मान्य केले आहे, की निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट जीवनाच्या प्रत्येक स्वरूपाची जोडली गेलेली आहे. त्यामध्ये प्राणी, पाने, झाडे, अगदी छोटा काटा ही प्रत्येक गोष्ट दैवी आणि पवित्र आहे. आपण आपल्या गायींना तातडीने वाचविण्याची गरज का आहे? गायींची संख्या वेगाने कमी होत आहे. गायींच्या शंभरावर जातींपैकी आता केवळ ५० शिल्लक आहेत. त्यातील अनेक आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. आज संकरिकरणामुळे शुद्ध स्वरूपातील गाईची प्रजाती सापडणे दुरापास्त झाले आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात गायींची संख्या १२ कोटी होती व आज ती अत्यंत वेगाने कमी झाली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर क्यूबासारख्या देशांत गायींची कत्तल केल्यास मोठा दंड आकारला जातो. याचे कारण या देशांना गायींची संख्या अबाधित राखायची आहे.
आपल्या गायींची संख्या व्यवस्थित राखायची असल्यास त्याचे योग्य प्रमाण १०० लोकांमागे २० गायी असे असायला हवे. मात्र, आज गायींची त्या पुरेसे दूध देत नसल्याने किंवा इतर कारणांमुळे कत्तल केली जात आहे. गायींची संख्या रोडावल्याने त्याचा परिणाम गायींच्या अनेक प्रजाती अस्तंगत होण्यात होतो आहे. तज्ज्ञांच्या मते, गायींची संख्या अशीच कमी होत गेल्यास शंभर नागरिकांमागील गायींची संख्या पाचपर्यंत खाली येईल. आमची गोशाळा हे प्रमाण पुन्हा पहिल्यासारखे करण्याची आशा बाळगून आहे. आम्ही गोशाळा व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचा आणि भारतीय जातीच्या गायींचे जतन करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरवात केली असून, ती काळाची गरज आहे. आमच्या आश्रमातील गोशाळेत देशातील १५ विविध जातींच्या शेकडो गायी आहेत.
गाय आपणास अनेक गोष्टी प्रदान करते. मात्र, तिच्याकडे देण्यासारखे त्यापेक्षाही खूप अधिक आहे. तुम्ही गाय, बोकड, कोंबडी अशा कोणत्याही प्राण्याच्या डोळ्यांत बघा. तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्या डोळ्यांत तुमच्यासाठी केवळ आणि केवळ प्रेमच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.