esakal | सप्तशृंगी I Saptashrungi Devi
sakal

बोलून बातमी शोधा

saptashrungi Devi Temple

सप्तशृंगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

‘चला, आज आपण श्रीगडावर जाऊन येऊ’ आजीने सांगितले आणि सर्व बच्चे कंपनी आनंदीत झाली. बघता बघता सर्वांनी तयारी केली. दशम्या सोबत घेतल्या. रिक्षा बोलावली. आणि सर्वजण श्रीगडाकडे निघाले. श्रीगड त्याला बोली भाषेत शिरागड असेही म्हणतात. नावात ‘गड’ शब्द असला तरी, वास्तवात गड म्हणजे डोंगर नाही. तापी नदीस मिळणाऱ्या छोट्या छोट्या ओढ्यांमुळे निर्माण झालेल्या घडईच्या शिखरावरचं हे एक मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. अनेक ओढे ओलांडून पायवाटेने जावे लागते. तापी नदीच्या पात्रापासून मंदिरापर्यंत अर्थात गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील कोळन्हावी गावाजवळ हे ठिकाण आहे. त्याला लहानगड असेही म्हणतात. मोठा गड म्हणजे वणीचा सप्तश्रृंगी मातेचा गड. आणि लहान गड म्हणजे शिरागड. सप्तश्रृंगी मातेचे प्रसन्न मंदिर. असं म्हणतात की, सप्तश्रृंगी मातेचे माहेर खान्देश आहे. त्यामुळे अनेक भाविक शिरागडावर सुद्धी मातेच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळेच आजी सर्व नातवंडांना घेऊन आज शिरागडावर आली होती. तापी नदीत हात-पाय धुवून सर्व मंडळी पायऱ्या चढू लागली. अगदी धावतच. ‘कोण पोहोचतो आधी’ म्हणत त्यांच्यात शर्यतच लागली होती.

सर्वजण गडावर आले. तेथून तापी नदीचे विस्तर्ण पात्र दिसत होते. सर्वांनी मातेचे दर्शन घेतले. जवळचे एका झाडाखाली बसले. दशम्या सोडल्या. पोटपूजा सुरू झाली. त्यासोबत गप्पाही रंगल्या. आजी, मातेची महती सांगू लागली, ‘देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ मानले गेले आहे. नाशिक जिल्ह्यात हे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वत रांगांपैकी एका रांगेच्या शिखरावर हे स्थान आहे. तेथील डोंगराला सात शिखरे आहेत. म्हणून त्याला सप्तशृंग असे म्हणतात. त्यावरून देवीला सप्तशृंगी असे म्हणतात. या गडाच्या वा डोंगराच्या पायथ्याशी नांदुरीगाव आहे. येथूनही गडावर जाता येते. शिवाय, या गडाला वणीचा गड असेही म्हणतात. वणी गावाहूनही येथे जाता येते. गडावर पायऱ्या चढून जावे लागते. वाटेत एक गणेश मंदिर व रामतीर्थ नावाचे कुंड आहे. याच मार्गावर शिलालेखही आहेत. त्यातील एक संस्कृतमध्ये आहे. बाकीचे मराठीत आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर दोन शिखरांच्यामध्ये गुहेसारख्या भागात मंदिर दिसते. मंदिरात देवीची विशाल मूर्ती आहे. सप्तशृंगी देवीची मूर्ती सुमारे आठ फूट उंचीची आहे.

देवीच्या सर्वांगाला सिंदूर अर्थात शेंदूर लावलेला असतो. मस्तकावर उंच मुकुट आहे. देवीला अठरा हात म्हणजे भुजा आहेत. प्रत्येक हातात आयुध म्हणजे शस्त्र आहेत. यामध्ये रुद्राक्ष माळ, कुऱ्हाड, गदा, बाण, वज्र, कमल, धनुष्य, जलयंत्र, दंड, शक्ती, तलवार, ढाल, शंख, घंटा, पात्र, शूल, पाश आणि चक्र यांचा समावेश आहे. नाकात चांदीची भलीमोठी नथ आहे. गळ्यात गळसरी आहे. उत्सवांमध्ये अनेक अलंकार देवीला घातले जातात. मूर्तीच्या समोरच एक त्रिशूल रोवलेला आहे. भोवती समया तेवत असतात. चैत्र आणि आश्‍विन पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. खान्देश, गुजरात, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशांच्या ठिकाणांना लागून सप्तशृंगगड असल्यामुळे कुलधर्म, कुळाचार पाळण्यासाठी भाविकांची नेहमी इथे गर्दी असते. सप्तशृंगीमातेच्या मंदिराच्या मार्गावर सरस्वती कुंड, लक्ष्मी कुंड, तांबूलतीर्थ, आंबील तीर्थ, शीतलातीर्थ अशी ठिकाणे आहेत. सिद्धेश्‍वर महादेवाचे हेमाडपंती मंदिर आहे. येथील निरनिराळ्या कुंडात स्नान करून अनेक भक्त देवीला खणानारळाची ओटी वाहतात. खीर-पोळी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि हो, महानुभव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ ग्रंथातसुद्धा सप्तशृंगी देवीचा उल्लेख आढळतो.’

‘महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे शिष्य माहीमभट्ट यांनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ लिहिला आहे,’ मध्येच दहावीत शिकणारी निशा बोलली.

आजी बोलू लागली, ‘अगदी बरोबर, महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांचे शिष्य माहीमभट्ट यांनी ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ लिहिला आहे. आणि हो, सप्तशृंगी देवीचा उल्लेख ज्ञानेश्‍वरीमध्येसुद्धा आहे बरं का! संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी ज्ञानेश्‍वरीच्या १८ व्या अध्यायात म्हटले आहे की,

‘तो मच्छेंद्र सप्तशृंगी। भग्नावया चौरंगी।

भेटला की तो सर्वांगी। संपूर्ण जाला।।’...

म्हणजे वारकरी आणि नाथ संप्रदायातही सप्तशृंगीमातेला आदराचे स्थान दिलेले आहे. सप्तशृंगी देवीचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो. ‘सप्तशती’ ग्रंथात तर देवीने केलेल्या पराक्रमांचे वर्णन आहे. सप्तशृंगी देवीलाच काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, चंडिका, चामुंडा आदी नावांनी संबोधलेले आहे. सप्तशती ग्रंथातील वर्णनानुसार देवीचे माहात्म्य अधोरेखित होते. त्यातील आख्यायिका अशी, की फार पूर्वी महिषासूर नावाचा राक्षस फार उन्मत्त झालेला होता. जनता त्रस्त होती. त्याचा वध करण्यासाठी देवीने उग्ररूप धारण केले. तिच्या अठरा हातांत विविध आयुधे होती. तिच्या भुवया क्रोधाने वक्र झालेल्या होत्या. डोळ्यांत तेज होते. महिषासुराने देवीवर आक्रमण केले. देवीने माहिषासुराचा वध केला. श्रीदेवी भागवतातही सप्तशृंगी देवीचा उल्लेख आढळतो.’

आजीला मध्येच थांबवत निशा म्हणाली, ‘आजी हे सर्व तुला कसं गं माहिती.’

त्यावर तिची आई म्हणाली, ‘अगं, आई टिचर होती ना! तिला सर्व माहिती आहे. अगदी सर्व महाराष्ट्र तोंडपाठ आहे.’

हे शब्द ऐकताच निशा आश्चर्याने म्हणाली, ‘वाव्व, किती छान!’ तितक्यात छोटा रोहन म्हणाला, ‘मम्मी, पाणी...’ त्याच्या या शब्दांनी सर्वांच्या लक्षात आले की, पाण्याच्या बाटल्या रिक्षातच राहिल्या आहेत. आता सर्वांनाच तहान लागली होती. पोटपूजा झाली होती. पण... पाणी कोणाकडेच नव्हते. त्यामुळे सर्वजण रिक्षाकडे जायला निघाले होते. गडावरून उतरू लागले. आजीही म्हणाली, ‘चला आता, घरी जाऊ’ आणि पुन्हा बच्चे कंपनीची शर्यत सुरू झाली. कोण अगोदर रिक्षात जाऊन बसतो आणि पाणी पितो. त्यांच्या मागे आजीही चालू लागली. शिरागडावरील सप्तश्रृंगी मातेचे रूप डोळ्यांमध्ये साठवून....!

loading image
go to top