esakal | एकवीरा
sakal

बोलून बातमी शोधा

Ekvira Devi

एकवीरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एकवीरा आई तू डोंगरावरी

नजर हाय तुझी कोल्यावरी

खरोखरच हे अर्थपूर्ण गाणे एकेदिवशी ऐकायला मिळाले. यापूर्वीही अनेकदा हे गाणे ऐकले होते. पण, आजचा दिवस जरा वेगळा होता. कारण, आज ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’ या गाण्यात वर्णन केलेल्या एकवीरा आईचे मंदिर असलेल्या कार्ला, बेहेरगाव, मळवली, लोणावळा परिसरात कामानिमित्त निघालो होतो. वेळ मिळाल्यास प्रत्यक्ष देवीच्या दर्शनालाही जायचे असा बेत मनोमन केला होता. आता आमच्या गाडीने पिंपरी-चिंचवडमधील निगडी सोडले होते. लोणावळ्याच्या दिशेने गाडी निघाली होती. त्यावेळी चालकाने ‘एकवीरा आई तू डोंगरावरी...’ हे गाणे लावले होते. आणि साहजिकच आमच्यात चर्चा सुरू झाली, एकवीरा देवीबाबत. कदाचित त्यांच्याही मनात देवीच्या दर्शनाला जायचा बेत असावा. एक सहकारी म्हणाला, ‘चाललोच आहोत, तर एकवीरा देवीचे दर्शन घेऊ या.’ पण, काही सहकाऱ्यांनी ‘नको’ म्हणत ‘आधी काम करू. ते लवकर संपले तर देवीच्या दर्शनाला जाऊ’ असे सुचविले. त्यावर सर्वांचे एकमत झाले. पण, चर्चेत एकवीरा देवी, तिचे स्थान असलेले कार्ला-बेहेरगाव डोंगर, परिसरातील लेण्या, एकवीरा देवीची महती’ सर्वच विषय आले. त्यामुळे देवीविषयी बरीच माहिती मलाही मिळाली. त्यानुसार.

एकवीरा देवीला ‘एकवीरा आई’ असेही म्हणतात. तेच शब्द मोटार चालकाने लावलेल्या गाण्यात होते. पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा शहरापासून जवळच कार्ला लेणी आहे. पुण्याहून जाताना लोणावळ्याच्या अगोदर कार्ला फाटा लागतो. तेथून साधारण तीन किलोमीटर अंतरावर एकवीरा देवीचे मंदिर आहे. लोकल रेल्वेने पुणे, पिंपरी-चिंचवडमधून गेल्यास मळवली रेल्वे स्थानकावर उतरून वाहनाने देवीच्या दर्शनाला जाता येते. हे साधारण पाच ते सहा किलोमीटर आहे. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी कोकणातील बांधव दरवर्षी जातात. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयसुद्धा देवीच्या दर्शनासाठी व पूजेसाठी येतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहे. तिला कार्ला लेणी असे म्हटले जाते. शारदीय व शाकंभरी नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते. एकवीरा देवीबाबत काही आख्यायिका अनेकांकडून ऐकायला मिळाल्या आहेत. त्यातील एक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे. त्यानुसार, पंडुराजाला पाच पुत्र होते.

धर्मराज, भीम, अर्जुन, नकूल, सहदेव अशी त्यांची नावे. त्यांना पाच पांडव नावाने ओळखले जाते. ते वनवासाला निघाले होते. वनात भटकत असताना कार्ला परिसरात पोहोचले. त्यांच्या समोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली. ‘या ठिकाणी माझे मंदिर बांधा’ असा दृष्टांत दिला. पण, ‘एका रात्रीतच मंदिर बांधायला हवे’ अशी अटही घातली होती. तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले. देवी प्रसन्न झाली. वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञातवासात राहायचे होते. या काळात ‘पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही,’ असा एक वर देवीने पांडवांना दिला. एकवीरा देवी ही माहूरच्या रेणुका मातेचा अवतार आहे, असेही म्हटले जाते. विद्येची देवता गणपतीची आई माता पार्वती, देवी यमाई आणि रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी, अशीही आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तिला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असेही म्हटले जाते. एकवीरा मातेची मूर्ती स्वयंभू आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा मातेची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते.

एकवीरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी व निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. पावळ्यामध्ये तर परिसरातील सृष्टी सौंदर्य मनाला मोहवून टाकते. डोंगरावरून खळाखळत कोसळणारे धबधबे जणू दुधाच्या धारेसारखे भासतात. डोंगरांच्या कड्यांवरून ठिपकणारे पाण्याचे थेंब वेगळाच आनंद देऊन जातात. या ठिकाणापासून जवळच जगप्रसिद्ध लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे आहेत. भाजे लेणी आहे. लोहगडासह अन्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात. एकवीरा देवीचा उत्सव शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने सुरू होत आहे.

loading image
go to top