esakal | रेणुकामाता I Renukamata Devi
sakal

बोलून बातमी शोधा

Renukamata Devi

रेणुकामाता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘निशा... कोण आलंय बघ गं... ’ डोअर बेल वाजल्यामुळे किचनमध्ये काम करीत असलेल्या लक्ष्‍मीने निशाला आवाज देऊन सांगितले. निशानेही ‘हो’ म्हणत दरवाजा उघडला. आईची आज्ञा ती कधी खाली पडू देत नाही. आजही तिने त्याचे पालन केले आणि दरवाजा उघडला. समोर शेजारच्या कुलकर्णी आजी होत्या. ‘येऊ का घरात’ म्हणत ते थेट आत आल्या आणि निशाला म्हणाल्या, ‘हा घे प्रसाद. आणि मम्मी कुठे गेली?’ असे विचारले. निशा काही बोलण्याच्या आतच लक्ष्मी हॉलमध्ये आली आणि म्हणाली, ‘काय म्हणताय काकू? कसा झाला प्रवास?’

‘छान झाला. काही त्रास नाही,’ असे उत्तर आजींनी दिले.

लक्ष्‍मीला माहिती होते की, कुलकर्णी मावशी माहूर गडावर गेल्या आहेत. रेणुका मातेच्या दर्शनाला. त्यांच्या मुलीसोबत. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एत शक्तिपीठ असलेला माहूरगड. नांदेड जिल्ह्यातील किलवट तालुक्यातील ठिकाण. देवी रेणुका मातेचे स्थान. रेणुकामाता अनेक घराण्यांची कुलदेवता आहे. या ठिकाणालाच मातापूर असेही म्हटले जाते. जगन्माता रेणुका देवीचे अधिष्ठान म्हणजे मातापूर. पण, कालांतराने मातापूरचा अपभ्रंश झाला आणि माहूर असा शब्दप्रयोग होऊ लागला. तोच आता प्रचलित झाला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगण राज्यांच्या सीमेवर माहूर हे एक छोटेसे गाव वसलेले आहे. या गावाचा भाग डोंगराळ आहे. डोंगराच्या पठारावरच माहूरगाव वसलेले आहे. एक पवित्र तीर्थस्थान असा माहूरचा लौकिक आहे. देवदर्शनाबरोबर अनेक धार्मिक विधी करण्यासाठी भक्तांची येथे नेहमी वर्दळ असते. भगवान दत्तात्रेयांचे शयनस्थानसुद्धा या परिसरात आहे. ऋषिमुनी, साधुसंतांचे तपोस्थान म्हणूनही माहूर परिचित आहे. एक शक्तिस्थान आहे. रेणुकामातेचे शक्तिस्थळ आहे.

माहूरबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. त्यानुसार, रेणुका माता ही इक्ष्वाकु वंशातील रेणुराजाची कन्या होती. जमदग्नी ऋषींची पत्नी. रेणुकामातेला पाच पुत्र होते. त्यातील एक रूमण्वान. दुसरा सुषेण. तिसरा वसू. चौथा विश्‍वावसू आणि पाचवा परशुराम. जमदग्नी ऋषींचे कूळ भृगू होते. नर्मदा नदी तीरावरील माहिष्मती येथील हैहम कुळाशी त्यांचे वैर होते. कारण माहिष्मतीचा राजा सहस्रार्जुन कार्तवीर्य याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमात शिरून त्यांची गाय पळवून नेली होती. त्या वेळी जमदग्नी ऋषींचा पुत्र परशुराम यांचे सहस्रार्जुनाशी युद्ध झाले. परशुरामांनी सहस्रार्जुनाचे हात झाडांच्या फांद्यांप्रमाणे छाटून टाकले. हातातील परशूने त्याचा शिरच्छेद केला. त्याचा बदला घेण्यासाठी सहस्रार्जुनाच्या मुलांनी आणि ...........मंत्र्यांनी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. त्या वेळी जमदग्नी ऋषी ध्यानस्थ बसलेले होते. सहस्रार्जुनाच्या मुलांनी आणि मंत्र्यांनी जमदग्नी ऋषींवर आक्रमण करून २१ घाव घातले. त्यात जमदग्नी ऋषी गतप्राण झाले होते. ते पाहून रेणुका माता आक्रोश करू लागली. परशुरामाला पित्याच्या हत्येबाबत कळाले. परशुराम आश्रमात आले. जमदग्नी ऋषींची झालेली हत्या पाहून परशुरामांना सहस्रार्जुन व त्याच्या हैहम कुळाचीच चीड आली. कारण, सहस्रार्जुन क्षत्रिय होते. पण क्षत्रिय धर्माचे पालन न करता त्याच्या मुलांनी जमदग्नी ऋषींवर हल्ला केला होता. त्यामुळे परशुरामाला संपूर्ण क्षत्रियांचीच चीड आली. परशुरामाने त्वेषाने प्रतिज्ञा केली, की ‘माझ्या असावध, ध्यानस्थ आणि निःशस्त्र पित्याला ठार करणाऱ्यांचा मी संहार करणार आहे. संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करणार आहे.’ रेणुकामाता सती गेली. आई-वडिलांचे उत्तरकार्य उरकले होते. परशुराम आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या तयारीस लागले. त्यांनी आपला परशू परजला. क्षत्रियांवर हल्ला केला. त्यांना ठार केले व प्रतिज्ञा पूर्ण केली. क्षत्रियांना शिक्षा करणारा ‘एकमेव वीर’ आहे. तो जिचा मुलगा आहे, ती रेणुकामाता आहे. एका वीरपुत्राची माता आहे. त्यामुळे तिला रेणुकामातेला एकवीरा नावानेही ओळखले जाते.

कुलकर्णी आजींनी लक्ष्‍मी आणि निशाला प्रसाद दिला. लक्ष्मी म्हणाली, ‘बसा ना काकू, मी चहा ठेवते.’

‘चहा नको बसते थोडावेळे’ म्हणत आजी सोप्यावर बसल्या. लक्ष्मीही त्यांच्याजवळ बसत म्हणाली, ‘कसा झाला प्रवास?’

‘छान झाला’ असे म्हणत काकू सांगू सांगल्या, ‘प्रवास छान झाला. जातानाही आणि येतानाही काही त्रास झाला नाही. पण, मंदिरात अनेक पायऱ्या चढून जावे लागले. मंदिर खूप सुंदर आहे. गाभाऱ्यात मूर्ती नाही, केवळ तांदळा आहे.’

‘केवळ तांदळा, कसं काय?’ लक्ष्मीने आश्चर्याने विचारले. त्यावर आजी म्हणाल्या की, आम्हालाही आधी हाच प्रश्न पडला होता. साधारण, वीस वर्षांपूर्वी मी गेले होते तेव्हा. तेव्हा तेथील एका पुजारी सांगितले होते की, जमदग्नी ऋषी आणि रेणुका मातेचा पुत्र परशुराम यांनी क्षत्रिय संहाराची घोषणा केली. त्यानंतर रेणुकामाता सती गेली. त्यामुळे परशुराम शोकाकूल झाले. त्यांची शोकमग्न अवस्था पाहून भगवान दत्तात्रेय तिथे प्रकट झाले. त्यांनी परशुरामाचे सांत्वन केले. परशुरामाला दत्तात्रेय म्हणाले, ‘शोक आवर, आईची उत्तरक्रिया तू यथासांग पूर्ण कर. तुझी आई तुला परत भेटेन.’ दत्तात्रेयांच्या या शब्दांनी परशुराम शोकातून बाहेर पडले. त्यांनी आईची उत्तरक्रिया सुरू केली. परंतु आईच्या भेटीसाठी अधीर झालेल्या परशुरामांनी सर्व विधी पूर्ण होण्याआधीच आईला आवाहन केले. त्याच्या हाकेला प्रतिसाद देत रेणुका मातेने ‘काय बाळा’ असा प्रतिसाद दिला. तो परशुरामांना ऐकू आला. मात्र, रेणुका मातेचा फक्त शिरोभागच प्रकट झालेला होता. सर्वांग रूप प्रकट झालेच नाही. त्यामुळे माहूरगडावर रेणुका मातेच्या केवळ शिरोभागाचीच म्हणजेच तांदळाचीच पूजा केली जाते. रेणुकामातेच्या मंदिराजवळच महालक्ष्मी आणि तुळजाभवानीचे मंदिरं आहेत.

परशुरामाचंही मंदिर आहे. जवळच एका डोंगरावर दत्तात्रेयांचे मंदिर आहे. रेणुका मातेला विडा, खडीसाखर अथवा मिठाई अर्पण केली जाते. देवीचा प्रसाद म्हणून कुटलेला विडा देण्याची परंपरा तिथे आहे. देवीपुढे अर्पण केलेली खडीसाखर आणि मिठाईसुद्धा प्रसाद म्हणून देण्याची परंपरा आहे. तोच हा प्रसाद आहे.’ आजींचे हे शब्द एकताच लक्ष्मीने मनोभावे देवीचे दर्शन घेतले आणि प्रसाद तोंडात टाकला. तोवर आजींनी ‘येते मी म्हणत’ निरोप घेतला होता. लक्ष्मीनेही खूप थकल्या असतील प्रवास करून. आराम करा आता, असे म्हणत आजींना निरोप दिला आणि त्यांच्यामुळेच रेणुका मातेचा प्रसाद खायला मिळाला, असे मनोमन म्हणत घरातील कामे आवरायला घेतली...

loading image
go to top