Ram Navami 2023: रामकथेतून आपले जीवन सुखी कसे करता येईल? l Ram Navami 2023 Dr balaji tambe lord ram spiritual life lesson | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Navami 2023

Ram Navami 2023: रामकथेतून आपले जीवन सुखी कसे करता येईल?

Ram Navami 2023 : दैनंदिन जीवनात रामकथा जगण्याने आपल्याला आपले जीवन सुखी करता येते आणि आध्यात्मिक प्रगती साधून विश्र्वसंकल्पनेत समरस होता येते... ते कसे, याविषयीचे मार्गदर्शन... उद्या (गुरुवार ता. ३०) साजऱ्या होत असलेल्या रामनवमीनिमित्त.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे

श्री रामचंद्रांचा जन्म झाला तो चैत्र शुद्ध नवमीचा दिवस! रामजन्म ही साधीसुधी गोष्ट नाही तर ती एक परमेश्र्वरी योजना आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यापैकी वर्तमानकाळातील सर्व क्रिया ज्या देवतेच्या अधिपत्याखाली चालतात ते साक्षात विष्णूदेव पृथ्वीवर अवतीर्ण झाले तो हा आजचा दिवस! 

श्रीरामांनी जन्म घेतला अयोध्यापती दशरथराजा आणि कौसल्याराणीच्या पोटी. सर्व दहा इंद्रियांवर ताबा ठेवून शरीररूपी रथ व्यवस्थित चालवण्याची क्षमता असणारा तो दशरथ राजा आणि कोणताही ‘सल’, कसलेही ‘शल्य’ नसणारी ती कौसल्याराणी आणि जिथे कोणतेही युद्ध नाही, जिथे राजा आणि प्रजेत, माणूस आणि निसर्गात, अगदी माणसा-माणसातही भांडणाचा किंवा वितुष्टाचा लवलेशही नाही अशी आदर्श नगरी म्हणजे

‘अ-युद्धा’ अर्थात अयोध्या नगरी. अयोध्येतील एकही घर, एकही व्यक्ती दुर्मुखलेली नाही, कशालाही वंचित नाही. अयोद्धेची संपूर्ण रचना, सोयी-सुविधा, कलात्मकता अशा उत्तुंग पातळीवर पोहोचलेली आहे की त्याची तुलना स्वर्गातील अलकानगरीशी करावी लागेल.

क्षणभर कल्पना करू या की अयोध्या हे एक शरीर आहे. या शरीरात सर्व अवयव रेखीव आणि सुंदर आहेत. रस-रक्तादी धातू तसेच चेतासंदेशांच्या वहनासाठी सर्व स्रोतसे भक्कम आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय आहेत, सर्व शरीर संस्था आपापले काम पूर्णत्वाने करत आहेत...तर अशा आदर्श आणि निरोगी शरीरात रामतत्त्व अवतरेल यात आश्र्चर्य ते काय?

रामायण, महाभारत कधी घडले? खरोखर घडले का? यावर चर्चा होत असतात. पण गीतरामायणात गदिमांनी जे म्हटलं, ‘जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरी नूतन, नितरामायण’ हेच सत्य आहे. रामायण ही आपली संस्कृती आहे, आपला इतिहासही आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘राम’ ही आपल्यातली ‘जाणीव’ आहे. रामतत्व हे चराचरात व्यापून राहिलेलं सृजनतत्व आहे.

रामायणाची कथा वाल्मिकी ऋषींनी लिहिली हे खरे, पण वाल्मिकींना जसा राम रामस्मरणातून गवसला, तसाच तो आपल्यालाही अनुभवता यायला हवा. समर्थ श्रीरामदास स्वामी म्हणतात, ‘मुखी राम विश्राम तेथेच आहे’ किती सुंदर कल्पना आहे ही! विश्राम ही मनुष्यमात्राच्या शांतीसाठी, समाधानासाठी आणि नवीन कार्यासाठी नितांत गरजेची अवस्था आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण विश्रामाला पारखे असतो. पण विश्राम म्हणजे आराम नव्हे, आणि म्हणून तो शारीरिकही नाही. तर विश्राम ही एक मानसिक अवस्था आहे.

मुखातला राम अंतःकरणापर्यंत झिरपला की ती प्राप्त होते. पण हे होण्यापूर्वी कदाचित आपणही वाल्या असू शकतो आणि म्हणूनच वाल्याची गोष्ट आजही कालसुसंगत आहे. तसे पाहता आजूबाजूला आपण अनेक वाल्या पाहतो. वाल्या कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी लूटमार करीत होता, माणसे मारीत होता. त्याच्यापाशी ना कौशल्य होते, ना ज्ञान होते.

ज्ञान म्हणजे काय हेही त्याला माहिती नव्हते. मनुष्यमात्राची अवनत अवस्था म्हणजे वाल्या! मनुष्याला प्राणी का म्हणतात या प्रश्र्नाचे उत्तर देणारी भौतिक स्थिती म्हणजे वाल्या! भुकेसाठीचा अविचार म्हणजे वाल्या. वाल्या हा जंगलामध्ये लूटमार करत होता, आज लाच-लुचपत, भ्रष्टाचार, खंडणी या माध्यमातून मार्गा-मार्गावर अनेक वाल्या वाट अडवून बसलेले दिसतात. नारदमुनींच्या म्हणण्यावरून वाल्याने आपल्या चरितार्थाची माहिती कुटुंबियांना दिली पण जेव्हा त्यांनी या दुष्कृत्याचे पाप माथ्यावर घेण्याचे नाकारले तेव्हा मात्र त्याचे डोळे उघडले.

कर्माचा अंधकार असणाऱ्या वाल्याचा ज्ञानाचा प्रकाश दाखवल्याशिवाय उद्धार होणे अशक्य होते पण हा प्रकाश, हे तेज प्राप्त होण्यासाठी नारदमुनींनी त्याला बहाल केला तेजाचा बीज-मंत्र, ‘रं’चा अंतर्भाव असणारे ‘राम-नाम’. नारदाच्या सल्ल्याने प्रभावित झालेल्या वाल्याने एक मात्र केले की जास्त शंका-कुशंका न विचारता आपले आयुष्य सुधारण्याची गरज ओळखून रामस्मरण सुरू केले.

ज्या क्षणी त्याला विध्वंसापेक्षा सृजनशीलता महत्त्वाची वाटू लागली, त्या क्षणी त्याचा ‘वाल्मिकी’ झाला. म्हणून राम हे एक सृजनतत्त्वही आहे. रामनामाच्या साह्याने, रामनामाच्या प्रभावाने दोन टोकात म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत विस्तारलेलं हे जीवन जड आणि चेतन, आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, ‘शरीर’ आणि ‘जाणीव’ म्हणजेच ‘सीता’ आणि ‘राम’ एकत्र आले तरच जीवनाचे सार्थक होऊ शकते. जाणिवेत असलेल्या प्रचंड शक्तीचा विस्फोट किंवा विस्तार होऊन हे विश्र्व अस्तित्वात आले. ब्रह्मदेवाने स्वतःच्या इच्छेने आणि मनाने त्याला आकार दिला.

त्यामुळे विश्र्वात नेहमी एका बाजूने जड आणि दुसऱ्या बाजूने चैतन्य यांचे परस्परांतील परिवर्तनीय रूप पाहावयास मिळते जडाला चैतन्याचा स्पर्श झाला की त्यातून जशी सृजन प्रक्रिया सुरू होते तसेच पाच महाभूतांपासून तयार झालेल्या या विश्र्वपंचायतनाला चैतन्याचा स्पर्श झाला की त्यातून सुरू झालेल्या प्रक्रियेचा प्रवास शुद्ध चैतन्यरूपी नेणिवेकडे चालू राहतो आणि म्हणूनच रामजन्म किंवा रामकथा ही कोणी एकेकाळी किंवा एकदाच घडलेली क्रिया नसून ती एक महासंकल्पना आहे आणि त्यावर आधारलेले सृजनाचे चक्र संतत सुरू आहे.

प्रत्येक अभिव्यक्तीमागे विचार

रामकथेमधल्या प्रत्येक अभिव्यक्तीमागे एक विचार आहे, विशिष्ट संकल्पना आहे. राम ही अंतरात्म्यातली ‘जाणीव’ आहे तर सीता शुद्धशील ‘शरीरा’चे प्रतीक आहे. रामाचे गुरु विश्र्वमित्र हे ज्ञान आणि ज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव स्वरूप आहेत. गूढ ज्ञान आणि तपस्येचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शबरी आहे. जटायू हा मार्गदर्शक, सुग्रीव हा सन्मित्र तर हनुमान हा प्राणस्वरूप आहे. प्राणायामाने व स्वयं अनुशासनाने प्राणरूपी आशीर्वाद आपण मिळवू शकतो.

रामकथेत ज्याप्रमाणे अगोदर लंकादहन, नंतर रावणवध आणि त्यानंतर अग्निपरीक्षा झाल्याशिवाय राम आणि सीतेचे मिलन होऊ शकत नाही त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही पांचभौतिक शरीर आणि जाणीव यांचे मिलन होण्यासाठी शरीरशुद्धीरुपी लंकादहन, अहंकाररूपी रावणाचा वध आणि सरतेशेवटी दुष्प्रवृत्तींचा कोणताही अंश शिल्लक नसण्याची खात्री करण्यासाठी शरीराला द्यावी लागणारी तपस्यारूपी अग्निपरीक्षा झाल्यानंतरच शरीर व जाणिवेचे किंवा शरीर व आत्म्याचे या मिलन होते.

अशा प्रकारे दैनंदिन जीवनात रामकथा जगण्याने आपल्याला आपले जीवन सुखी करता येते आणि आध्यात्मिक प्रगती साधून विश्र्वसंकल्पनेत समरस होता येते. रामनवमीच्या पावन दिवशी रामजन्म साजरा करता करताना  सर्वांना रामकथेमागची महासंकल्पना (मास्टर कंट्रोल प्रोग्राम) समजावी, श्रीराम व सीतामातेची कृपा होऊन स्वस्वरूपाचा आणि आपल्यातील रामस्वरूपाचा बोध व्हावा हीच श्रीरामचरणी प्रार्थना!

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)