व्रतबंधाचा संस्कार सर्वांसाठी!

हिंदू धर्मात सोळा संस्कार सांगितले आहेत.
Vrutbandh
VrutbandhSakal
Updated on

आपल्या सर्वच संस्कारांना शास्त्राची आणि तत्त्वज्ञानाची भक्कम बैठक आहे. मुलामध्ये वयाच्या आठव्या वर्षी विद्या शिकण्याची आवड निर्माण करणे आवश्यक असते. त्यासाठी बालकाच्या मनाची तयारी करून घेणे हे आई-वडिलांचे कर्तव्य बनते. उच्च आदर्श ठेवल्याने विद्या शिकून आपणही मोठे व्हावे, ही अस्मिता मुलांमध्ये जागृत होते. अशावेळी मूल विद्या शिकण्यासाठी उतावीळ झालेले असते. त्याचवेळी त्याच्या उपनयन संस्काराची सुरुवात असते. याच उपनयन संस्काराला मौंजीबंधन किंवा मुंज किंवा व्रतबंध असे म्हटले जाते.

हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्यपद्धती जन्माप्रमाणे नसून कर्माप्रमाणे आहे. ब्रह्मविद्येचा उपासक तो ब्राह्मण, रक्षणविद्येचे उपासक ते क्षत्रिय, व्यापार, शेती वगैरेचा उपासक, उद्योजक तो वैश्य आणि नोकरदार वर्ग म्हणजेच शूद्र. उपनयन संस्कारावेळी मुलाचा वर्ण त्याच्या कुटुंबाच्या व्यवसायावरूनच ठरवला जात असे, कारण मुलाची आवड, कल कोणत्या दिशेने आहे, हे उपनयनाच्या वेळी ठरवणे शक्य नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच प्रत्येक मुलाचा त्याच्या त्याच्या उद्योगानुरूप वर्ण ठरवला जात. त्यामुळे उपनयन संस्कार कधी करावा, हे सांगताना मुलाच्या कुटुंबाचा वर्ण विचारात घेतला जात असे.

काय आहेत उपनयन संस्कार?

उपनयनाच्या संस्कारात ब्रह्मचर्य आश्रमाची दीक्षा दिली जाते. उपनयन संस्कार झाल्यावर बालकाचा दुसरा जन्म झाला, असे समजण्यात येते. बालपण संपून ते मूल शिक्षणासाठी तयार होत असते. मातापित्यांचा वर्ण कोणताही असला, तरी पुढील शिक्षण घेऊन ते बालक स्वतःचा वर्ण प्राप्त करून घेत असते. हे त्याच्या हातात असते. उपनयनानंतर स्वतःसाठी ते मूल शिक्षणाद्वारे प्रयत्नाला सुरुवात करणार असते.

याचाच अर्थ यावेळी त्याचा जणू दुसरा जन्म झालेला असतो, म्हणूनच उपनयनानंतर त्या मुलाला द्विज म्हणजे दोनदा जन्म झाला असे समजण्यात येते. त्यामुळेच ज्यांना शिक्षण घ्यावयाचे असते, त्याच मुलांचा उपनयन संस्कार करावा. गुरूंजवळ राहून सर्व शिष्य आपला सगळा अभ्यास पूर्ण करतात. सध्याच्या काळात गुरुकुल व्यवस्था नसल्याने विद्यार्थी घरीच राहून आपले शिक्षण पूर्ण करतात. तरीदेखील एकाग्रचित्ताने अभ्यास करता यावा, वेगवेगळी कौशल्ये मिळवता यावीत, यासाठी काही नियमांचे, व्रतांचे बंधन विद्यार्थ्यास स्वतःवर घालून घ्यावे लागते, म्हणूनच या विधीस ‘व्रतबंधन’ असेही म्हणतात.

व्रतांचे पालन

यातील पहिले व्रत आहे, विद्याव्रत. म्हणजेच विद्येचा अभ्यास करण्याचे व्रत घेणे. यालाच दीक्षा असेही म्हणतात. व्रताचे आचरण केल्याने अध्ययनाचा अधिकार मिळतो. अभ्यासाने ज्ञानवर्धन होते, श्रद्धा भाव उत्पन्न होतो. नियमितपणे व्रताचरण केल्याने हे घडते. व्रताचे आचरण करणे म्हणजेच आपला आहार, आचरण युक्त योग्य असावे. प्रार्थना, विद्याभ्यास, व्यायाम, आरोग्यास पोषक आहार या गोष्टी पाळाव्यात.

हे व्रताचरण करतेवेळी मोह, राग यांसारखे दुर्गुण बाजूला ठेवावेत आणि यासाठी इंद्रिय संयमही तेवढाच आवश्यक. योग्य आहार, आचरण आणि इंद्रिय संयम या दुसऱ्या व्रतांमुळे शरीर आणि मनाची शक्ती वाढते. याच्या जोडीला आपल्या बुद्धीचे तेजही वाढावयास हवे आणि म्हणूनच तिसरे व्रत स्वाध्याय आणि प्रवचन. बुद्धीचा विकास व्हावा यासाठी अनेक विषयांचा सखोल अभ्यास, अर्थात स्वाध्याय करावा. त्याचप्रमाणे आपल्याला जे कळते ते इतरांना शिकवणे, हे प्रवचन.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे होतो. ज्ञानार्जनात पहिले गुरू माता आणि पिता, त्यानंतर शिक्षक यांच्याशी नेहमी आदराने वागावे, त्यांचे ऐकणे म्हणजेच सद्‍गुरू सेवा आणि हे चौथे व्रत विद्यार्थ्यांनी पाळणे आवश्यक आहे. वरील सर्व व्रते पाळण्यासाठी आवश्यक असते निश्चय शक्ती आणि निश्चय शक्ती लाभण्यासाठी महत्त्वाची आहे प्रार्थना. प्रार्थनेसाठी काही काळ देवाजवळ बसणे म्हणजेच दैनंदिन उपासना. उपनयन संस्कारात गायत्री मंत्र शिकवला जातो. मुंज झालेल्या बटूला रोज संध्या करायला सांगत. आपण सध्याच्या काळात दैनंदिन उपासनेलाच महत्त्व देतो. रोजची उपासना हेच पाचवे महत्त्वाचे व्रत आहे. ही सर्व व्रते घ्यायची आहेत अग्नीच्या साक्षीने. अग्नी म्हणजेच तेज. या अग्नीचे तेज बटूस लाभावे यासाठीच यज्ञाचे प्रयोजन.

‘यज्ञोपवीता’चे महत्त्व

यज्ञोपवीत म्हणजे यज्ञातून मिळालेले व्रतचिह्न. उपनयनाचे व्रतचिह्न म्हणून तीन धाग्यांचे जानवे किंवा यज्ञोपवीत देण्याची प्रथा आहे. आपला आचार, उच्चार, विचार या तिन्हींमधील पावित्र्य या तीन धाग्यांनी प्रतिकात्मक रूपाने योजिले आहे. पूर्वीच्या काळी उपनयनानंतर बटू गुरूच्या घरी राहायला जात. पायी चालत गुरूच्या घरी जावे लागे. वाटेत प्राण्यांची भीती. त्यामुळे त्यापासून संरक्षण करण्यासाठी बटूला हातात दंड दिला जात.

बाहेर जंगली श्वापदांची भीती त्याचप्रमाणे मनाच्या आतही काम, क्रोध, मोह अशा दुर्गुणांच्या रूपातील भयंकर श्वापदे असतात. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी नेहमी जागरूक राहणे आवश्यक असते आणि या जागरूकतेचेच प्रतीक म्हणजे दंड. या उपनयन संस्काराच्या परिणामस्वरूप बटूच्या उत्तम विद्यार्थिदशेसाठी, ब्रह्मचर्य आश्रमासाठी पोषक वातावरण निर्माण होते आणि अत्यंत जागरूकतेने त्याचा विद्यार्थीदशेतील प्रवास सर्व देवता, मातापिता, गुरू यांच्या आशीर्वादाने यशस्वी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com