esakal | पद्मावती I Padmavati Devi
sakal

बोलून बातमी शोधा

Padmavati Temple

पद्मावती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘दादा, पद्मावती मंदिर कुठे आहे?’ आळंदीतील वडगाव चौकात पोहोचल्यानंतर चहाच्या टपरीवरील तरुणाला विचारले. हाताने इशारा करत त्याने रस्ता दाखवला आणि म्हणाला, ‘या रस्त्याने सरळ जावा. एक ओढा लागेल. तो संपला की लगेच उजव्या बाजूला मंदिराचे गेट आहे.’ त्याने सांगितलेल्या दिशेने जाऊ लागलो. संध्याकाळ झालेली होती. आज नवरात्रीचा दुसरा दिवस होता. सुटीचा दिवस असल्याने आळंदीला दर्शनाला जायचा विचार केला होता. शेजारच्या आजींना त्याची कल्पना दिली. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, ‘आळंदीला चाललाच आहात, तर पद्मावतीचेही दर्शन घेऊन या!’ त्यानुसार आम्ही पद्मावती मंदिराकडे निघालो होतो. त्यापूर्वी दुपारीच आळंदीत पोहोचलो होतो.

इंद्रायणी नदी घाटावर पाय धुवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिराकडे निघालो. घाटावरून पुढे गेल्यावर पूजा साहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने लागली. दगडांनी बनवलेल्या रस्त्यावरून पुढे जात होतो. दोन-तीन दगडी पायऱ्या चढून गेलो. मंदिराचे महाद्वार दिसले. एका दुकानातून पूजा साहित्य घेतले. महाद्वारातील पायरीचे दर्शन घेतले. समोरच सभामंडप होता. तिथे कीर्तन सुरू होते. दर्शन बारीतून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. समाधीचे दर्शन घेतले. गाभाऱ्यात विठ्ठल-रुख्मिणीची मूर्तीही आहे. बाहेर आलो. पूर्वाभिमूख गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर मुक्ताई मंडपात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिणी संत मुक्ताई मंदिरात दर्शन घेतले. नांदुरकीच्या वृक्षासमोर नतमस्तक झालो. तिथे अनेक साधक ज्ञानेश्वरी पारायण करत होते. तेथील पायऱ्या उतरून पालखीचे दर्शन घेतले. सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालणारे भाविक दिसले. याच सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या मातोश्रींनीसुद्धा प्रदक्षिणा घातल्या होत्या, असे ऐकूण होतो. त्या सुवर्ण पिंपळाचेसुद्धा आज दर्शन झाले होते. त्या बाजूला बसून काही भाविक कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले होते. टाळ-मृदंगाचा गजर कानी पडला. कीर्तनकार महाराज ‘विठ्ठल.., विठ्ठल..., विठ्ठल....’ असे नामस्मरण करत होते. तोच गजर टाळकरीही करत होते. मंदिरातून बाहेर आलो. प्रदक्षिणा मार्गावरील वडगाव चौकात आलो. तेथील एका टपरीवाल्याला विचारून पद्मावती रस्त्याने पद्मावती मंदिराकडे निघालो होतो.

कच्चा रस्ता होता. साधारण एक-दीड किलोमीटर अंतरावर एक ओढा लागला. त्याच्यापासून जवळच पद्मावती देवीच्या मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. ते बंद होते. त्याच्या शेजारील छोट्या लोखंडी दरवाजातून भाविक ये-जा करत होते. आम्हीही गाडी बाजूला उभी केली. लोखंडी दरवजातून आत गेलो. प्रशस्त वातावरण होते. एका बाजूला फुलांची झाडे लावलेली होती. दुसऱ्या बाजूला छोटे उद्यान व लहानमुलांसाठी खेळणी होती. त्या छोट्या रस्त्याने पुढे जात असताना दोन्ही बाजूला पूजा साहित्य विक्रीची छोटी-छोटी दुकाने पथारी टाकून थाटली होती. दर्शनासाठी मोठी रांग होती. त्या दर्शनबारीत उभे राहिलो. आजबाजूचा परिसर खूपच सुंदर होता. बहुतांश शेती होती. पाच-सहा घरे नव्यानेच बांधलेली दिसली. मंदिराच्या परिसरात अनेक कवठाची झाडे होती. कवठ फळांनी झाडे सजली होती. हिरव्यागर्द पानांमध्ये पांढऱ्या रंगाची कवठं उठून दिसत होती. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला.

समोरच्या सभामंडपात वारकरी मंडळी भजनात तल्लीन झाली होती. गाभाऱ्याच्या छोट्या प्रवेशद्वारातून आत गेलो. छोटेसेच मंदिर. पद्मावती मातेची प्रसन्न मूर्ती. घटसथापना केलेली होती. मंदिरात अनेक भाविकांनी नारळाची तोरणे वाहिलेली होती. मंदिराला प्रदक्षिणा घालून एका कवठाच्या झाडाखाली छोट्या पारावर बसलो. एक मुलगा कागदी ग्लास घेऊन आला. त्यात गरम गरम दुध होते. तो म्हणाला, ‘प्रसाद घ्या’. माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला दुधाचा प्रसाद? उत्सुकता वाढली म्हणून दुध तापवत असलेल्या व्यक्तीकडे गेलो. त्यांना दुधाच्या प्रसादाबाबत विचारले. त्यांच्यासारखे आणखी चार-पाच जण दुध तापवून ग्लासात भरून भाविकांना देत होते. ते सर्व स्थानिक शेतकरी होते. ‘दरवर्षी नवरात्रोत्सवात आम्ही प्रसाद म्हणून दुध वाटतो’ असे त्या शेतकऱ्याने सांगितले. प्रसादाचे दुध पिऊन मन तृप्त झाले. शेजारच्या आजींनी सांगितल्याप्रमाणे पद्मावती मातेचे मंदिर व परिसर खूप सुंदर व निसर्गसंपन्न होता.

पण, त्या मंदिरावर कळस नव्हता. उत्सुकता म्हणून त्या दुधवाल्या शेतकऱ्याला विचारले, ‘काका, या मंदिराला कळस का नाही.’ सर्व मंदिर दगडात बांधलेले आहे. शेतकऱ्याने त्याबाबत एक अख्यायिका सांगितली. ते म्हणाले की, खूप वर्षांपूर्वी रानवडे नावाच्या भक्ताला देवीने दृष्टांत दिला की, मी अमूक अमूक ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माझं मंदिर बांध. पण, एका रात्रीत सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून झाले पाहिजे. अन्यथा संकट कोसळले. त्यानुसार, त्या शेतकऱ्याने सूर्यास्तानंतर मंदिर बांधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी ते बांधून पूर्ण करायचे होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मंदिर बांधून तयार झाले. पण, कळसाचे काम राहिले होते. तेव्हापासून मंदिर तसेच आहे कळसाशिवाय. अर्थात पद्मावती मातेच्या मंदिराला कळस नाही. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोर सभामंडप बांधला आहे. दरवर्षी नवरात्रात माऊलींची पालखी मंदिरात येते. भाविकांचीही गर्दी असते. एक नवीन माहिती घेऊन आम्ही मंदिराच्या आवारातून बाहेर पडलो. आळंदी मार्गे घरी येण्यासाठी....!

loading image
go to top