esakal | अंधेरी गिल्बर्ट हिलची गावदेवी | Navratri Festival
sakal

बोलून बातमी शोधा

Andheri devi temple

अंधेरी गिल्बर्ट हिलची गावदेवी

sakal_logo
By
- कृष्ण जोशी

मुंबई : एकवीरा आई (Ekvira Devi) तू डोंगरावरी... आई कार्ल्याचे डोंगरावर जाऊनी बैसली गो... अशा कित्येक गाण्यांमधून उंच डोंगरांवरील देवळांचे (mountain temples) वर्णन येते. मुंबईनजीक विरारची जीवदानी, मुंब्र्याची मुंब्राई या देवींची देवळे अशीच उंच डोंगरावर आहेत. मुंबईतही अंधेरीत गिल्बर्ट हिल या वैशिष्ट्यपूर्ण टेकडीवर गावदेवी मातेचे देऊळ आहे. अंधेरी स्थानकापासून (Andheri) पश्चिमेला जवळ असलेले हे अत्यंत सुंदर असे धार्मिक पर्यटनस्थळ काहीसे दुर्लक्षितच राहिले आहे. दीडशे पायऱ्यांच्या चढाचे हे देऊळ पाहायला एकदा वर गेल्यावर कोणीही येथे पुन्हापुन्हा येईल, अशी ही जागा आहे. ट्रेकिंग करताना आपला स्टॅमिनादेखील किती आहे, हे येथे नक्कीच आजमावून पाहता येईल.

हेही वाचा: मुंबई : हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी सात ठिकाणी सापळा

गिल्बर्ट नावाचा इंग्रज अधिकारी फार पूर्वी येथे निरीक्षणासाठी येत होता, त्यावरून डोंगराला त्याचे नाव पडले, असे देवळाचे ट्रस्टी सांगतात. देऊळही किमान सव्वाशे वर्षे जुने आहे. मुंबईतील टेकडीवरचे हे दुसरे सुंदर मंदिर असून हार्बर रेल्वेमार्गावरील डॉकयार्ड रोड रेल्वेस्थानकाला लागून असलेल्या टेकडीवरही महादेवाचे आणि गावदेवीचे असेच टुमदार मंदिर आहे. मुंबई शहरातील इतर देवींची मंदिरे काही शतके जुनी आहेत, अंधेरीचे हे देऊळ एवढे प्राचीन नसले, तरी ही देवी ज्या डोंगरावर बसली आहे, तो डोंगर मात्र कोट्यवधी वर्षांचा जुना आणि जगातील एकमेवाद्वितीय असा आहे.

हे मंदिर फक्त ट्रेकिंगसाठी किंवा पर्यटनापुरतेच महत्त्वाचे नाही. ही टेकडी म्हणजे कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या पाषणायुगातील पर्यटनस्थळ आहे. ही टेकडी ऐतिहासिक एवढ्याकरिता आहे, की अशा प्रकारे बनलेली ही जगातील फक्त दुसरी पुरातन टेकडी आहे. जगात अशी आणखी फक्त एकच टेकडी असून ती अमेरिकेत असल्याचे सांगितले जाते. ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन (साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेली) टेकडी पूर्वी पुष्कळ मोठी होती. अगदी मेट्रोमार्गावरील नवरंग चित्रपटगृहापर्यंत, तसेच स्वामी विवेकानंद मार्ग, बर्फीवाला पूल येथपर्यंत त्या टेकडीचे उंचवटे दिसतात.

हेही वाचा: 'मी आजही मुख्यमंत्री', फडणवीसांच्या विधानावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अर्थात कालौघात व शेजारील इमारतींच्या बांधकामासाठी टेकडीची हानीदेखील झाली. झोपड्यांची अतिक्रमणे झाली. टेकडीची जपणूक करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तिला संरक्षित पुरातन वास्तू म्हणून घोषितही करण्यात आले आहे. मात्र टेकडीची जपणूक करण्यासाठी नागरिक, बिल्डर, लोकप्रतिनिधी, प्रशासन आदी सर्वांनीच आपले वैयक्तिक स्वार्थ सोडून इच्छाशक्ती दाखवणे जरुरी आहे.

विशिष्ट वेळीच जाता येते

अंधेरी स्थानकापासून चालायला सुरुवात केली, तर आपण पंधरा मिनिटांत टेकडीवरील देवळात पोहोचतो. देऊळ व टेकडी सकाळी सात ते दुपारी ११ व संध्याकाळी चार ते सात या वेळातच खुले असते.

loading image
go to top