गुढी स्वअस्तित्वाची

हिंदू संस्कृतीनुसार चैत्राचा पहिला दिवस हा ‘गुढी पाडवा’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिति केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो.
Girls Celebration Gudi Padwa
Girls Celebration Gudi PadwaSakal
Summary

हिंदू संस्कृतीनुसार चैत्राचा पहिला दिवस हा ‘गुढी पाडवा’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिति केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो.

- राजश्री बिनायकिया, चिंचवड

जानेवारी-फेब्रुवारी महिना सुरू झाला की झाडांची पानगळ होण्यास सुरुवात होते. आणि पावसाळ्यात हिरवीगार दिसत असलेली झाडी एकदमच रुक्ष दिसू लागतात. सगळीकडे गळलेल्या पानांचा थर पडलेला असतो. या पानगळीनंतर येते ती चैत्राची पालवी. पानगळीमुळे रुक्ष झालेल्या झाडाना पुन्हा हिरवेगार करण्याची प्रक्रिया चैत्र महिन्याच सुरू होते. तोच तोपणाला ब्रेक मिळतो. आयुष्य नवं वाटायला लागतं. ही सुरुवात असते स्वतःच्या अस्तित्वाची, उत्साहाची आणि आनंदाने गुढी उभारायची.

हिंदू संस्कृतीनुसार चैत्राचा पहिला दिवस हा ‘गुढी पाडवा’ म्हणून साजरा करतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिति केली असे म्हटले जाते. त्यामुळे हा दिवस घरोघरी गुढी उभारून साजरा केला जातो. ‘गुढी पाडवा’ हा भारतीय नव वर्षाची सुरुवात असून चैतन्याचा उत्सव आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आनंदाची, नाविन्याची गुढी नक्कीच उभारता येईल. नववर्षानिमित्त नवी आशा, उत्साह, ऊर्जा आपल्या आयुष्यात आणायाची असेल, तर साप कात टाकतो, त्याप्रमाणे जुन्या, नकोश्या वाटणाऱ्या गोष्टींना तिलांजली देऊन चांगल्या आठवणींना सोबत घेऊन पुढे वाटचाल करायची. त्यामुळे आयुष्यातील तोचतोपणाला ब्रेक मिळेल किंवा आयुष्य नवं वाटायला लागेल. म्हणूनच ही सुरुवात आपल्या स्वपःपासूनच करायची. स्वतःच्या अस्तित्वाची. उत्साहाची. आनंदाची गुढी उभारायची. याची सुरुवात नेमकी कशी करायची असा विचार मनात मनात येईल. तर त्यासाठी आधी स्वतःवर प्रेम करा. कारण स्वतःवर प्रेम केले की जग ही आपल्यावर प्रेम करू लागेल. काही दिवसांपूर्वी एक सूंदर सुविचार वाचनात आला. ‘इतरांच्या गुणांची कदर करायला हवी, पण त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा धरू नका किंवा स्वतःला कमी लेखू नका’’. अगदी खरं आहे. दुसऱ्यांचा हेवा करण्यापेक्षा स्वतःला जाणा आणि स्वतःवर प्रेम करा. काही छोट्याछोट्या गोष्टी स्वतःसाठी केल्या तर एक अपूर्व अशा आनंदाशी आपली भेट होईल.

आपण केलेल्या चांगल्या कामासाठी स्वतःचे कौतुक करा. दुसरं कोणी तुमची प्रशंसा करेल, तुमच्या कामाबद्दल शाबासकी देईल, याची वाट बघत बसू नका. स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. स्वतःचा व स्वतःच्या कामाचा सम्मान करा.

सूंदर दिसणं हे अतिशय महत्त्वाचे नसले तरी आपण छान दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण आपल्यातच थोडा बदल केला तर ते नक्कीच शक्य आहे. छान कपडे परिधान करा. त्यामुळे आपली देहबोली नेटकी होते. मेकअप करीत नसाल तर कधीतरी हलकासा मेकअप करा.पार्लरमध्या कधी तरी जात जा. तुम्हालाच तुमच्यात बदल झालेला दिसेल. स्वतःच्य नविन रुपाचं स्वागत करा.

प्रत्येक वेळी जिंकायलाच हवे असे नाही. कधी कधी अपयशाचं देखील स्वागत करा. निराश न होता आपल्यातील चुका, उणिवा जाणून घ्या. त्यावर मात करायला शिका. अन् आपले ध्येय गाठण्यासाठी पुन्हा नव्याने सज्ज व्हा! स्वतःच्याच चुकांवर हसा, पण स्वतःला कमी लेखू नका.

आवडत नसलेल्या गोष्टी, काम कायम करण्यात काही अर्थ नाही. स्वतःमधील अंगभुत गुण, आपली आवड, अंगभूत कलाकौशल्य जाणून घ्या. उदाहरणार्थ ः संगीत, वादन, गायन, चित्रकला, पाककला, खेळ, लेखन, नॄत्य इत्यादी. त्याचा मनापासून जिद्दीनं अभ्यास करा. त्यामधून स्वतःचा व्यवसाय ही आपण निर्माण करू शकतो. आपण स्वतः खास आहोत याची स्वतःला जाणीव करून द्या. त्याच गोष्टी करा, ज्या मधून स्वतःला आनंद मिळेल. समाधान मिळेल. तुमच्यातील कला खुलेल व तुम्ही स्वतः बहराल.

दिवसभराचा बारा-चौदा तासांचा वेळ आणि उठल्यापासून डोळ्यासमोर असलेली कामं यांची सांगड घालता घालता आपण काळाच्या मागे धावतो. कधीतरी कुठतरी थांबावसं वाटतं. पण शक्य होत नाही. उलट अशा वेळेस कामाचा ताण वाढतो. या सर्व धावपळीत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. आरोग्य चांगलं रहावं यासाठी स्वतःला जपा. वेळोवेळी हेल्थ चेकअप करा. वर्षातून एकदा पंचकर्म करा. ध्यानधारणा करा. व्यायाम करा. स्वतःसाठी व आरोग्यसाठी वेळ काढा.

लहान वयात आपण मित्र-मैत्रिणी मोकळे पणाने भेटायचो, बोलायचो, फिरायचो, चेष्टा मस्करी करायचो, त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत असायची. पण काळानुसार सगळं मागं पडत गेलं. वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या वाढल्या. त्यातूनच जुन्या मित्र-मैत्रिणींचा नव्यानं शोध घ्या. गाठी-भेटी ठरवा. त्यांच्या बरोबर सहलीचे नियोजन करा. गेट टू गेदरच्या निमित्तानं एकत्र या. ताणतणाव विसरून एन्जॉय करा. गप्पा टप्पा, मस्ती करा. तसेच कुटुंबासोबत, आप्तस्वकींयासोबत थास वेळ राखून एन्जॉय करा. सुट्टीच्या दिवशी फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच एक नविन ऊर्जा व उत्साह मिळेल.

एखादी गोष्ट शिकण्यासाठी कुठलेही वय नसते. आयुष्यात जेव्हा संधी मिळेल तेव्हा नवीन काही शिकून घ्यावे. त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळेल.

आनंदी असणे ही भावनिक व मानसिक प्रक्रिया आहे. आनंदी राहण्यासाठी मार्ग शोधा. छोट्या छोट्या गोष्टींतून आपण आनंद मिळवू शकतो. आनंद मनात उतरला की चेहऱ्यातून दिसतो. आणि आपलं जगणं ही अधिक सुंदर होतं.

सगळ्या गर्दीपासून एखाद्या एकांत ठिकाणी फक्त स्वतः बरोबर वेळ घालवा. मोबाईल, लॅपटॉप बंद करून आत्मचिंतन करा.

सेवेतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. जेव्हा इतरांसाठी आपण काही करतो म्हणजेच वृद्धांना मदत करणे, अपंगांची सेवा करणे, निसर्गाचे संवर्धन करणे, प्राणीमात्रांवर प्रेम करणे, या सगळ्यांतून आनंद व समाधान मिळून स्वतःचा आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन वाढतो.

नुतन वर्षाच्या प्रकाशासाठी नव्या उत्साहासाठी, नव्या प्रेरणेसाठी आत्मविश्वास बाळगून स्वतःमध्ये बदल करून कुणाच्याही अस्तित्वाला धक्का न देता स्वतःचे अस्तित्व अस्तित्वात ठेवू या! खऱ्या अर्थाने स्व-अस्तित्वाची गुढी उभारू या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com