esakal | महालक्ष्मी I Mahalaxmi
sakal

बोलून बातमी शोधा

Mahalaxmi

महालक्ष्मी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘दादा, अरे! मी आणि आई उद्या कोल्हापूरला चाललोय. श्रेयाला घेऊन जाऊ का सोबत. संध्याकाळपर्यंत परत येऊ,’ प्रिया बोलत होती. अनेक वर्ष शेजारी राहणाऱ्या रवीला तिने भाऊ मानले होते. लहानपासूनच श्रेया तिच्याकडेच राहात होती. दुपारीच तिने तिच्या मानलेल्या वहिनीला श्रेयाला कोल्हापूरला घेऊन जाण्याबाबत विचारले होते. पण, वहिनी म्हणाली होती, ‘संध्याकाळी तुमचे भाऊ घरी आले की विचारा.’ त्यानुसार रवी सायंकाळी घरी येताच प्रियाने त्याला ‘श्रेयाला सोबत नेण्याबाबत विचारले.’ त्याने नेहमीप्रमाणे उत्तर दिले, ‘तुझ्या वहिनीला विचार’. त्यावर प्रिया म्हणाली, ‘काय रे! दादा, तू म्हणतोस वहिनीला विचार. वहिनी म्हणजे भाऊला विचार! जाऊ दे!’ असे म्हणत असतानाच दादा व वहिनी दोघेही हसू लागले. प्रियाला कळलेच नाही. ते का हसताहेत. कारण, दुपारी प्रिया वहिनीकडे येऊन गेल्यानंतर रवीशी तिचे बोलणे झाले होते. दोघांनीही प्रियासोबत श्रेयाला कोल्हापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

आता ते केवळ प्रियाला चिडवण्यासाठी व तिची गम्मत करण्यासाठी नाटक करत होते. रवी मुद्दामच म्हटला होता, ‘तुझ्या वहिनीला विचार!’ आता सर्व परिस्थिती प्रियाच्या लक्षात आली होती. दादा आणि वहिनीची संमती घेऊन ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचे होते. त्याची तयारी करायची होती. हा सर्व प्रकार पाहात असलेली श्रेया पप्पांना अर्थात रवीला म्हणाली, ‘कोल्हापूरला कशाला जायचंय?’

तिची आई म्हणाली, ‘कोल्हापूरला महालक्ष्मीचे मंदिर आहे. आत्या आणि आजी दर्शनाला जाणार आहेत. तुलापण सोबत नेणार आहेत?’ असे सांगत असतानाच पाच वर्ष ती मागे गेली. लग्नानंतर ती रवीसोबत कोल्हापूरला दर्शनाला गेले होते. तेव्हापासून कोल्हापूर म्हटलं, की तिच्या डोळ्यांसमोर नाव येते महालक्ष्मी देवीचे आणि आठवते ते कोल्हापूरही... ऐतिहासिक शहर. दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. मराठी चित्रपटसृष्टीची चित्रनगरी. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेले नगर. ते शक्तिपीठ म्हणजे देवी महालक्ष्मी. आणि कोल्हापूर म्हणजे प्राचीन महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर. त्यालाच करवीरनगरी असेही म्हणतात. दक्षिण काशी म्हणूनही कोल्हापूर ओळखले जाते. भगवान दत्तात्रेयांचे भिक्षास्थान म्हणूनही कोल्हापूरचा लौकिक आहे. मंदिरांची नगरी म्हणूनही कोल्हापूर परिचित आहे. त्यातील एक महत्त्वपूर्ण मंदिर म्हणजे महालक्ष्मी मंदिर. जुन्या राजवाड्यापासून हे मंदिर जवळच आहे.

मंदिराचे आवार प्रशस्त आहे. याचे महाद्वार पश्‍चिमाभिमुख आहे. मंदिराचे शिल्पसौंदर्य अप्रतिम आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज आहे. वरच्या एका हातात गदा आहे, एका हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग, तर डाव्या हातात पानपात्र आहे. मातुलिंगालाच महाळुंग म्हणतात. देवीच्या मुकुटावर शिवलिंग आहे. त्यावर नागफणा आहे. देवीचे वाहन सिंह आहे. कपाळी कुंकवाचा मळवट भरलेला आहे. नाकात नथ आहे. गळ्यात रत्नमाला आहे.

पायांत सुवर्णसाखळ्या आहेत. तोडे आहेत. अंगावर भरजरी पैठणी आहे. मंदिराच्या आवारातील शिलालेखावर देवीचे वर्णन केलेले आहे. त्यात म्हटले आहे, की, ‘शुभायास्तु महालक्ष्मीर्भवतां भवतारिणी। बिभ्रती शिरसा लिंगमशेषा घौघहारिणी।।...’ देवी भागवत ग्रंथामध्येही कोल्हापूरचा आणि महालक्ष्मीचा उल्लेख आढळतो. ‘कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदास्थिता।’ असा हा कोल्हापूरचा महिमा आहे. पद्मपुराणातही असाच उल्लेख आहे. करवीर माहात्म्य या संस्कृत ग्रंथातही कोल्हापूरचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे, की करवीर अर्थात कोल्हापूर भागात कोलासुर व त्याचा मुलगा करवीर खूप उन्मत्त झालेले होते. अनेक ऋषिमुनी, संत-माहात्म्यांना त्यांचा त्रास होत होता. अनेकांना त्यांनी छेडले होते. त्यांच्या जाचातून कधी सुटका होते, याची लोक आतुरतेने वाट पाहात होते. त्यांनी देवतेचा धावा केला. भक्तांची हाक देवीने ऐकली. कोलासुर आणि करवीराच्या जाचातून भक्तांना, जनतेला मुक्त करण्यासाठी जगत्‌जननी माता महालक्ष्मी तिथे प्रकट झाली. तिने कोलासुर व करवीराचा वध केला. जनतेला सुखी केले. या राक्षसांच्या नावावरूनच या भागाला कोल्हापूर आणि करवीर अशी नावे पडली. महालक्ष्मीची नित्योपासना पहाटे पाच वाजता सुरू होते. रात्री अकरा वाजता शेजारती होते. शेजारतीच्या वेळची पूजा पहाटे उतरवली जाते. देवीच्या चरणांवर दुग्धाभिषेक केला जातो आणि नित्योपासना सुरू होते. दुग्धाभिषेकानंतर गंध, पुष्प व वस्त्रादी उपचारांनी देवीची पूजा केली जाते.

काकडा आणि कापूर लावून देवीला ओवाळले जाते. शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी मंदिराच्या आवारातून देवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते. चैत्र पौर्णिमेला देवीचा रथोत्सव असतो. महालक्ष्मी मंदिराची उभारणी हेमाडपंती पद्धतीची आहे. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताची किरणे थेट देवीच्या मुखावर पडतात, अशी मंदिराच्या गाभाऱ्याची रचना आहे. मंदिराच्या आवारात अनेक मंदिरे आहेत. एक दीपमाळ आहे. देवीचे करवीर पीठ हे १०८ कलांचे क्षेत्र आहे. त्याला महामातृक असे म्हटले जाते. येथे श्रीविष्णू महालक्ष्मीच्या रूपाने राहिले असे म्हणतात. या क्षेत्राचे माहात्म्य भगवान विष्णूंनीच ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितले. नारदांनी मार्कंडेय आणि अगस्ती या ऋषींना सांगितले.

महालक्ष्मी ही आदिमाता, आदिशक्ती असून, सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यावर नियंत्रण ठेवणारी महाशक्ती आहे. शुक्रवार हा महालक्ष्मीचा प्रमुख दिवस मानला जातो. रात्री देवीची पालखी काढली जाते. चैत्र वद्य प्रतिपदेसही देवीचा रथोत्सव असतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हळदी-कुंकू समारंभ असतो. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना केली जाते, नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. विजया दशमीला सीमोल्लंघन होते. शमीपूजन होते. त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. आश्‍विन पौर्णिमेस महाप्रसाद असतो. महालक्ष्मीची पालखी निघते. कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव केला जातो. रात्री देवीची पालखी निघते. मार्कंडेय पुराणात देवीचे वर्णन आढळते, ते असे, ‘सर्व स्वाद्या महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्‍वरी। लक्ष्मा लक्ष्मस्वरूपा सा व्याप्य कृत्स्नं व्यवस्थिता। भातुलिंग गदां खेटक पान पात्रच विभूती। नाग लिंगच योनिच विभ्रूति नृपमूर्त्रनि। तप्तकांचन वर्णामा तप्त कांचन भूषणा। शून्यं तदखिलं स स्वेन पूरया मास तेजसा।।...’

सारं सारं तिला आठवत होतं. तिने आता श्रेयाची बॅग भरायला घेतली. तिचा एक ड्रेस बॅगेत भरला. खाऊ टाकला आणि श्रेयाला म्हणाली, ‘झोप आता, सकाळी लवकर उठायचंय. आत्यासोबत जायचंना कोल्हापूरला?’ श्रेयाही ‘हो’ म्हणत पप्पांकडे धावत गेली. उद्याचे स्वप्न घेऊन... कोल्हापूरला जाण्याचे.

loading image
go to top