यांचीही दिवाळी गोड व्हावी...!

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह अन् आयुष्य प्रकाशमय करणारा सण. दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय सामाजिक, आर्थिक महत्त्वही तितकेच आहे.
यांचीही दिवाळी गोड व्हावी...!

‘गेल्या दोन वर्षांत दिवाळी सण कोरोनामुळे साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा असर काहीसा कमी झालाय. लोकही उत्साही ‘मूड’मध्ये आहेत. बाजारपेठेत तर पाय ठेवायलाही जागा नाही. कपड्यांची दुकाने गर्दीने फुलून गेलीत. नवीन वाहनांची वेटिंग दिवसेंदिवस वाढतीच आहे. सोन्या-चांदीची दुकाने हाऊसफुल्ल होताहेत. गोड-धोड मिठाईच्या पदार्थांची रेलचेल घरोघरी झालीय. या दिवाळीला अवघा आसमंत दिव्यांनी उजळून निघणार. पण... त्यांचे काय?’

दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह अन् आयुष्य प्रकाशमय करणारा सण. दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व तर आहेच, शिवाय सामाजिक, आर्थिक महत्त्वही तितकेच आहे. गेली दोन वर्षे तशी कोरोनाच्या अंधारातच निघून गेली. सर्व सण-समारंभ थोडक्यातच ‘साजरे’ करावे लागले. नियम अन् अटींमुळे लोक पुरते वैतागून गेले होते. आता कुठे लोकांना दिलासा मिळतोय. एवढ्या मोठ्या महामारीतून आपण सावरत असताना दिवाळी सण आलाय. त्यामुळे हर्षोल्हासाचे वातावरण असणे साहजिकच आहे. पण दिवाळी म्हणजे एकट्याने किंवा एकट्यादुकट्या कुटुंबाने साजरा करायचा सण नाही. तर हा सामाजिक उत्सव आहे. घरोघरी, मनामनांत उत्साह जागविणारा, अवघे जीवन प्रकाशमय करणारा हा सण आहे. म्हणून यंदा या सणाला सामाजिक भान ठेवावेच लागणार आहे. कारण कोरोनाने अनेकांचे दिवाळे निघाले. कुणाच्या नोकऱ्या गेल्या तर कुणाचा रोजगार. कुणी मानसिक खच्चीकरणाने त्रस्त आहे तर कुणी हातावरचे पोट असणारे आहेत. कुणाच्या घरात आजही ‘रेशन’ नाही तर कुणाच्या घरात ‘लक्ष्मी’ दिसेनाशी झालीय. पालावरचं जगणं तर मुख्य प्रवाहातून अगदी तुटून गेल्यासारखेच. वाड्या-वस्त्या, तांडे आजही ‘दिव्यां’च्या प्रतीक्षेतच दिवसरात्र काढताहेत. या सर्वांनाही दिवाळी नाही का?

त्यांचीही दिवाळी साधेपणाने का होईना, साजरी होण्यासाठी सामाजिक जाणीव-जागृतीची यंदा खरी गरज आहे. एक दीप त्यांच्यासाठीही लावूया, ज्यांचे आधारस्तंभ कोरोनाने हिरावून घेतलेत. कुणाचे वडील गेले तर कुणाची आई. कित्येक मुले-मुली तर अनाथच झाले. अशा मुलांच्या जखमांवर हळुवार फुंकर घालण्यासाठी सामाजिक भान नको का? एरवी गरिबांच्या पोरांच्या हातावर एखादा रुपया टेकवायलाही मागे-पुढे बघणारे आपण या दिवाळीला तर मानसिकता बदलूया.

आपल्या मुलांना नवीन कपडे जरूर घ्या, तो त्यांचा आणि तुमचा हक्कच आहे. पण ज्यांच्या डोईवरचे छत अन् आयुष्याचा आधार गेलाय त्यांच्यासाठी जवळचे किमान दोन कपड्यांचे जोड दान करायला काय हरकत आहे? आपल्या घरात फराळाचा घमघमाट दरवळू द्या, पण ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, असे भुकेने आसुसलेले फुटपाथही आजूबाजूला आहेत, याचीही जाणीव ठेवा. आपल्या घासातला एखादा गोड पदार्थाचा घास त्यांच्याही पोटात जाऊ द्या. आपल्या चिमुकल्यांसाठी रंगीबेरंगी, हरित फटाके जरूर आणा; पण पालावरच्या चिमुकल्यांच्या हातात एखादी सुरसुरी तरी दिसू द्या. आपलं स्वप्नातील घर लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघेलच; पण वाड्या-वस्त्या-तांड्यावरही एखादा आशेचा दीप लावायला काय हरकत आहे? शंभर घरांच्या वस्तीत चार-दोन घरांमधला अंधार बरा दिसेल का? म्हणून या दिवाळीला खास बनविण्याची आणि सढळ हाताने गोरगरिबांची मदत करण्याची खरी गरज आहे. शेतमजूर, कामगार, रोजंदारी मजूर यांना सहकार्याचा हात देण्याची हीच खरी वेळ आहे. कोरोनाने मोठा आघात केला तो समाजाच्या तळागाळातील वर्गावर. आधीच हातावर पोट असलेला हा वर्ग कोरोना आणि लॉकडाउनने आधीच

खोलात रुतलाय. कामाच्या प्रतीक्षेत तांडेच्या तांडेच जिकडेतिकडे दिसू लागलेत. दिवसभर कामाच्या शोधात राहूनही त्यांना रिकाम्या हाताने घरी परतण्याचीच वेळ येतेय. मग संसाराचा गाडा चालणार कसा?

त्यांना समाजाच्या सक्षम वर्गाच्या आधाराची गरज आहे. समाज आहे तर आपण आहोत, याची जाणीव ठेवावी लागणार आहे.

कोरोनाने गरिबांचे आयुष्य तर उद्‍ध्वस्त केलेच, शिवाय मध्यमवर्गीयांच्या मनावरही आघात केलेत. हसते-खेळते आयुष्य डोळ्यांदेखत सैरभैर होताना या लोकांनी पाहिलेय. त्यांच्या दुःखाची कल्पनाही करवत नाही. असे हजारो लोक आज मानसिकदृष्ट्या खचून गेलेत. नोकरी, रोजगार हिरावून घेतल्याने खिन्न मनाने आयुष्य जगताहेत. त्यांच्या डोळ्यांसमोरचा अंधार कधी दूर होईल, हा प्रश्‍नच आहे. अशात ज्यांच्या घरातील सदस्य कोरोनाचा बळी ठरला, ते तर अजूनही त्या दुःखातून बाहेर आलेले नाहीत. त्यांना धीर देण्याची आपली सामाजिक जबाबदारी आहे, त्यांच्या समुपदेशनाची आवश्‍यकता आहे. आपल्या कमाईतली कमीत कमी दहा टक्के हिस्सा गरजूंना दान करावा, असे सर्वच धर्म सांगतात. या दिवाळीला ही शिकवण प्रत्यक्षात आणूया अन् ‘त्यांची’ही दिवाळी साजरी व्हावी, यासाठी प्रयत्न करायचा संकल्प करूयात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com