आर्थिकदृष्ट्या सक्षम खिलार गोशाळा

सांगली शहरातील नीतेश ओझा यांनी अभ्यासू वृत्तीने खिलार गोशाळा उभी केली. दूध हे प्रमुख उत्पन्न न मानता गाईचे शेण आणि गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करून विक्री सुरू केली.
Cow
CowSakal

सांगली शहरातील नीतेश ओझा यांनी अभ्यासू वृत्तीने खिलार गोशाळा उभी केली. दूध हे प्रमुख उत्पन्न न मानता गाईचे शेण आणि गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करून विक्री सुरू केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम गोशाळा करण्यावर त्यांचा भर आहे.

सांगली येथील नीतेश ओझा हे बीई कॉम्प्युटर पदवीधर. २००३ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एका प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर काही वर्षांत पुणे शहरात स्वतःची संगणक व्यवसायातील कंपनी सुरू केली. परंतु शहरातील धावपळीच्या कामामुळे जीवनशैली बदलली. आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणे शक्य होत नसे. पैसे मिळायचे; पण सुख, शांती आणि समाधान नाहीसे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याच काळात म्हणजे २००५ च्या दरम्यान स्वदेशी उत्पादनांचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांच्या विचारांचा प्रभाव ओझा यांच्यावर पडत गेला. त्यातूनच त्यांनी २००७ मध्ये पुणे शहर सोडून सांगली गाठले. विविध लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नोकरी करत देशी गाईंचे संगोपन आणि दूध विक्री व्यवसाय करण्याचे ठरवले. यासाठी घरातून विरोधदेखील झाला, परंतु न डगमगता त्यांनी स्वतंत्रपणे देशी गोपालनाला सुरुवात केली.

खिलार गोपालनाला सुरुवात

नीतेश ओझा यांनी खिलार गाईंचे संगोपन करण्याचे ठरविले. यासाठी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई किंवा कायदेशीर प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या ज्या देशी गाई गोरक्षकांना दिल्या जातात, त्यातील बारा भाकड खिलार गाई नीतेश यांनी सनदशीर मार्गाने खरेदी केल्या. या गाईंच्या संगोपनासाठी जागेची आवश्‍यकता होती. यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव जवळच्या (ता. शिरोळ) डोंगरकडेला चार एकर जमीन १५ वर्षांच्या वार्षिक कराराने एक लाख २० हजार रुपये या दराने भाडेतत्त्वावर घेतली. गाईंसाठी मुक्त संचार आणि बांधीव गोठा तयार केला. दररोज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान गाई डोंगरावर चरायला सोडल्या जातात. सायंकाळी पाच वाजता परत आल्यानंतर त्यांना सकस हिरवा चारा दिला जातो. योग्य आहार व्यवस्थापन आणि औषधोपचार केल्याने सुरुवातीला आणलेल्या १२ गाईंपैकी सात गाई माजावर येऊन गाभण राहिल्या. गेल्या काही वर्षांत जातिवंत गाईंची पैदास गोठ्यात झाली. या दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी भाकड झालेल्या गाई त्यांच्या गोठ्यात देण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या गोठ्यात सुमारे शंभर खिलार गाई आहेत. ‘वेदखिलार गोशाळा व पंचगव्य संशोधन केंद्र’ या नावाने ते आपली गोशाळा चालवितात. सध्या त्यांच्या गोशाळेत जातिवंत खिलार पैदाशीचे काम सुरू आहे. नुकतीच त्यांनी गोठ्यासाठी दोन एकर जागा खरेदी केली आहे.

विविध उत्पादनांची निर्मिती

नीतेश ओझा यांनी खिलार गाई सांभाळण्यास घेतल्या असल्या तरी त्यांची खरेदी-विक्री करून नफा मिळविणे हा मुख्य उद्देश नव्हता. भाकड गाईंची संख्या वाढली तशी शेण व गोमूत्रही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले. त्यातून मग विविध उत्पादनांची निर्मिती सुरू केली. सध्या त्यांच्या गोशाळेत तूप, गोमूत्र अर्क, गोमूत्र सॅनिटायझर, घनवटी (गोळ्या), गोमय भस्म, दंतमंजन, धूपकांडी, गोमय लेप, मच्छर कॉइल, शाम्पू, वेदनाशामक तेल, धूप स्टीक, साबण निर्मिती केली जाते. यासाठी त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले आहे.

विविध राज्यांत प्रशिक्षणासाठी जाण्याचा अनुभव नितीन यांना बाजारपेठ तयार करण्यासाठी उपयोगी पडला. त्यातूनच ग्राहक थेट गोशाळेत येऊन उत्पादनांची खरेदी करतात. विविध देशांतील भारतीय ग्राहक तूप आणि पंचगव्य उत्पादने त्यांच्याकडून खरेदी करतात. गाईंचे संगोपन आणि उत्पादनांचा दर्जा चांगला ठेवल्यास विविध उत्पादनांतून चांगला आर्थिक नफा मिळविता येतो. गाईंची खरेदी-विक्री न करता उपपदार्थ हेच उत्पन्नाचे साधन ठेवले. उत्पादने तयार करताना त्यांच्या दर्जाकडे विशेष लक्ष ठेवले जाते. सध्या त्यांच्याकडे दहा लोक उत्पादन निर्मितीमध्ये कार्यरत आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार सुमारे तीनशे उत्पादने ते तयार करतात. महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतील गोशाळांमध्ये नीतेश ओझा यांनी प्रशिक्षण दिले आहे. इतरांच्या दान दिलेल्या रकमेवर अवलंबून न राहता गोशाळांनी स्वावलंबी व्हावे हा या प्रशिक्षणामागील मुख्य हेतू आहे. गेल्या दहा वर्षांत नीतेश यांनी पश्‍चिम महाराष्ट्रात साडेतीनशे बैलजोड्या आणि अडीच हजार गाईंचे गरजूंना निःशुल्क वाटप केले आहे.

‘गोक्रीट’चे उत्पादन

ओझा यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेण, गोमूत्रापासून विविध उत्पादनांची निर्मिती सुरू केली. गाईच्या शेणापासून गोक्रीट ही एक सामान्य विटेपेक्षा वेगळी वीट बनविली. ही वीट जळत नाही आणि भिजतही नाही. शेणापासून नावीन्यपूर्ण पणत्या आदी वस्तू बनविल्या आहेत, यासदेखील चांगली मागणी आहे.

दर्जेदार तूपनिर्मिती

अलीकडच्या काळात देशी गाईच्या दुधापासून तूपनिर्मिती करण्यावर अनेकांनी भर दिला आहे. आरोग्यदायी घटक म्हणून त्यास ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. नीतेशदेखील तुपाची निर्मिती करतात. सध्या अडीच हजार रुपये प्रति किलो दराने तुपाची विक्री होते. या तुपाचे मूल्यवर्धन करून त्याचे औषधी गुणधर्म वाढविण्यात आले आहेत. यासदेखील बाजारपेठेत चांगला दर मिळतो. जातिवंत दुधाळ खिलार गाईंच्या पैदाशीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

शेणखत, गोमूत्र विक्री

दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी गोमूत्र गोळा केले जाते. गोमूत्र अर्कासाठी ऊर्ध्वपातन प्रक्रिया करताना मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात येतो. वर्षभरात साधारणपणे दहा हजार लिटर गोमूत्रावर प्रक्रिया केली जाते. वर्षभर विविध उत्पादने तयार करण्याचे काम सुरू असते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोमूत्राला चांगली मागणी आहे. सध्या शेतीसाठी लागणारे गोमूत्र ३० रुपये लिटर आणि औषधी उपयोगासाठी गोमूत्र अर्काची सरासरी ३०० रुपये लिटर दराने विक्री केली जाते. ओझा यांनी यातूनही आर्थिक मिळकत वाढविली आहे. शेणखताचे मूल्यवर्धन करून विकले जाते. सरासरी अकराशे रुपये टन दराने मूल्यवर्धित शेणखताची विक्री होते.

(नीतेश ओझा : ९३७३७७३३७१)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com