esakal | मुंबईची माता; `महालक्ष्मी`वर मुंबईकरांची श्रद्धा | Mahalaxmi Temple
sakal

बोलून बातमी शोधा

 Shri Mahalaxmi Devi

मुंबईची माता; `महालक्ष्मी`वर मुंबईकरांची श्रद्धा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : मुंबईसह उपनगरात देवींची अनेक लहानमोठी प्रसिद्ध मंदिरे (mumbai temples) आहेत. यात `महालक्ष्मी` ही मुंबईची (Mahalaxmi temple) अग्रगण्य आणि पहिली मानाची देवी म्हणून ओळखली जाते. मुंबादेवी, शीतलादेवी अशा अनेक मानाच्या देवी तसेच गोरेगावची अंबाबाई, अंधेरीच्या गिल्बर्ट हिलवरील गावदेवी अशी अनेक जुनी मंदिरे मुंबईत आहेत. पण महालक्ष्मीवर सर्वच मुंबईकरांची मोठी श्रद्धा (mumbaikar Faith) आहे. या मंदिरात गेल्यावर भाविकांना मोठे समाधान मिळते. या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त (Navratri festival) मोठी गर्दी होते.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठाची सिनेट वादळी ठरणार?

महालक्ष्मी मंदिर मूळ किमान दोनशे वर्षे जुने असले तरी त्यामागील कथाही भक्तिपूर्ण आणि मनोरंजक आहेत. मुंबईतील मोठे व्यापारी धाकजी दादाजी यांनी मूळ मंदिराची उभारणी केली. नंतर ब्रिटिश गव्हर्नर हॉर्नबी याने महालक्ष्मी आणि वरळीची टोके जोडण्यासाठी समुद्रात बांध घालायचे ठरवले. मात्र तो बांध खवळलेल्या समुद्रापुढे टिकत नव्हता व उभारला की तो पडून जात असे. बांध उभारणारा इंजिनिअर रामजी प्रभू याच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन वरळीच्या समुद्रात आम्हा तिघी बहिणींच्या मूर्ती असल्याचे सांगितले. त्या बाहेर काढल्यास तुझी इच्छा पूर्ण होईल, असेही देवीने त्यांना सांगितल्याची आख्यायिका आहे.

ब्रिटिश गव्हर्नर यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हता, पण काम होतच नसल्याने त्यांनी यास परवानगी दिली. शोध घेतल्यावर समुद्रात खरोखर तीन मूर्ती मिळाल्या. त्यांची स्थापना महालक्ष्मीच्या मंदिरात करण्यात आली. रामजीने तेव्हा ८० हजार रुपये खर्च करून येथे मोठे मंदिर उभारले. मंदिरात महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याने पूर्वी मंदिरामागे जाऊन समुद्राचा खारा वारा फुप्फुसात भरून घेता येत असे. पण आता बहुचर्चित कोस्टल रोड समुद्राशेजारूनच जात असल्याने सध्यातरी हा मार्ग बंद आहे.

विविध उपक्रम

मंदिर प्रशासनातर्फे चैत्र व अश्विन नवरात्र, मार्गशीर्षच्या गुरुवारी विशेष सजावट आणि पूजा केली जाते. पंचपक्वान्नाचे नैवेद्य दाखवले जाते. नवरात्रोत्सवात सुमारे १० ते १५ लाख भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. मंदिराच्या उत्पन्नातील आठ कोटी रुपये वैद्यकीय साह्यासाठी, तर अडीच कोटी रुपये सात हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून दिले जातात. आठवडाभर अॅलोपथी तर रविवारी आयुर्वेदिक दवाखानाही निःशुल्क चालविला जातो. महिन्यातून एकदा देहू येथेही दवाखाना असतो. रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे देणे, इतर संस्थांना देणग्या देणे, असेही उपक्रम मंदिरातर्फे केले जातात.

loading image
go to top