सज्जनशक्तीची गुढी

गुढीपाडवा म्हणजे नवनिर्मितीच्या आरंभाचा दिवस! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते, यात अनेक गोष्टी येतात.
Gudi Padwa
Gudi PadwaSakal
Summary

गुढीपाडवा म्हणजे नवनिर्मितीच्या आरंभाचा दिवस! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते, यात अनेक गोष्टी येतात.

- सचिन जहागीरदार

गुढीपाडवा म्हणजे नवनिर्मितीच्या आरंभाचा दिवस! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरुवात करायची असते, यात अनेक गोष्टी येतात. गुढीपाडवा हा ऋतूंवरून प्रचारात आलेला आपला सण आहे. त्याचबरोबर त्याला धार्मिक अधिष्ठानाबरोबर पर्यावरणाचा संदर्भही आहे.

अधर्माची अवधी तोडीं।

दोषांचीं लिहिलीं फाडीं।

सज्जनांकरवीं गुढी।

सुखाची उभवीं॥

ज्ञानेश्वरी ४.५२

अर्थ : संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंत अवतार धारण करतात तेव्हा ते समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून, नाना प्रकारच्या दोषांचे निराकरण करून सज्जन व्यक्तींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची गुढी उभारतात.

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, स्वस्तिश्रीमन्नृप शालिवाहन शके १९४४ म्हणजेच आपला गुढीपाडवा. आपल्या संस्कृतीनुसार प्रत्येक वर्षाला एक नाव असते. या नवीन संवत्सराचे नाव आहे ‘शुभकृत’. नावाप्रमाणेच सर्वत्र शुभ करणारे हे वर्ष एका नवीन उत्साहाची पहाट घेऊन आपल्या जीवनात आले आहे. त्याचे आपण आनंदाने, सकारात्मकतेने स्वागत करू या.

धार्मिक परंपरा

प्राचीन धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मदेवांनी याच तिथीला सृष्टीची निर्मिती केली होती. त्यामुळेच या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणतात. पुढे त्रेतायुगामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांनी तामसी रावणाचा वध करून अयोध्येमध्ये प्रवेश केला तोदेखील चैत्र शुद्ध प्रतिपदेला. त्या मंगलमय दिवशी समस्त अयोध्यावासायांनी गुढ्या उभारून प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत केले. प्रभू रामचंद्रांशी संबंधित आणखी एक संदर्भ म्हणजे रामनवमीचे नवरात्र याच तिथीला सुरू होते. सम्राट विक्रमादित्य यांनी विक्रम संवत् याच तिथीला सुरू केला. तसेच सम्राट शालिवाहन यांनी सुरू केलेल्या शालिवाहन शकाचा आरंभदेखील याच तिथीला होतो. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक शुभ मुहूर्त आहे. अशा अनेक मंगलमय क्षणांची साक्षीदार असलेली ही तिथी म्हणजे भारतीय संस्कृतीची विजय पताकाच आहे.

सांस्कृतिक महत्त्व

संपूर्ण भारतामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाते. चैत्र महिन्यामध्ये संपूर्ण देशभर विविध नावांनी, विविध प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत करणारे सण उत्साहात साजरे केले जातात. पंजाबमध्ये या सणाला बैसाखी असे म्हणतात, तर आंध्र प्रदेशात उगादी साजरा केला जातो. दक्षिण भारतामध्ये पोंगल, विशू या सणांच्या निमित्ताने उत्साही वातावरण असते. सिंधी बांधवांचा चेटीचंड उत्सवदेखील याच कालावधीत असतो. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवरेह या नावाने नवीन वर्षाचे स्वागत करणारा सण साजरा करतात. चैत्र शुक्ल प्रतिपदेला देवतांचे पूजन, देवदर्शन, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे, नातेवाईक मित्रपरिवाराला शुभेच्छा देणे, पौष्टिक आणि रुचकर अशा पारंपरिक खाद्यपदार्थांचे सेवन करणे अशा अनेक प्रकारे हा संपूर्ण दिवस साजरा केला जातो. एकूणच आपल्या देशाची सांस्कृतिक समृद्धी, त्याची एकरसता यांचे दर्शन घडवणारे हे मंगलमय पर्व असते.

नववर्षाचे स्वागत

महाराष्ट्रामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या काळातले वातावरण अत्यंत प्रसन्न असते. वृक्षवेलींना नुकतीच चैत्रपालवी फुटलेली असते. ती ताजी टवटवीत हिरवाई मनाला एक वेगळाच आनंद देते. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी गुढी उभारली जाते. गुढीमध्ये वस्त्र, गडू (छोटा तांब्या), वेताची काठी / बांबू इत्यादी साहित्याचा समावेश असतो. गुढीला साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार घातला जातो. तसेच कडुलिंबाची डहाळी बांधली जाते. ही गुढी घरावर उभी करण्यात येते. सर्व कुटुंबीय गुढीचे मनोभावे पूजन करून नवीन वर्षाचे स्वागत करतात. नवीन वर्ष सुख, समृद्धी, आरोग्य घेऊन यावे अशी गुढीला प्रार्थना करतात. कडुलिंबाची कोवळी पाने, गूळ इत्यादी पदार्थांचा वापर करून तयार केलेला आरोग्यदायी प्रसाद सर्वांना वाटण्यात येतो. एकूणच आपल्या जीवनात गोडवा आणणारा असा हा सण आहे.

गुढीपाडव्याचा संदेश

गुढी म्हणजे विजयपताका आहे. विजयी वीरांचे स्वागत गुढ्या उभारून करतात. उजेडाचा अंधारावर विजय, चांगल्याचा वाईटावर विजय, धर्माचा अधर्मावर विजय असा संदेश देणारी ही गुढी असते. आज आपल्या घरावर दिमाखाने उभारलेल्या गुढीकडे पाहून मनात कोणते विचार येतात? मी व्यक्ती म्हणून, समाज म्हणून कशावर विजय मिळवू इच्छितो? कोणत्या नकारात्मक प्रवृत्तींचे निर्दालन करण्याची माझी जबाबदारी आहे? यावर प्रत्येकाने चिंतन आणि कृती करणे गरजेचे आहे. आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षणी नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत आणि सीमांच्या सुरक्षेपासून ते पर्यावरणापर्यंत सर्वच क्षेत्रांत मोठे बदल होत आहेत. समाजातील सज्जनांनी सक्रिय होऊन या बदलांना सामोरे गेले पाहिजे. सज्जनशक्तीच्या बळावर या बदलांना एक विधायक वळण दिले पाहिजे.

या पार्श्वभूमीवर समाजातील सजग नागरिक म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढते. सज्जनांनी आपल्या ‘मी’पणाच्या संकुचित सीमारेषा ओलांडून समाजामध्ये सतत काहीतरी सकारात्मक घडेल यासाठी कार्यरत होणे आवश्यक आहे. अनेक क्षेत्रांमध्ये गुणवान, अनुभवी व्यक्तींची कमतरता आहे. त्यामुळे तिथे अपेक्षित ते परिवर्तन घडून येत नाही. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. एखादे नावीन्यपूर्ण, लोकोपयोगी संशोधन होत नाही. साहित्य, संगीत, कला या समाजजीवनाच्या अनेक काही ठोस घडून त्याचा समाजाला उपयोग झाल्याचे चित्र क्वचित दिसते. परिणामी नकारात्मकतेचे एक मळभ दाटून येते. सज्जन व्यक्ती निष्क्रिय झाल्या की नकारात्मक प्रवृत्तींचे फावते. हा निष्क्रियतेचा दुष्काळ कधी संपणार? सर्वांच्या जीवनात सुखाची गुढी कोण उभी करणार? सर्वांना सुखी करणे हे ईश्वरी कार्य आहे आणि सज्जनच हे कार्य करू शकतात. ज्या क्षणी आपण आपल्यातले चैतन्य जागृत करून सर्वांसाठी त्याचा विनियोग करू त्याच क्षणी हे मळभ हटेल. सर्वत्र चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. व्यक्ती आणि समाजाला एक नवीन सकारात्मक दिशा मिळेल.

आजही अशी उदाहरणे आहेत. वयाची पंचविशी न गाठलेला नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवतो. ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे देशी बियाणे आणि शाश्वत शेतीचे पुनरुज्जीवन करतात. वयाची शंभरी गाठलेल्या कर्नाटकातील थिमक्का आज्जी गेली अनेक दशके वृक्षसंवर्धनासाठी आपले आयुष्य वेचतात. या आणि अशा अनेक ज्ञात-अज्ञात सज्जनांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ‘सुखाच्या गुढ्या’ उभारल्या आहेत. आपल्या आजूबाजूलादेखील अशी कामे करणारे असंख्य लोक असतात. ही सज्जनशक्ती हीच कोणत्याही राष्ट्राची, समाजाची खरी ठेव असते. त्याच्या बळावरच राष्ट्राची प्रगती होते. ही सज्जनशक्ती आणखी संघटित आणि बलशाली झाली पाहिजे. त्यासाठी सज्जनांनी सक्रिय होणे अत्यावश्यक आहे. सज्जनांनी नकारात्मक प्रवृत्तींचे निर्दालन करून सर्वांच्या जीवनात सुखाची गुढी उभारावी, त्यासाठी कार्यरत व्हावे हाच या गुढीपाडव्याचा संदेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com