
पैठणला नाथषष्ठीच्या तीनदिवसीय सोहळ्याची उत्साहात सांगता
पैठण : यंदा शासनाने परवानगी दिल्याने तब्बल दोन वर्षांनंतर येथील संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेचा सोहळा वारकरी व भाविकांना पाहायला मिळाला आणि त्यांच्या डोळ्यांची पारणे फेडली. नाथांचे चौदावे वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी सूर्यास्तासमयी नाथांच्या समाधी मंदिरात शुक्रवारी (ता. २५) काला प्रसादाची दहीहंडी फोडली आणि तीनदिवसीय यात्रेचा समारोप केला. यावेळी भाविकांनी नाथांचा जयघोष केला.
गावातील नाथमंदिरातून सायंकाळी नाथांची दिंडी काढण्यात आली. टाळमृदंगाच्या गजरात अभंग, भजन करीत गोदावरीच्या वाळवंटामार्गे गोदाकाठी समाधी मंदिरात ती आली. दिंडी सोहळ्यातील भाविकांनी मंदिरात प्रवेश करताच उत्साहाचे वातावरण संचारले. मंदिरासमोरील प्रांगणात रावसाहेब महाराज गोसावी यांनी दहीहंडीसभोवती असलेल्या भाविकांना हात जोडून अभिवादन केले. सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी दहीहंडी फोडली. यावेळी भाविकांनी नाथांचा जयघोष केला. एकमेकांना काल्याचा प्रसाद दिला.
लाखो भाविक सहभागी
नाथषष्ठीच्या तीनदिवसीय उत्सवासाठी यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी व भाविक दाखल झाले होते. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक नियमित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी यात्राकाळात चोख बंदोबस्त ठेवला.
लाडूसाठी भाविकांत चढाओढ
काल्याची दहीहंडी नाथ मंदिरात फोडली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. दहीहंडीला लावलेले लाह्यांचे लाडू प्रसाद म्हणून आपल्याच हाती कसे लागतील, यासाठी भाविकांत चढाओढ होती.
प्रवेशद्वारासमोर ट्रस्टतर्फे दहीहंडी
नाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून नाथांच्या मंदिरासमोरच नाथषष्ठी यात्रेच्या सांगताप्रसंगी काल्याचे कीर्तन व दहीहंडी फोडण्यात येते. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी करून काढल्याचा प्रसाद घेतला व एकमेकांना प्रसाद वाटप करून आनंद लुटला. यावेळी भुमरे, प्रकाश महाराज बोधले, कार्यकारी विश्वस्त दादा बारे, व्यापारी महासंघाचे शहराध्यक्ष पवन लोहिया आदी उपस्थिती होते.
Web Title: Paithan Nathashthi Three Days Excitement Of The Ceremony
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..