दुर्गादेवी

नवरात्रोत्सव म्हटलं की आठवते दुर्गा देवीचे रूप. वाघावर स्वार. हातांमध्ये विविध शस्त्र धारण केलेली माता. तिला शक्ती देवता असेही म्हणतात. दुर्ग नावाच्या राक्षसाचा वध करणारी देवी म्हणून दुर्गा.
Durgadevi
DurgadeviSakal

नवरात्रोत्सव म्हटलं की आठवते दुर्गा देवीचे रूप. वाघावर स्वार. हातांमध्ये विविध शस्त्र धारण केलेली माता. तिला शक्ती देवता असेही म्हणतात. दुर्ग नावाच्या राक्षसाचा वध करणारी देवी म्हणून दुर्गा. देवी भागवत ग्रंथातसुद्धा दुर्गा देवीचा उल्लेख आढळतो. उमा, गौरी, पार्वती, चंडी, काली अशा विविध रूपांनी दुर्गामातेला ओळखले जाते. या दुर्गामातेचे एक मंदिर पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतसुद्धा आहे. निगडी जवळच्या टेकडीवर देवीचे ठिकाण आहे. तिच्या नावावरूनच टेकडीचे नाव दुर्गा देवी टेकडी असे पडले आहे. त्यालाच दुर्गादेवी पार्क असेही म्हणतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने टेकडीवर वृक्षारोपण करून सर्व परिसर हिरवागार केला आहे. एका छोट्या गुहेत देवीचे ठाणं आहे.

त्यापुढे महापालिकेने प्रशस्त सभामंडप बांधला आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय आहे. मंदिरापासून जवळच छोटे उद्यान असून, मुलांसाठी खेळणी आहेत. टेकडीवर छोटा तलाव आहे. त्यात बदक नेहमीच स्वच्छंदपणे विहार करत असतात. सुमारे ७५ एकर परिसरात दुर्गादेवी टेकडी आहे. महापालिकेने देशी प्रकारची एक लाख साठ हजारांवर वृक्ष लागवड केली आहे. त्यांचे संवर्धन केले आहे. त्यामुळे आज दुर्गा देवी टेकडी हिरवाईने नटली आहे. वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, पळस, पांगारा, गुलमोहर, काटेसावर अशा देशी वृक्षांसह औषधी वनस्पतींचे संगोपन केले आहे. या हिरव्यागार वनराईच्या सानिध्यात दुर्गादेवीचे मंदिर आहे. प्रसन्न वातावरण. पक्षांची किलबिल नेहमी ऐकू येते. शहरालगतचे ठिकाण असूनही शहरी गोंगाटापासून दूर असा हा शांत सुंदर परिसर आहे. आतापर्यंत मंदिरे कोरोनामुळे बंद होती. ती आता खुली होणार आहेत. त्या जोडीला दुर्गा देवी उद्यानही खुले होणार आहे. त्यामुळे नवरात्रामध्ये देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

देवीचे ‘दुर्गा’ असे नाव उच्चारले तरी, अंगावर कंप यावा, इतकी या नावात शक्ती असल्याचे जाणवते. महाभारतातील भीमपर्वात सुद्धा दुर्गादेवीचा उल्लेख आढळतो. असे म्हटल्या जाते की, दुर्गा देवीचे स्थान हे विंध्य पर्वतावर आहे. त्यामुळेच दुर्गा देवीला विंध्यवासिनी असेही म्हणतात. दुर्गा हे माता पार्वतीचे एक रूप आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे तिला आदिमाया आदिशक्ती असेही म्हटले जाते. दुर्गा देवीचे नऊ रूप आहेत. नऊ नावेही आहेत. मार्कंडेय पुराणात देवी माहात्म्य सांगितले आहे. त्यात सातशे श्लोक आहेत. त्यामुळे त्याला ‘दुर्गासप्तशती’ नावाने संबोधले आहे. यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या तीन स्वरूपांतसुद्धा दुर्गेचे वर्णन आहे. देवीची ही तीन रूपे म्हणजे तम, रज व सत्त्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. मधुकैटभ, महिषासुर, चंडमुंड, शुंभनिशुंभ अशा राक्षसांचा देवीने वध केला अशा आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एका आख्यायिकेनुसार, देवीचे राक्षसांशी नऊ दिवसे युद्ध चालले. ते नऊ दिवस म्हणजे नवरात्र. देवीने राक्षसांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे विजया दशमी. त्यालाच दसरा असेही म्हणतात.

दुर्गादेवीचे राक्षसांशी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत युद्ध सुरू होते. या काळात देवीचे उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे तिला चंडी असेही म्हटले जाते. त्यामुळेच दुर्गासप्तशतीच्या पाठास ‘चंडीपाठ’ असेही म्हणतात. या नवरात्रोत्सवात सप्तशती पाठ केला जातो. हवन केले जाते. शतचंडी, सहस्रचंडी याग अर्थात यज्ञ केला जातो. या नवरात्र काळात काही महिला उपवास करतात. देवीची आराधना करतात. त्याला व्रत असे म्हणतात. आश्विन महिन्यातील अष्टमी व नवमीला देवचे पूजन करून महाआरती केली जाते. पूजा, चंडीपाठ, जागरण, गोंधळ असे कार्यक्रम केले जातात. दुर्गा देवीचे रौद्र रूप व सौम्य रूप आहे. बंगालमध्ये दुर्गा देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तिलाच काली माता किंवा कालिंका माता असे संबोधले जाते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झालेले बंगाली बांधव नवरात्रोत्सवात बंग उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी दुर्गा देवीला चतुर्भुजा, अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशा नावांनी ओळखले जाते. तशी मंदिरेही उभारली आहेत. देवीच्या हातांमध्ये शंख, चक्र, शूल, धनुष्य, बाण, खड्ग, खेटक व पाश अशी आयुधे दाखविलेली असतात. खेटकलाच गदा असे म्हणतात. या देवीने नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी या नावानेही संबोधले जाते. देवीच्या पायाजवळ महिषासुर असतो. अशा या दुर्गा देवीचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. त्यात निगडीतील दुर्गा देवी टेकडीवरील मंदिरही खुले होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com