तरुणाईचा उत्साह... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Youth Celebration Gudi Padwa

चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण गुढीपाडवा. मावळ तालुक्यात साधेपणाने साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे.

तरुणाईचा उत्साह...

चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा होणारा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण गुढीपाडवा. मावळ तालुक्यात साधेपणाने साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याला इव्हेंटचे स्वरूप आले आहे. इव्हेंटमध्ये तरुणाई आणि महिलांचा सहभाग वाखणण्यासारखा आहे. पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या आणि बाईकवरून रॅली काढीत मराठी नववर्षाचे स्वागत करणारी तरुण पिढी पहायला मिळतेय.

गुढीपाडव्याचे पौराणिक महत्त्व जपत जुन्या पिढीने हा सण साजरा केला. दारापुढे गुढी उभारून तिला चाफ्याच्या फुलांची माळ चढवली. सडा-रांगोळी काढून गोडधोड नैवेद्य केला. उन्हाळ्याची दाहकता कमी व्हावी म्हणून कडुलिंबाची पाने आणि गुळाच्या मिश्रणाला प्रसादाचे नाव देऊन खाल्ला की पाडव्याचा सण झाला, असे काहीसे स्वरूप पाडव्याच्या बाबतीत खेडोपाडी असायचे. ते स्वरूप बदलले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर नव्याने एखादी वस्तू खरेदी केली. व्यवसायाची सुरुवात केली. काळ आणि वेळ बदलतोय. परंपरा जपत गुढीपाडव्याला आता गावोगावी इव्हेंटचे स्वरूप आले आहे. पारंपरिक वेषभूषा करून महिला, पुरुष आणि आजची तरुणाई पाडव्याच्या सणाचा आनंद लुटत आहे.

घरोघरी थाटामाटात मानाने गुढी उभारली जाते. पौराणिक कथेचा आणि ऐतिहासिक घटनांचा समन्वय साधत दारापुढे गुढी आणि घरावर भगवे ध्वज लावले जात आहेत. सडा-रांगोळीने गावे सजत आहेत. गुढीपाडव्यापासून कित्येक गावात अखंड हरिनाम सप्ताह्याचा गजर होतो. ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचा गजर आहे. त्या गावात काल्याच्या कीर्तनाने सांगता झाल्यावर आणि दिंडी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी गुढी उभारली जाते. सुंदर वस्त्राने सजवलेली ही गुढी सात दिवस जपण्याचे काम गावकरी करीत आहेत.

गुढीपाडव्याला गावोगावी अखंड हरिनाम गजर चालू असतानाच काही गावात महिलांचा लोकप्रिय असलेल्या ‘होम मिनिस्टर’सारख्या कार्यक्रमांनी धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने सण समारंभांचे इव्हेंट घडवून आणण्यासाठी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची टीम अ‍ॅक्टिव्ह झालेली दिसते. शक्तिप्रदर्शन करणाऱ्या ‘सांस्कृतिक रॅली’ काढून सर्वांना सहभागी करून घेतले जात आहे. त्यात मागील दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. सण समारंभ धूमधडाक्यात साजरे करताना मर्यादा येत होत्या. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पहिलाच मराठी बाणा असलेल्या नववर्षाचे स्वागत हटके करायला तरुण पिढी सरसावली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात. महिला, पुरुष, मुले पारंपरिक पोशाखात मिरवणुकीत सहभागी होतात. गुढीला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद, कुंकू, फुले, वाहून, अक्षता वाहून गुढी उतरण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्यापासून अक्षयतृतियापर्यंत यात्रा-जत्रेचा मोठा हंगाम सुरू होतो. या हंगामाची पायाभरणी गुढीपाडव्याला होते. गावोगावचे अर्थकारण यात्राजत्रेशी सबंधित असल्याने गुढीपाडव्यापासून यात्रेची सुगी अनुभवायला मिळते. हायटेक जमान्यात आपल्या परंपरेचा अभिमान बाळगणारी आजची पिढी. इव्हेंटला सोशल मीडियावरून तितक्याच थाटामाटात सातासमुद्रापार पोहचण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह आहे. मराठी बाणा झोकात दाखवणारी, पारंपारिक वेषभूषा परिधान केलेली, थाटामाटात साजरा केलेल्या गुढी पाडव्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करीत धुमाकूळ घालत आहे.

Web Title: Ramdas Wadekar Writes Enthusiasm Of Youth Gudi Padwa Hindu New Year 2022 Celebration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top