esakal | चतुःश्रृंगी
sakal

बोलून बातमी शोधा

chaturshringi Devi temple

चतुःश्रृंगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहराचे एक उपनगर सांगवी. या गावाला संगमावरील सांगवी, असेही म्हणतात. मुळा आणि पवना नदीच्या संगमावर वसलेले सांगवी. नवरात्रोत्सवामध्ये सांगवी ते चतुःश्रृंगी मार्गावर पीएमपी दरवर्षी जादा बस सुरू करते, हे अनुभवाने माहिती होते. मात्र, या वर्षी बस असणार की नाही? मंदिरे उघडणार की नाही? या बाबत अनेकांच्या मनात साशंकता होती. अशीच साशंकता सांगवीतील श्री दत्त आश्रमातील साधकांनी व्यक्त केली. आश्रमामध्येही शारदीय नवरात्र आणि शाकंभरी नवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते. श्री दत्तात्रेयांच्या आरतीसह श्री देवीची आरतीही दररोज म्हटली जाते. ‘आरती तूज अंबे, जगदंबे,’ असे आरतीतील शब्द. येथील साधकांसह सांगवी परिसरातील भाविक नवरात्रोत्सवात चतुःश्रृंगीच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे पीएमपी जादा बसची व्यवस्था करते. या वर्षीही नवरात्रोत्सवाची उत्सुकता लागून होती.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे दर्शनासाठी खुली होणार की नाही? याचीही उत्सुकता होता. ती आता संपली आहे. कारण, नवरात्रौत्सच्या पहिल्या दिवसापासून अर्थात गुरुवार, सात ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात पुण्यातील चतु:शृंगी देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. त्यामुळे मंदिरात घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे. गुरुवार, सात ऑक्‍टोबरपासून विजयादशमी १५ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सवाचा कालावधी आहे. याला शारदीय नवरात्रोत्सव असे म्हणतात. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी आठ वाजता मंदिरात अभिषेक होणार आहे. रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण केले जाणार आहे.

सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे. दररोज पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे. गुरुवारी, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नवचंडी होम केला जाणार आहे. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा आहे. त्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता मंदिर परिसरात साध्या पद्धतीने सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे, अशा आशयाचे वृत्त आश्रमातीलच ग्रंथालयात आलेल्या वृत्तपत्रात वाचायला मिळाले. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला जाणार आहे.

भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, ताप मोजण्यासाठी थर्मलगन ठेवली जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे. देवीचे ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे. सीसीटीव्हींची यंत्रणा कार्यान्वित केली आहे, हे सर्व वाचत असताना दोन वर्षांपूर्वी देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. सेनापती बापट रस्त्यालगतच्या वाहनतळावर गाडी उभी केली.

कमानीतून आत प्रवेश केला. दोन्ही बाजूला पूजा साहित्य विक्रीची दुकाने सजली होती. पायऱ्या चढून मंदिराकडे जाऊ लागलो. चतु:श्रृंगी देवीचे मंदिर डोंगरात आहे. हे स्वयंभू देवस्थान आहे. परंतु, देवीचे नाव चतुःश्रृंगी कसे? असा प्रश्न मनात आला म्हणून आश्रमातीलच ग्रंथालयात एका पुस्तकात संदर्भ मिळाला की, चतुः म्हणजे चार. आणि श्रृंग म्हणजे शिखर. म्हणजे ज्या डोंगराला चार श्रृंग अर्थात शिखरे आहेत. त्याला चतुःश्रृंग म्हणतात. तसा पुण्यातील या डोंगराला चतुःश्रृंग डोंगर आणि त्यात निवास करणारी आदिशक्ती देवी म्हणजे चतुःश्रृंगी होय. देवीचे मंदिर भव्य असून, शक्ती व विश्वासाचे प्रतीक म्हणून त्याचा लौकिक आहे. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितले जाते. ती अशी की, एक श्रीमंत व्यापारी वणी येथील सप्तश्रृंगी देवीचा भक्त होता. नाशिक जिल्ह्यात हे ठिकाण आहे. हा व्यापारी नियमितपणे वणी येथे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जात होता.

मात्र, कालांतराने तो व्यापाऱ्याचे वय झाले. वणीला दर्शनासाठी जाणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे एके दिवशी देवी त्या व्यापाऱ्याच्या स्वप्नात आली. ‘मी पुण्याजवळील एका डोंगरात आहे. तू जा व त्या मूर्तीला बाहेर काढ. त्या जागेवर मंदिर बांध. त्यानुसार, त्या व्यापाऱ्याने डोंगरात देवीचे ठिकाण शोधून काढले. तिथे मंदिर उभारले. त्या मंदिरात देवीची प्रतिष्ठापना केली तीच देवी चतुःश्रृंगी होय. मंदिरात नवरात्रोत्सव अतिउत्साहात साजरा केला जातो. मंदिराच्या पायथ्याशी यात्राच भरलेली असते. तो उत्सव आणि तो उत्साह आजही कणाकणात भरून आहे. अनेकजण देवीच्या दर्शनाला जाण्याच्या तयारीत आहेत.

loading image
go to top