उणिवांची आनंददायी जाणीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’

उणिवांची आनंददायी जाणीव

सा ध्या-साध्या गोष्टींतून रसिकांना हसत-खेळत रमवणारे नाटककार म्हणून संतोष पवार यांची ओळख आहे. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकातूनही त्यांनी दोन कुटुंबांतील काही व्यक्तींमध्ये असणाऱ्या व्यंगांचा आधार घेत रसिकांना हसवत ठेवण्यात यश मिळवलं आहे.

एकाला अजिबात ऐकू येत नाही. दुसऱ्याला दोन शब्दांच्या वर बोलता येत नाही. तिसऱ्याला दिवसा दिसतं; पण रात्री दिसत नाही. अशा तीन भावांच्या कुटुंबाला सांभाळते ती ऐकू येत नाही त्या दादा (सागर कारंडे)ची बायको (शलाका पवार). मुकेश (अजिंक्य दाते) आणि नयन (अमोघ चंदन)ची ही वहिनी. अशा या कुटुंबात तिघांच्या व्यंगावरून उडणारा गोंधळ म्हणजे विनोदाची अक्षरश: धमाल आहे. त्यांच्याच शेजारी नारायण (रमेश वाणी) हे त्यांची पत्नी लक्ष्मी (सिद्धरूपा करमरकर) आणि मुलगी सुनयना (सायली देशमुख) राहायला येतात. नारायण विसरभोळे आहेत; तर सुनयनाला रात्री दिसतं; पण दिवसा दिसत नाही, असा याही फॅमिलीत गोंधळ आहे. या दोन शेजारी कुटुंबांतील सदस्य एक-दुसऱ्याच्या कुटुंबाकडे बघतात; त्यात होणारे समज-गैरसमज पोट धरून हसवतात. दादाच्या कुटुंबातील नयन आणि नारायणची मुलगी सुनयना यांचं लग्न जुळवण्यासाठी बोलणं होतं. त्यातील संवाद आणि विसंवाद नाटकाची उत्सुकता वाढवतात.

शीर्षकगीताने पडदा उघडल्यानंतर क्षणार्धात हे नाटक रसिकमनाचा ताबा मिळवतं आणि पुढं काय होणार याची उत्सुकता वाढवतं. त्यातही विनोदासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सागर कारंडे दादाची व्यक्तिरेखा भन्नाट जगला आहे. विसंगतीतून संगती हे या नाटकाच्या विनोदनिर्मितीचं अस्त्र आहे. त्याचा वापर लेखक-दिग्दर्शक संतोष पवार यांनी रंगमंचावर तेवढ्याच ताकदीनं आविष्कृत करून, दिग्दर्शनाचं कौशल्य अधोरेखित केलं. त्या कौशल्याला सागर कारंडे यांच्यासह शलाका पवार, अजिंक्य दाते, सायली देशमुख, अमोघ चंदन, सिद्धरूपा करमरकर, रमेश वाणी या साऱ्यांनीच मूर्त रूप दिलं आहे.

गोपाळ अलगेरी आणि सुनीता अहिरे यांच्या वेद प्रॉडक्शन हाऊस-एल.एल.पी.ची ही निर्मिती. नाटकाची कथा रंगमंचावर सादर करण्यासाठी नेपथ्य (संतोष बेंद्रे), प्रकाशयोजना (किशोर इंगळे) आणि वेशभूषा (मंगल केंकरे) महत्त्वाची ठरली आहे. स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखांची वर्गवारी करताना संतोष पवार यांनी वहिनी आणि लक्ष्मी यांना ‘सामान्य’ पेश केलं आहे. त्या दोघींनी त्यांच्या घरातील ही व्यंग असणारी माणसं सांभाळली. त्यासाठी त्यांची होणारी धावाधाव ही प्रत्येक घरातील स्त्रीच्या वाट्याला येणारी प्रातिनिधिक ओढाताण आहे. स्त्रीमधील ममत्व साऱ्या आघाड्यांवर लढत असते, हेच सूत्र नाटककाराने अधोरेखित केलं आहे.

नाटकाच्या गोष्टीला व्यक्तिरेखांच्या व्यंगांचा बॅकड्रॉप आहे. असे वेगवेगळे व्यंग असणाऱ्या व्यक्ती घराघरांत असतातच. कुणी तरी तापट असतो. कुणाला काळवेळेचं भान नसतं. कुणी धांदरट असतो. माणसं तेवढ्या प्रवृत्तीनुसार समाजात व्यंगात्मक व्यक्तिरेखांचंही वैविध्य दिसतं. नाटकात विविधरंगी व्यंग प्रतिबिंबित करून, नाटककाराने समाजमनाला त्यांच्यातले व्यंग बघण्यासाठीचा आरसा या नाटकाच्या निमित्ताने समोर धरला आहे. दोन्ही घरांत अशी व्यंग असणारी माणसं असतानाही त्यांच्यातला आनंद ओसंडून वाहतो आहे. समाजातील घरादारांत छोट्या-छोट्या उणिवांवरून होणारी भांडणं जरा बाजूला सारून आपला कुटुंबकबिला आनंददायी ठेवू शकतो, याची जाणीव करून देणारी ही कलाकृती आहे.

कुठल्याही कलाकृतीत जे दिसतं, तेवढंच वास्तव नसतं. रसिकांना त्यापलीकडे पाहण्याची दृष्टी कलाकृती देत असते. तीच दृष्टी संतोष पवार यांच्या नाटकातील गंमत आहे. दोन्ही कुटुंबांत घरातला पसारा वाढवणारी, गैरसमजातून प्रश्‍नांचा डोंगर उभा करणारी माणसं राहतात. तरीही त्यांचं जगणं मात्र आनंददायी आहे. या नाटकातील व्यक्तिरेखांचा तुलनात्मक विचार करून आपल्यात कुठलंही व्यंग नाही, असं समजणारा सामान्य माणूस दु:ख विकत घेऊन जगत असतो का, असा प्रश्‍न प्रत्येकाने स्वत:च स्वत:ला विचारला तर आपलंही जगणं आनंददायी होईल. कुठल्याही समस्येकडे जगण्यातला अडथळा म्हणून न बघता, त्या समस्येतून मार्ग काढून आनंद शोधायला लावणारं हे नाटक आहे.

Web Title: Natak Review Hich Tar Familychi Gammat Aahe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top