
शक्तीच्या बळावर राज्य प्राप्त होत असते व युक्तीने प्रयत्न साधतो. शक्ती व युक्तीचा संगम जेथे होतो तेथे मनाची श्रीमंती नांदते. आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे हनुमंताचे अधिष्ठान प्रत्येकालाच लाभलेले असते.
- मोहनबुवा रामदासी
शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने यत्न होत असे।
शक्ती युक्ती जये ठाई। तेथे श्रीमंत नांदती॥
शक्तीच्या बळावर राज्य प्राप्त होत असते व युक्तीने प्रयत्न साधतो. शक्ती व युक्तीचा संगम जेथे होतो तेथे मनाची श्रीमंती नांदते. आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे हनुमंताचे अधिष्ठान प्रत्येकालाच लाभलेले असते. सर्वसमावेशक व सर्व समाजाला दैवत म्हणून मानता येईल असे श्री मारुतीराय! रामभक्त असणारी शक्ती व युक्तीची दैवते ही जन्म-मृत्यूच्या पलीकडे गेलेली असतात. ती चिरंजीव असतात. हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने बलोपासनेचे महत्त्व युवकांनी समजून घेतले पाहिजे.
स्वधामासी जाता महाराम राजा।
हनुमंत तो ठेविला याचा काजा।
सदा सर्वदा रामदासासी पावे
खळी गांजिता ध्यान सांडूनी धावे॥
हा समर्थ सांप्रदायातील श्लोक हाच हनुमंतरायांच्या चिरंजीव असण्याचा पुरावा आहे.
‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ असणाऱ्या मारुतीरायांचा खरा वारसा हा आजच्या संगणकीय युगातील युवक आहे. नल, नील, जांबुवंत व सर्व वानरसेनेने समुद्रात जो सेतू उभारला होता तो रामाच्या प्रेरणेने व हनुमंतरायांच्या कुशाग्र बुद्धीतून व सामर्थ्यसंपन्न शक्तीतून शक्य झाला होता. आपले मन व मनगट बळकट असेल तर कोणतीही दुष्ट शक्ती आपल्यावर आक्रमण करू शकत नाही. संगणकाला जन्म घालणारी युक्ती व शक्ती असणारा आजचा युवक आहे आणि संगणक व आधुनिक विज्ञान हे कुशाग्र बुद्धीचेच दर्शन आहे. मात्र, मन आणि बुद्धी सशक्त ठेवायची असल्यास बलोपासनेशिवाय पर्याय नाही.
श्री समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर अनेक ठिकाणी भक्तीचे प्रतीक असणारा दास मारुती, तसेच अन्याय, अत्याचार व देव-देश-धर्माच्या आड येणाऱ्या शक्तींचा बिमोड करण्यासाठी म्हणून शक्तीचे, वीरतेचे प्रतीक असणारा वीर मारुती किंवा प्रताप मारुती यांची स्थापना गावोगावी केली.
अक्रा अक्रा बहू अक्रा। काय अक्रा कळेचिना।
गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥
भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या या देशामध्ये शक्ती व युक्तीचे दैवत असणाऱ्या मारुतीयांची समर्थांनी स्थापना केली व समाजात ऊर्जा निर्माण करण्याचे काम केले. बलोपासनेचे महत्त्व समर्थांना माहीत होते.
युवकांसमोरील समस्या
आजच्या युवकांसमोर अनेक नवनवी आव्हाने उभी आहेत. यातील प्रमुख आव्हान मानसिक विकारांचे आहे. भारतातच नव्हे, संपूर्ण जगात मनोविकार हा एक नवा आजार झपाट्याने पसरत आहे. डिप्रेशनने (नैराश्याने) ग्रस्त अशी आजची पिढी पाहून वाईट वाटते. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी बालपणापासून असलेला मनावरचा ताण नोकरी लागल्यानंतरही कमी होताना दिसत नाही. त्या पुढे जाऊन त्यांचे दांपत्य जीवनही ताणतणावाने ग्रस्त असेच दिसते. युवकांची शक्ती वेगवेगळ्या प्रलोभनांमागे खर्च होत असताना दिसते व बुद्धीचाही दुरुपयोग होताना दिसतो. मन स्थिर नसणे हा प्रत्येक युवकासमोरील गंभीर प्रश्न आहे. तासन्तास संगणकावर काम करणे, त्यामुळे येणारा बुद्धिवरील ताण, चुकीचा आहार, व्यसनाधीनता, इ. अनेक गोष्टींचा युवकांच्या मनावर परिणाम होत आहे.
शारीरिक शक्ती आणि दिनचर्या
खरे पाहता मनाच्या विकारांचा शरीराशी व शारीरिक शक्तीशी तसेच दैनंदिन दिनचर्येशी खूप जवळून संबंध असतो. शरीर सशक्त बनल्यास मनही निरोगी बनते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही इतक्या या दोन गोष्टी संलग्न आहेत. या विषयावर बरेच संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. बलोपासना हा समर्थांनी युवकांना जवळपास तीनशे वर्षांपूर्वी सांगितलेला मार्ग आज परत वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध होताना दिसत आहे. दररोज व्यायाम केल्याने, सूर्यनमस्कार घातल्याने फक्त शरीरच मजबूत होते असे नाही, तर मनही सक्षम होते. कुठल्याही कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी स्थिर मन, कुशाग्र बुद्धी व शारीरिक शक्ती यांचीच गरज भासते. अनेक संकटे या तिन्हीपैकीच कुठल्यातरी गोष्टीच्या कमतरतेमुळे ओढावलेली असतात. मनाने ग्रस्त व शरीराने त्रस्त असा कोणीही आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. समर्थांनी सुचवलेली हनुमंतरायांचे अधिष्ठान असलेली बलोपासना केल्याने, म्हणजेच व्यायाम केल्याने स्वतःची प्रतिमा (स्वाभिमान) जागृत होतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते, व्यसने सोडण्याची वृत्ती वाढते, सकारात्मक विचार वाढतात व स्पर्धात्मक आयुष्यातही हार-जीत पचवून सहज पुढे जाण्याची शक्ती वाढते. आजच्या युवकांनी बलोपासना मनापासून स्वीकारल्यास, अंगीकारल्यास कोणत्याही सप्लिमेन्टपेक्षा ही सप्लिमेन्ट वरचढ ठरल्याशिवाय राहणार नाही. शक्ती व युक्तीचे दैवत मारुतीराय आहेत, बलोपासना हीच मारुतीयांची खरी महापूजा असू शकते. रावणी प्रवृत्तीचा बीमोड करण्यासाठी येणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला समर्थांचे अधिष्ठान ठेवून बलोपासनेचा संकल्प प्रत्येक युवकाने करावा. हाच खऱ्या अर्थाने हनुमान जन्मोत्सव ठरेल व असा युवक जर देव, देश, धर्माच्या कार्यात उतरला तर विश्वाचे कल्याणच होईल यात शंका नाही.
(लेखक खातगाव (जि. नगर) येथील आनंदी-नारायण कृपा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.