rajarshi shahu maharaj jayanti : लोकमान्य राजर्षी शाहू महाराज आणि वर्तमान

लोककल्याणकारी इतिहास आजच्या लोकशाही राज्यांतसुद्धा थक्क करणारा आहे !
Shahu Maharaj Jayanti 2022 Wishes
Shahu Maharaj Jayanti 2022 Wishessakal

इतिहास आणि ऐतिहासिक साधनं हा केवळ ठेवा, अभ्यास, पर्यटन किंवा चिंतन-मंथनाचा भाग नसून तो मानवी उत्थान आणि कल्याणाचा सूर्योदयी मार्ग आहे ! जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाची पानं चाळून किंवा वाचून जमणार नाही तर वर्तमानात त्याचे मोठ्या जबाबदारीने सिंहावलोकन होणे गरजेचे आहे ! हे लिहिण्याचं कारण म्हणजे भारतीय आरक्षणाचे जनक, जनसामान्याच्या दुःखाची कणव असणारा जाणता राजा, राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचा लोककल्याणकारी इतिहास ! एकोणावीस आणि विसाव्या शतकांच्या संगमावर जन्मलेले शाहू महाराज म्हणजे भारतीय इतिहासाचे सुवर्णाक्षरी पानच ! राजेशाही म्हणजे एकप्रकारची हुकुमशाहीच ! फ्रान्सचा पंधरावा लुई, रशियाचा निकोलस झार किंवा जर्मनीचा अडॉल्फ हिटलर यांच्या हुकुमशाहीचा इतिहास अंगावर काटा आणल्याशिवाय रहात नाही ! दुसरीकडे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या राजेशाहीचा उत्तुंग, लोककल्याणकारी इतिहास आजच्या लोकशाही राज्यांतसुद्धा थक्क करणारा आहे !

जेमतेम अठ्ठेचाळीस वर्ष आयुष लाभलेल्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकुशलतेने अत्यंत कमी कालावधीत राज्यकारभारावर छाप पाडून राजेशाहीत सुधारणा घडवून आणता येतात हे दाखवून दिले. अठराव्या शतकांत युरोपात नव्या बौद्धिक, सुधारणावादी व मानवतावादी चळवळी प्रारंभ होऊन त्याचे पडसाद जगभर उमटायला लागले असतांना छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या राजगादीवर विराजमान झाले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, वृद्धिंगत होत असलेला तार्किक, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि भारतातील होत.

असलेला उच्च शिक्षणाच्या प्रचार-प्रसाराने भारतीय समाजात तार्किक, प्रबोधन आणि परिवर्तन प्रक्रियेची रुजुवात म्हणजेच भारतीय पुनरुज्जीवनाची चळवळ (Indian Renaissance) सुरु झालेली असतांना राजर्षी शाहू महाराजांना योग्य संधी चालून आली आणि मशागत केलेल्या जमिनीवर पेरणी करणे थोडे सुलभ झाले ! पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि मुस्लीम आक्रमकांनी अक्षरशः भारत देश पिळून काढला होता ! दुसरीकडे भारत देश कर्मकांड, चातुर्वर्ण व्यवस्था, जनमानसावर थोतांड धर्माचा पगडा आणि स्पृश-अस्पृशतेने ग्रासलेला असतांना नव्या सामाजिक आणि राजकीय सुधारणा सुरु करणे आणि राबवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा कमी नव्हते ! छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवरायांच्या सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सहिष्णुता या बाबी समोर ठेवून आपले राज्य चालवायचा निर्धार केला ! तत्कालीन समाज अंधश्रध्दा आणि अनिष्ठ प्रथांनी ग्रासलेला असतांना पाश्चात्य शिक्षण आणि पुनरुज्जीवनाच्या चळवळीने भारतात सामाजिक-सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया जोमाने सुरु झाली. ही सकारात्मक बाब तल्लख, बुद्धिमान छत्रपती शाहू महाराजांनी तात्काळ हेरली आणि आपल्या राजेशाहीचा वापर प्रभावीपणे करायला सुरुवात केली.

ऐन तारुण्यात म्हणजेच वयाच्या विसाव्या वर्षी शाहू महाराज छत्रपती झाले आणि राज्यकारभाराने त्यांचे तारुण्य बहरून आले. तारुण्यातच माणूस धाडसी निर्णय घेऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय आणि तोच वसा आणि वारसा छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालवला ! महात्मा ज्योतीराव फुल्यांनी 'विद्येविना मती गेली' सारखी कविता लिहून आणि आपल्या पत्नीलाच शिक्षणाचे धडे देऊन शिक्षित समाजासाठी उभे केलेला ताजा आणि समृद्ध इतिहास शाहू महाराजांनी अवलोकन केला आणि सर्वप्रथम शैक्षणिक सुधारणा करण्यावर भर दिला. माणसाच्या सर्वांगीण उत्थानाचे प्रभावी मध्यम म्हणजेच शिक्षण हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करून एक वेगळा लोकशाहीवादी पायंडा पाडला.

समाज रूढी परंपरांनी ग्रासलेला असतांना स्त्री चूल आणि मुल यामधून बाहेर काढून स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राजाज्ञा काढली. याचा परिणाम असा झाला की; सामान्य लोक शिक्षण घेऊन साक्षर झाले. शिक्षकांना प्रशिक्षण, मागास वर्गास फी माफीची सवलत देऊन आणि विविध ठिकाणी बोर्डिंग-वसतिगृहे सुरु करून सर्वत्र शिक्षणाचा मूलगामी प्रसार सरू करून खऱ्या अर्थाने आपण महात्मा ज्योतीरावांचे पाईक आहोत हे समाजाला दाखवून दिले. अशाप्रकारे सर्वांगीण क्रांतीची मुहूर्तमेढ रोवून नवसुधारणा राबवायला प्रारंभ केला. संपूर्ण बहुजन समाज साक्षर होतांना पाहून शाहू महाराजांनी आपल्या राज्यांत माध्यमिक तसेच उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून सामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्कार्य केले. या निर्णयामुळे काही तथाकथित उच्चशिक्षित लोकांनी छत्रपती शाहू महाराजांवर टीका केली, परंतु त्यांना कोणत्याही टीकेला भिक न घालता आपले कार्य जोमाने सुरु ठेवले. त्यांचे सर्वांत मोठे शैक्षणिक कार्य म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि 'मूकनायक' वृत्तपत्र चालवण्यासाठी विशेष आर्थिक सहकार्य केले.

याचबरोबर त्यांनी आपल्या राज्यांत अनेक क्रांतिकारी आदेश काढून समतेचा आणि बंधुतेचा संदेश दिला. छत्रपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. अनेक सुधारणा चालू असतांनाच प्रचंड दुष्काळ आणि प्लेगच्या साथीने संपूर्ण राज्यांत थैमान घातले असतांना छत्रपती शाहू महाराज तिळभरही डगमगले नाही. त्यांनी तात्काळ दुष्काळी कामे, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने आणि निराधार आश्रम सुरु करून सामान्य-गोरगरीब जनतेला मोठे सहाय्य केले.

कामगारांसाठी आणि शेतकऱ्याचा मालाला भाव मिळावा म्हणून शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल', शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅळग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापन करून क्रांतिकारी सुधारणा घडवून आणल्या. तसेच आपल्या कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सुमारे अठ्ठावीस वर्षे कृतीशील राज्यकारभार चालवतांना स्वातंत्र्य, शिक्षण, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजातील सर्वच घटक सोबत घेऊन चालण्याच्या प्रवृत्तीमुळे अत्यंत कमी काळात छत्रपती शाहू महाराज लोकमान्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज झाले.

आज आपण भारतीय लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे राज्यच प्रभावी वाटायला लागते. सर्वत्र शिक्षणाचा बाजार झाला आहे. जवळजवळ सरकारी शाळा बंदच झाल्यात जमा असून इथल्या व्यवस्थेने शिक्षण प्रचंड महाग करून ठेवले आहे. गोरगरीब लोकांनी शिक्षण घावे की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यकर्ते आज देशातील सर्वच शासकीय आस्थापनांचे खाजगीकरण करण्याच्या तयारीला लागले असून काही दिवसांनी एखादी तरी शासकीय सेवा उपलब्ध राहील की नाही (?) अशी अनामिक भीती वाटायला लागली आहे.

भांडवलशाहीने देशाला विळखा घातला असून सामान्य माणसाचे कुणालाच सोईर-सुतक राहिले नाही. देशाचे राजकारण हे संपूर्णतः बदलत असून देश दुय्यम आणि आपली सत्ता आणि पद प्रथम अशी अवस्था झाली आहे. जर असेच होत राहिले तर एक दिवस संपूर्ण देश हा श्रीमंत-भांडवलदारांच्या दावणीला बांधला जाईल आणि स्वातंत्र्यात पारतंत्र्य (?) अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ शकते. तेंव्हा, चला तर तमाम शासनकर्त्या लोकांना आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी विनम्र आवाहन करूयात की; आपण देश आणि सामान्य माणसांचा विचार करून शासन करा तेंव्हाच खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शाहू महाराजांचे वारस म्हणून ओळखले जावू !

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com