Construction of Ayodhya Ram Temple Timeline : कसा बनला विशाल मंदिराचा आराखडा? राममंदिर निर्मितीची रंजक यशोगाथा!

श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मंदिरांचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. ज्या स्थानावर नूतन मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याच स्थानी पूर्वी किमान चार मंदिरे होती. ही वस्तुस्थिती नूतन मंदिराच्या पायासाठी केलेल्या खोदकामाच्या वेळी सापडलेल्या शिलांमुळे स्पष्टपणे निदर्शनास आली.
Significance of Ayodhya Ram Temple
Significance of Ayodhya Ram TempleSakal
Updated on

।। जय श्रीराम ।।

वास्तुनिर्मिती क्षेत्रात सध्या नवनवे उच्चांक व नवनवीन तंत्राचा वापर केला जात असताना श्रीराम जन्मभूमीवरील मंदिर कसे बांधले जावे, बांधकामासाठी कोणते साहित्य वापरावे, मंदिर निर्मितीचा अंदाजे खर्च व अंदाजे कालावधी, या बांधकामासाठी प्रकल्प नियोजन कोणत्या आस्थापनास धावे,

बांधकामाचे कंत्राट कोणास धावे, कोणाकोणाची विशिष्ट बाबींसाठी मदत घ्यावी, निधी संकलन कसे करावे, अशा अनेक पैलूंवर विचार करण्यात आला. एक गोष्ट मात्र प्रकषनि ठरली, की वास्तु भव्य, सुंदर चिरकाल टिकणारी अशी असावी व ४९५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात विस्थापित असलेल्या श्रीरामांना त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्याच दिगंत कीर्तीला साजेसे करावे.

- गिरीश सहस्रभोजनी

श्रीराम जन्मभूमी येथील श्रीराम मंदिरांचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. ज्या स्थानावर नूतन मंदिरात श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याच स्थानी पूर्वी किमान चार मंदिरे होती. ही वस्तुस्थिती नूतन मंदिराच्या पायासाठी केलेल्या खोदकामाच्या वेळी सापडलेल्या शिलांमुळे स्पष्टपणे निदर्शनास आली.

सर्वसाधारण जनतेला १९९२मध्ये घडलेला इतिहास अंशतः ठाऊक असतो, त्याचप्रमाणे वैचारिक दिशाभूल करणारे विद्वान मंदिराऐवजी इस्पितळ किंवा स्वच्छतागृह बांधलेले अधिक उपयोगी असल्याचे सांगतात आणि लोकांचा बुद्धिभेद करतात. सत्य कधी ना कधी प्रकट होतेच होते आणि ते हेच की श्रीराम जन्मभूमी काल्पनिक अवधारणा नसून सत्य त्या इतिहासाचा एक तेजस्वी अध्याय आहे.

आराखडा तयारच होता, मात्र...

साडेसत्तर एकर भूमीतील जवळपास नऊ एकर क्षेत्रफळात निर्धारित नूतन मंदिर व ‘परकोटा’, म्हणजेच प्रदक्षिणा’ यासाठी झालेल्या पायाच्या खोदकामातच प्राचीन हिंदू मंदिरांचे भग्नावशेष सापडावेत, मात्र, उरलेल्या सुमारे साडे एकसष्ट एकरांतील निरनिराळ्या स्थानांवर नियोजित वास्तूंसाठी केलेल्या पायाच्या खोदकामात अपवादात्मक एकही शिळा सापडली नाही, हा निव्वळ योगायोग कोण म्हणेल?

बरे, कमळ, गणपती, मोर, देवकन्या यांसारख्या कोरलेल्या शिळा हिंदू मंदिर दर्शवीत नाहीत का? तात्पर्य हेच, की ज्याला बाबरी मशीद म्हणून प्रसिद्धी मिळाली, ती मुळातच हिंदू मंदिर फोडून उभारलेली एक अत्यंत निकृष्ट प्रतीची अर्धवट वास्तू होती. ही भूमी श्रीरामाची जन्मभूमी असल्यामुळे याच सीमित क्षेत्रफळात विविध ऐतिहासिक काळांत येथे श्रीरामांची मंदिरे बांधली गेली, हे सत्य नूतन मंदिराच्या बांधणीच्या वेळी समोर आले.

श्रीराम जन्मभूमी खटला बरीच वर्षे चालला असला, तरी निकाल सत्याच्याच बाजूने लागणार ही संपूर्ण खात्री असल्यामुळे मंदिराचा आराखडा बनून तयार होता. सीमित अडीच एकर क्षेत्रफळात मावेल अशा प्रकारचा आराखडा सर्वप्रथम बनविण्यात आला. अहमदाबादचे नामांकित मंदिर स्थपती चंद्रकांत सोमपुरांनी ते बनवले.

माननीय अशोकजी सिंघल यांनी त्याला स्वीकृती दिली व बंसीपहारपूर (राजस्थान) येथून व्यापाऱ्यांनी पाठवलेल्या सॅण्डस्टोनवर खांब व अन्य भागांचे नक्षीदार खोदकाम करणे अयोध्येत ‘कारसेवकपुरम’ या ठिकाणी सुरू झाले. त्या आराखड्यानुसार मंदिर आजच्या तुलनेत बरेच लहान, मात्र, टुमदार दर्शवले होते व स्वाभाविकतः त्याचे खांब व तुळयाही आजच्या तुलनेत लहान होत्या.

स्थापना तीर्थक्षेत्र न्यासाची

खरेतर, १९९०च्या दशकात राजकारणात केंद्रस्थानी असणाऱ्या पक्षाची विचारधारा ‘बोटचेपी’ होती, अशा प्रतिकूल वातावरणात खंबीरपणे कार्यरत राहून हळूहळू कार्यशाळेतील कोरीव कामाचे संचालन करणे हे काही ‘वेडे’ लोक करत राहिले व सुंदर नक्षीदारी केलेले मंदिराचे खांब, तुळया व छताच्या लाद्या तयार होत राहिल्या.

मंदिर निर्मितीच्या ठळक शैलींपैकी नागरशैली ही प्रामुख्याने उत्तर भारतीय शैली या मंदिरासाठी नियोजित करणे हे स्वाभाविकच होते. या शैलीत गर्भगृहाचे शिखर सर्वाधिक उंचीचे असून, वास्तूच्या पश्चिमेकडे असते व त्याच्या पूर्वेकडे एक किंवा अधिक सभामंडप हे उतरत्या शिखरांसह असतात. प्रवेशाचे सिंहद्वार पूर्वेकडे असून, सर्वांत कमी उंचीचे असते. मंदिराचा जोता (प्लिंथ) उंच असतो, जो मंदिराची भव्यता दर्शवतो. मंदिरापासून थोडे दूर मंदिराची प्रदक्षिणा दीर्घा (कॉरिडॉर) असते.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ९ नोव्हेंबर २०१९ला रामलल्लाच्या बाजूने लागल्यावर स्पष्ट झाले, की ६७.५ एकर भूमी राममंदिर प्रकल्पासाठी मिळणार, परंतु मंदिर निर्माण कार्य न्यासाद्वारे केले जाणार. ५ फेब्रुवारी २०२० रोजी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’ स्थापित झाले व सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेसह ही भूमी न्यासाकडे (ट्रस्टकडे) सोपवण्यात आली.

आज पूर्णत्वास येत असलेले नूतन मंदिर आता अधिक विस्तृत भूमीवर उभारावयाचे होते, स्वाभाविकतः मंदिराचा आराखडा बदलून भव्य मंदिर बनवण्याचे ठरले.

अशोक सिंघल अनंताच्या यात्रेवर निघून गेले, पण आपल्या कार्याची धुरा त्यांनी चंपतराय बंसल यांच्या सक्षम खांद्यांवर टाकून ताकीद दिली, ‘‘मंदिर पूर्ण होईस्तोवर मी तुला पुढच्या प्रवासावर जाऊ देणार नाही.’’ सोमपुरांकडे चंद्रकांतजी त्यांचे सुपुत्र आशिष व निखिल यांना नूतन भव्य मंदिराचे नागर शैलीतील विस्तृत नकाशे बनवायला सांगितले व स्वतः त्यांना मार्गदर्शन केले.

अशा रीतीने सर्वसंमतीने नूतन मंदिर हे तीन मजली बनवण्याची योजना ठरली. श्रीराम जन्मभूमी न्यासाचे एकूण अठरा सदस्य आहेत, त्यांपैकी चंपतरायांव्यतिरिक्त गोविंददेव गिरीजी हे कोषाध्यक्ष, नृपेंद्र मिश्राजी हे मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख व अन्य साधूसंत व प्रशासकीय अधिकारी आहेत. ही सर्व मंडळी घटनेनी हिंदू असणे अनिवार्य आहे.

त्यामुळे कालांतराने या न्यासाचे स्वरूप ‘विकृत’ होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. या न्यासींपैकी एकही अभियंता/स्थपती नाही, त्यामुळे नृपेंद्र मिश्रा यांनी एक बांधकाम समिती बनवली जिच्यात विविध क्षेत्रांतील अनुभवी, विषयाची जाण असलेले चार अभियंते निवडले, जे पूर्णकालीन सेवेस अयोध्येतच वास्तव्य करतील. प्रस्तुत लेखक त्यांपैकी सिव्हिल स्ट्रक्चरल अभियंता म्हणून जवळपास गेल्या तीन वर्षांपासून सेवारत आहेत.

विशाल मंदिराचा आराखडा

वास्तुनिर्मिती क्षेत्रात सध्या नवनवे उच्चांक व नवनवीन तंत्राचा वापर केला जात असताना श्रीराम जन्मभूमीवरील मंदिर कसे बांधले जावे, बांधकामासाठी कोणते साहित्य वापरावे, मंदिर निर्मितीचा अंदाजे खर्च व अंदाजे कालावधी, या बांधकामासाठी प्रकल्प नियोजन कोणत्या अस्थापनास द्यावे,

बांधकामाचे कंत्राट कोणास द्यावे, कोणाकोणाची विशिष्ट बाबींसाठी मदत घ्यावी, निधी संकलन कसे करावे अशा अनेक पैलूंवर विचार करण्यात आला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने ठरली, की वास्तू भव्य, सुंदर चिरकाल टिकणारी अशी असावी व ४९५ वर्षांच्या प्रदीर्घ काळात विस्थापित असलेल्या श्रीरामांना त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्याच दिगंत कीर्तीला साजेसे पुनर्प्रतिष्ठित करावे.

नूतन विशाल मंदिराचा आराखडा बनून न्यासातर्फे तो संमत झाला. बांधकामाचे कंत्राट ‘एल ॲण्ड टी’ या नामांकित कंपनीला देण्यावर एकमत झाले. यात एक पूर्वेतिहास होता, तो म्हणजे सरत्या अशोकजी सिंघल यांना ‘एल ॲण्ड टी’ते तत्कालीन प्रमुख श्री. नाईक यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात

प्रकल्प नियोजनाचे काम उच्च नीतिमत्ता व व्यापक अनुभवाच्या आधारावर ‘टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स’ यांना देण्यात आले. या दोन्ही आस्थापना माफक नफ्याच्या तत्त्वावर आपापले काम करण्यास नियुक्त केल्या गेल्या.

श्रीराम जन्मभूमी न्यासाने ४५ दिवसांची देशव्यापी मोहीम राबवून अखिल भारतातून नूतन मंदिर निर्मितीसाठी आम जनतेकडून स्वैच्छिक निधी संकलन केला. या प्रकल्पाकडे कोट्यवधी जनता डोळे लावून वाट बघत असल्याचा अनुभव त्यावेळी आला व अर्थातच लवकरात लवकर श्रीरामलल्लांना त्यांच्या नूतन ‘घरात’ प्रतिष्ठित करण्याचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा जनसंकेत मिळाला.

निधिसंकलनात केंद्र वा राज्य सरकारकडून काहीही रक्कम घेतलेली नसून, या प्रकल्पाच्या अवधीवर त्यांचा कुठलाही हक्कही नाही. प्रकल्प समस्त देशवासीयांचा आहे व त्यांनाच शीघ्रातिशीघ्र प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे आहे, हे निदर्शनास आले.

श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या परिसराचे प्राथमिक परीक्षण करून ‘एल ॲण्ड टी’ने पाइल फाउंडेशन करायचे सुचवले, कारण वेळेची व खर्चाची बचत हेच होते. निव्वळ काँक्रिटच्या पाइल्सची विश्‍वासार्हता मुळातच कमी, त्यात भरीस भर म्हणजे पाइल्सची खोली जास्त असल्याने ती अधिकच अनिश्‍चित.

अपेक्षित होते त्यानुसार टेस्ट पाइल्स अयशस्वी ठरल्या व मंदिराच्या पायासंबंधी अधिक ऊहापोह झाला. वास्तुशास्त्रानुसार मंदिर निर्मितीत लोखंड वापर वर्ज्य असल्यामुळे पाइल्सना तांबे किंवा फायबर कार्बन/ग्लास रीनफोर्समेंट म्हणून वापरण्यावरही विचार झाला, परंतु विविध कारणांमुळे तेही बारगळले.

काम मंदिराच्या पायासाठीचे...

‘एन.जी.आर.आय.’ या संस्थेने या सर्व टापूत हवाई अभ्यास केला. जमिनीच्या परीक्षणासाठी विविध जागांचे मातीचे व बोअरचे नमुने, पाण्याचे नमुने, भूमीची घनता, रासायनिक परीक्षण, धारण क्षमता, पाण्याच्या स्तराची खोली इत्यादी अनेक चाचण्याही घेण्यात आल्या.

या सर्व बाबींचा निष्कर्ष निघेस्तोवर जवळजवळ एक वर्षाचा कालावधी लोटला. एक बाब निश्चित झाली, की माती भुसभुशीत असल्यामुळे तिला अधिक ठोस बनवणे आवश्यक होते. जमिनीच्या क्षेत्रफळात व्हायब्रो कॉम्पॅक्शन करणे व स्टोन कॉलम्स जमिनीत रुतवणे याचाही विचार झाला, परंतु त्याबद्दल संपूर्ण हमी देणे शक्य नसल्यामुळे तेही बारगळले.

अखेरीस परंपरागत वापरात आलेली पद्धत, म्हणजे स्प्रेड फाउंडेशन करण्याचा विचार आय. आय. टी. गुवाहाटीच्या डॉ. सीतारामन यांनी सुचवला व तो सर्वसंमत झाला. त्यानुसार जवळ जवळ नऊ एकरांतील जमिनीतील माती पूर्णपणे काढून टाकणे आवश्यक होते. हे काम फार मोठे होते, तसेच अनुमानित वेळ व खर्च खूप अधिक लागणार होता.

श्रीराम कार्यात अडचणी अनेक येतात, पण विजय निश्‍चितच मिळतो या श्रद्धेने खोदकामाला सुरुवात झाली व खरोखरच एक अवाढव्य खाणीसम दिसणारे खोदकाम पुढेपुढे गेले. जमिनीत बारा मीटर खोल खड्डा करण्यात आला व माती तेथून हटवण्यात आली. आता लागणारी माती जरा बऱ्या प्रतीची होती व जमिनीचे परीक्षण करून खोदकाम थांबवण्याचा निर्णय ठरला.

या लेखाच्या द्वितीय परिच्छेदात उल्लेखलेली आहेत, ती किमान चार ऐतिहासिक मंदिरे भग्नावशेष रूपात एकाखाली एक अशी विखुरलेली या खोदकामात मिळाली. हे अवशेष जपून ठेवण्यात आलेले आहेत व कार्बन डेटिंगद्वारे त्यांचा कालावधी आजपासून थेट ३४०० वर्षे पूर्वीपर्यंत जातो. खोदकाम थांबवल्यामुळे अधिक खोलात काय असेल हे ‘चक्षुर्वैसत्यं’ या न्यायाने सांगता येत नाही, पण ३४०० वर्षांपूर्वी एकमेव सनातन हिंदुधर्मच अस्तित्वात होता यावर विद्वानांचे एकमत असावे.

खोदकाम ज्या पातळीवर थांबवणे उचित ठरवले गेले ती भूजल स्तराच्या जेमतेम दीड मीटरवर होती. पूर्ण परिसरातील वाळू येथील मूळची होती व त्यातही काही अभ्रक मिश्रित होते, परंतु शरयू नदीचा गाळ नव्हता.

ही बारीक वाळू ग्राह्य सापेक्ष घनतेच्या आधारावर रोलरने पक्की करण्यात आली व तेथून पुढे हा प्रचंड मोठा खड्डा बांधकामासाठी स्वीकार्य अशा बाहेरील वाळू, खडी, किंचित सिमेंट व फ्लाय ॲशच्या मिश्रणाने बनवलेल्या कमी ताकदीच्या काँक्रिटने भरून काढण्यात आला.

खरे तर हे काँक्रिट मूळ मातीला बदलून अधिक ठोस प्रतीची भरण या तत्त्वानुरूप दिले असून, जमिनीची धारण क्षमता वाढवणे व भूकंपाचे वेळी तेथे दलदल होणे टाळणे या दुहेरी उद्देशाने आय.आय.टी. चेन्नईने सुचवले. अत्यंत सीमित पाणी वापरून बनवलेले हे काँक्रिट दहा टन रोलरने ठोस बनवले असून, पाव मीटर जाडीच्या ४८ थरांनी युक्त असे बारा मीटर जाड आहे. गर्भगृहाच्या भागात खोदकाम अधिक दोन मीटर खोल नेऊन, पंपाद्वारे भूजल काढून विशेष काँक्रिटने भरले.

त्या स्थानी तळाला वास्तुपुरुष स्थापित करून पूजन तसेच देवस्थानाची ब्रह्मनाभ असलेला तांब्याचा पाइप बसवण्यात आला. ब्रह्मनाभ असलेला हा पाइप भूजल स्तरापासून अखंड वर येत रामलल्लांच्या आसनापर्यंत वर आणलेला आहे.

वास्तुशास्रानुसार टाकलेली ब्रह्मनाभ कळसापासून जोडल्यास उत्कृष्ट विद्युत वाहक बनू शकेल, परंतु या मंदिरात २०० मेगा ॲम्पियर्स विद्युत प्रपाताला यशस्वीपणे भूमीत पोहोचवण्याची योजना वेगळीच बनवली आहे, जी भारतात अन्यत्र नाही.

साधारणतः जमिनीच्या मूळ पातळीवर हे रोलर कॉपॅक्टेड काँक्रिट पोहोचण्यापूर्वीच मंदिराच्या उताराच्या पश्चिम दिशेला मातीची धूप थोपवण्याच्या उद्देशाने भक्कम रिटेनिंग वॉलचे काम सुरू केले. श्रीराम जन्मभूमी क्षेत्रापासून केवळ पाचशे मीटर पश्चिमेला शरयू नदीचे पावसाळ्यातील पसरलेले पात्र येऊन पोहोचते.

‘एन.जी.आर.आय.’ने केलेल्या संशोधनातून हे समजले, की सद्य बांधकाम चालले आहे त्याच्या जेमतेम १० मीटर्स जवळून काही सहस्रकांपूर्वी शरयू नदी वाहत असे व कालांतराने ती दूर दूर जात आहे.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : श्री राम प्राणप्रतिष्ठापना निमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाची पर्वणी

यावरून ऐतिहासिक चार मंदिरांच्या ढासळण्याचे एक महत्त्वाचे कारण पायाखालची वाळू वाहून मंदिराचा पाया खचणे हे असणे संभावित धरून आम्ही या रीटेनिंग वॉलचा पाया भूजल स्तराच्या पावसाळी पातळीपेक्षा खालती व उन्हाळी पातळीच्या दीड मीटर वर, म्हणजेच जवळ जवळ अभेद्य बनवला.

आता खालची वाळू खचून जाणे ही शक्यताही उरलेली नाही, कारण खाली रोलर काँपॅक्टेड काँक्रिटचा पाषाण बनलेला आहे. तो पाषाण मंदिरापासून दूर असल्यामुळे तिच्यासाठी लोखंडाच्या सळया व उच्च ताकदीचे सेल्फ कंसोलिडेटिंग काँक्रिट यांचा वापर केला असून, लोखंड गंजू नये ही काळजी घेण्यात आली आहे.

मंदिर परिसरात पावसाचे पाणी झिरपून भूजलात जाऊन मिळेल मात्र, जे पाणी आडवे वाहील त्याचा भिंतीतून बाहेर निचरा होईल. अशा रीतीने या भिंतीचेही आयुष्य पुरेसे दीर्घ असेल. एक शतकानंतर आवश्यकता भासली, तर नवनवीन तंत्र व सामग्री वापरून भावी पिढ्या उचित ती डागडुजी करतील ही अशा अनुचित नसावी.

उच्चदर्जाच्या दगडांचा वापर

मंदिर उभारणीसाठी मात्र कुठेही काँक्रिटचा वा रीनफोर्स्ड काँक्रिटचा वापर जमिनीवर करायचा नाही, हे ठरले. रोलर काँपॅक्टेड काँक्रिटवर प्लेन काँक्रिटचा दीड मीटर जाडीचा थर ५७ तुकड्यांत विभागून टाकण्यात आला.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : बजाओ ढोल स्वागत में... मेरे घर राम आये है! ठिकठिकाणी आज, उद्या शोभायात्रा

मंदिर परिघातील मातीवर भरण टाकून नियोजित पातळीवर ती आणण्यात आली, ज्यामुळे हे ५७ तुकडे पूर्णपणे कायमचे जमिनीखाली राहतील व त्यांचे विघटन होणार नाही. या थरावर कर्नाटक व तेलंगणातून रेल्वे व रस्त्यांद्वारे आणलेले ग्रॅनाइट जातीचे अत्यंत उच्च ताकदीचे,

नगण्य सच्छिद्रतेचे टणक दगडाचे ठोकळे रचून ठेवले गेले. प्रत्येक दगड जवळजवळ २८०० किलो वजनाचा व असे १७,००० दगड एकमेकांस चिकटून योजनाबद्धरीतीने कमीत कमी वेळेत ठेवणे ही मोठी अवघड कामगिरी होती, जी व्हॅक्यूम लिफ्ट या तंत्राने केली नसती तर किमान दोन वर्षे अधिक लागली असती.

सहा मीटर उंचीची ही ग्रॅनाइटची उभारणी पूर्ण होताच मंदिराची खालची जोत्याची पातळी गाठली गेली व तेथून वरची जोत्याची पातळी अधिक उंच दीड मीटर ही मंदिराच्या बाहेरील भिंतींतर्गत उभारली गेली. यासाठी लागणारे खांब व भिंतींचे दगड हे बंसी पहारपूर राजस्थान येथील सॅण्डस्टोन आहेत व त्यांची बैठक दीड मीटर वरच्या जोत्याच्या ग्रॅनाइट दगडात फसवून भक्कम केली आहे.

वरच्या जोत्याच्या ग्रॅनाइट थरावरून विद्युतवाहक कडूट पाइप्स व त्यांतून तारा घालून हे सर्व एक लहान जाडीच्या काँक्रिट थरात पक्के बसवण्यात आले. खांबांवर प्रकाश पडण्यासाठी हे केले.

मंदिराचा यावरील भाग दर्शनार्थ राहणार असल्यामुळे मजबूत, मात्र नक्षीकामास सुकर अशा गुलाबी स्टँडस्टोनमध्ये उभारला जाऊ लागला. हा दगड भरतपूर जिल्ह्यातील बंसीपहारपूर या गावातील खाणींत मिळतो.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : सीतेच्या माहेरची चित्रकला पुण्याहून आयोध्याला रवाना

अनुभवी जिऑलॉजिस्टद्वारे प्रत्येक दगडाचे परीक्षण करून त्यात अंतर्बाह्य तडा गेलेले नसल्याची खात्री करून मगच ते दगड विकत घेतले जात. पिंडवाडा व बयाणा या दोन गावांत त्या दगडांवर नियोजित नक्षीकाम केले जाते व असे तयार दगड त्यांच्या निर्धारित कोड नंबरसह ट्रकमधून अयोध्येत पोहोचतात.

त्यांचे पुन्हा परीक्षण होऊन असे सुयोग्य दगड निर्धारित स्थळी व वेळी गंतव्य जागेवर क्रेनच्या साहाय्याने बसवले जातात. हे दगड एक-एक थर पूर्ण करत करत बसवावे लागतात, त्यामुळे प्रत्येक टप्पा अथ ते इतिपर्यंत न्यावा लागतो व मधील काही टप्पे तूर्त वगळून कार्य पुढे नेता येत नाही व एकदा केलेले काम हे पहिले व अंतिम असेच असते.

यात कुठेही वेळेची बचत करण्यासाठी शॉर्टकट नाही. हे दगड एकमेकांत फसवण्याची पद्धत बऱ्याच अंशी लाकूड कामातील सांधेकारीसारखी दिसत असली, तरी यात लाकूड कामात वापरण्यात येणारे खिळे, स्क्रू,

पाचर, शिरस अशी साधने वापरता येत नसल्याने कामात पराकोटीचा नेटकेपणा असावा लागतो, त्यात चुकांना क्षमा नाहीच. अशा दिव्यातून पार पडत आजमितीस मंदिराचे तळमजल्याचे व पहिल्या मजल्यावरील काम पूर्णत्वास येणे हे फार मोठे यश म्हणावे लागेल. उर्वरित काम येत्या दिवाळीपर्यंत पूर्ण होईल.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : अयोध्या, कश्‍मिरसह पूर्वोत्तरला पर्यटकांची पसंती; भेट देण्याची आज अखेरची संधी

भक्कम मंदिरासाठी...

मंदिराची फरशी मक्राणा राजस्थान येथील धवल संगमरवरी लाद्यांची असून, त्यात विविध रंगाच्या संगमरवरी दगडांचे भरतकाम केले आहे. खांबांच्या तळाशी व छताच्या कपारींतून (COVE) पिवळसर प्रकाश सोडल्यावर सायंकाळी मंदिर वेगळ्याच रूपात मनमोहक भासते.

मंदिराच्या गृहमंडपाच्या चारही दिशांना प्रत्येकी तीन दरवाजे आहेत व त्यावर सुंदर नक्षीकाम असून, सागवानी लाकडावर सोने चढवले आहे. चंद्रपूरच्या आलापल्ली व बल्लारशाहचे हे लाकूड सर्वोत्तम श्रेणीचे असून, ‘सीझन्ड’ व कीडरोधक असल्यामुळे हे सुंदर दरवाजेही शतकानुशतके टिकतील.

गर्भगृहात भिंतींवर व छताच्या घुमटीसाठी कोरीव काम केलेला सुंदर धवल संगमरवरी दगड व मध्यभागी स्वर्णजडित कमलासनावर श्रीरामलल्ला बघताच डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अनमोल क्षणांची शिदोरी गाठीला बांधून निघावे लागेल, कारण देशविदेशातून येणाऱ्या असंख्य भक्तांचा ओघ दिवसाला किमान एक लाखांचा असेल.

श्रीराम मंदिरात १६६+१३६+९० असे तीन मजल्यांवर एकूण ३९२ खांब आहेत, ज्यांवर देव, देवी, देवकन्या यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. हे काम सुमारे एक वर्ष पुढे चालत राहील. मंदिर पूर्व-पश्चिम ११६ मीटर, उत्तर-दक्षिण ७६ मीटर व ४९ मीटर उंच असून प्रखर भूकंपातही १००० ते २५०० वर्षे सुरक्षित असेल, पुढे शिवशंभूंची इच्छा!

मंदिराचे क्षेत्रफळ खालच्या जोत्याशी ५६५० चौरस मीटर व वरच्या जोत्याशी २६५० चौ. मीटर असून, एका वेळेस वरील जोत्यावर ६०० भक्तगण उभे राहू शकतील. मंदिराभोवती आयताकृती परकोटा (प्रदक्षिणा दीर्घा) असेल,

ज्याचे पूर्वेकडील प्रवेशद्वार भव्य आहे. परकोटा १७८ बाय १४१ मीटर आहे, म्हणजे एक प्रदक्षिणा ६३८ मीटरची असून त्या मार्गावर एकूण सहा उपमंदिरे असतील, जी भगवान सूर्यनारायण, शिव, गजानन, हनुमान, माता भगवती व अन्नपूर्णा यांची असतील.

परकोट्याच्या पूर्वेकडील व दक्षिणेकडील भागात तळघर मार्ग असेल, जेथून सुरक्षाविषयक यंत्रणा, प्रसाद व्यवस्था, व्यवस्थापन कक्ष व दर्शनार्थींची निकास दीर्घा असेल. हे सर्व काम सुरू असून, सुमारे वर्षभर चालेल. परकोट्याची बाहेरील भिंत रामायणातील प्रसंग पंचधातूवर कोरलेल्या चौकटींनी युक्त असेल.

Significance of Ayodhya Ram Temple
Ayodhya Ram Mandir : देशभरातील संत, महंतांचा जमलाय ‘कुंभमेळा’

परकोटा सुमारे ४.३ मीटर रुंद व ३.३ मीटर उंच असून मंदिरासारख्याच सॅण्डस्टोननी बनलेला असेल. परकोटा अर्थातच रिटेनिंग वॉलच्या आत असेल व त्यातील उपमंदिराची शिखरे मुख्य मंदिरापेक्षा सुमारे ३० मीटर खालील असतील. त्यांत कोठेही पूजा, अभिषेक नसेल व करण्याची योजना नाही.

श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाने मूळ ६७.५ एकर भूमीव्यतिरिक्त आवश्यक असलेली अधिक तीन एकर शेजारील जमीन खरेदी केली, जेणे करून मंदिराभोवतालचा अग्निशमन वाहन पथ शक्य व्हावा. सर्वदूर जमीन व्यवहारात सर्रासपणे चालणारा ‘गोरा और काला’ व्यवहार येथेही झालाच असणार अशा धारणेने काही प्रसिद्धी माध्यमे घोंगावू लागली, पण रामकार्यात सर्वच व्यवहार अगदी पारदर्शक असल्याचे बघून निमूटपणे निघून गेली.

या सत्तर एकरात मंदिराची जागा सोडल्यास अन्य स्थानांचे विकसन जवळ जवळ होत आले आहे. मंदिराच्या दक्षिणेला वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती, वाल्मीकी निशादराज गुह्य, अहिल्या व शबरी या श्रीरामांच्या समकालीन पूजनीय महात्म्यांची एकूण सात लहान मंदिरे असतील. त्यापुढे ‘कुबेर टिला’ या उंचवट्यावर चढत्या पाऊलवाटेवर जटायूचा पंचधातूचा भव्य पुतळा दिसेल व सर्वांत वरती आदि महादेवांची पुरातन पिंड दिसेल. आजूबाजूला वनराई व वाल्मिकी रामायणात उद्‍घृत वृक्षांची लागवड करणे सुरू आहे.

यात्री सुविधा केंद्र, बॅगेज स्कॅनिंग सेंटर, चाचपणी कक्ष, अग्निशमन टाक्या व कचेरी, जनसुविधा कक्ष (स्वच्छतागृहे), पाणी शुद्धीकरण विभाग, मैलाशुद्धीकरण यंत्रणा, घनकचरा वर्गीकरण व खतनिर्मिती, वीज आवक व वाटप केंद्र, उपकेंद्रे, बागबगिचासाठी सिंचन व्यवस्था, न्यास कचेरी, महनीय व्यक्ती विश्राम कक्ष, विविधोपयोगी कक्ष, पुष्करणी अशा अनेक सुविधा वेगाने उभ्या राहत आहेत. सुमारे तीन महिन्यांनंतर बहुतांशी काम पूर्ण होणार असले, तरी आजही त्यातील अत्यावश्यक काम पूर्ण झालेले आहे.

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठेची काय गरज होती, त्याचा २०२४ निवडणुकीशी संबंध नाही का, असे प्रश्न काही लोक विचारतात. ९ नोव्हेंबर २०१९ला सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देण्याऐवजी जर तो काही वर्षे पूर्वीच दिला असता तर एव्हाना मंदिर जुनेही झाले असते व निवडणुकीशी कोणीच संबंध जोडला नसता, पण निकाल येण्यापूर्वी मंदिर बांधणे शक्य होते का? निकालानंतरच वेगाने हालचाल सुरू झाली व मंदिराचे तळमजल्याचे काम पूर्ण करून श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा या प्रकल्पाचा एक टप्पा होता, जो आम्ही साध्य केला, एवढेच. यात कोणाला पोटशूळ उठल्यास त्यांनाही लवकर त्यातून स्वास्थ्य लाभो एवढीच सदिच्छा!

एक स्वप्नपूर्तीचा क्षण आला आहे. आम्ही आनंदात आहोत, तुम्हीही आनंदात आहात, सारा देश आनंदात आहे. श्रीरामलल्ला त्यांच्या जन्मस्थानी पुन्हा एकदा विराजत आहेत. जगभर या वार्तेनी भारताविषयी जिज्ञासा, कौतुक होत असून, सनातन संस्कृतीचा डंका वाजत आहे.

जय श्रीराम, भारत माता की जय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com