

- सरिता सुधाकर उपासे, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षिका
सर्वच प्राणिमात्रात समूहानं राहण्याची, एकत्र जगण्याची मूलभूत प्रेरणा असते. मग मनुष्य प्राणी तरी त्याला कसा अपवाद ठरेल? म्हणूनच मनुष्य प्राणी हा सामाजिक प्राणी आहे, असे म्हटलं जातं. तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. अन् याच समाजशिल वृत्तीमुळे सामाजिक व कौटुंबिक स्तरावर अनेक नातेसंबंध निर्माण होतात. हे नातेसंबंध जपण्याची त्याच्या मनाची स्वाभाविक ओढ असते. ही नाती अनेकरंगी, अनेकपदरी असतात आणि त्यामुळेच मणूष्याचं भावविश्व समृध्द होत जातं. नातेसंबंध ही संकल्पना तशी मानवनिर्मितच. जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत नाती ही आपल्यासमोर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटत असतात.
संशोधनामधून हे सिद्ध झालं आहे की, नाती निर्माण करणं हे जीवनाच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नात्यामुळे जीवनाला अर्थ मिळतो. नाती म्हणजे खरंतर निखळ आनंदाचा झरा! ती जीवनातील शुष्क उन्हाळ्यात प्रेमाची ओल जशी देतात तशीच गारठवणाऱ्या हिवाळ्यात उबही देतात. या नातेसंबंधाचा मूलभूत आधार आहे. विवाहसंस्था. आधुनिक जगात आज ‘लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल प्रचंड आकर्षण आहे. पण, तरीही समर्पण भावाच्या तत्त्वावर उभ्या असलेल्या विवाहसंस्थेचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. या विवाहसंस्थेमुळे नातेसंबंधाचा विस्तार होतो. पती- पत्नी, आई- मूल, सासू- सून, आजी- आजोबा, नणंद- भावजय, अशी कितीतरी जिवाभावाची नाती, सुख - दुःख देणारी नाती निर्माण होतात. काही नाती जन्माबरोबर आपोआप मिळतात, तर काही विवाहसंस्थेमुळे मिळतात. त्याचबरोबर इतरही काही नाती आपण निवडून- पारखून स्वीकारतो, जसं मैत्रीच नातं. ही सर्वच नाती जीवन सुंदर बनवतात. आपसांत प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, मोकळेपणा निर्माण करतात.
अडचणी व संकटाच्या समयी नाती ही भक्कम आधारवड ठरतात. तर मनावर कुठलंही दडपण असताना मनावरच ओझं दूर करण्याचं ते एक हक्काचं ठिकाण बनतात. अडचणींच्या समयी नाती आधार बनतात म्हणून त्यांची आठवण केवळ आपण अडचणीत सापडल्यानंतरच करायची नसते. कारण, जीवन संथपणे चाललेले असतानाही या नात्यांचा रोल महत्त्वाचा असतोच. कारण, अशा वेळी ही नाती आपलं जीवन समृध्द करत असतात. म्हणजे नाती ही आपल्यासाठी दुसरा प्राणवायू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नात्यांचा आपल्या रोजच्या जीवनावर खूप विधायक परिणाम होत असतो. एकमेकांना बघितल्यावर, भेटल्यावर मुद्दाम प्रयत्न न करता आपल्या चेहऱ्यावर जर प्रसन्नता निर्माण होत असेल तर ते नातं आपल्यासाठी एक आरोग्यवर्धक नातं ठरतं. आणि आपल्या कपाळावर आटी निर्माण होत असेल तर त्या नात्यावर उपचार करण्याची वेळ आली आहे, असे समजावे लागेल. आणखीन काही नाती आदर्शावर आधारलेली असतात. (उदाहरणार्थ गुरू- शिष्याच नातं. या नात्याच्या मुळाशी आदरभाव असतो.) काही मानलेली नातीसुद्धा आपलं भावविश्व समृध्द करत असतात. अशा प्रकारे मानवी नातेसंबंध अनेक प्रकारच्या नात्याच्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्र आहे. प्रत्येक नात्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं.
काही नात्यांना तर काहीच नाव नसतं पण ही सगळीच नाती अमूल्य असतात. प्रत्येक नातं आपल्याला काही ना काही देवून समृद्ध करत असतं. यातील सर्वात मोठं देणं म्हणजे आठवणी आणि आपलं जीवन म्हणजे तरी काय? या सर्व आठवणींची शिदोरीच ना? म्हणूनच नाती म्हणजे जीवनाच्या पुस्तकातील मोरपीस असं म्हटलं जातं. पण, नाती जशी सुंदर असतात तशीच ती नाजूकही असतात. वर्षानुवर्षे दुरावा असूनही मनात जपून ठेवलेली नाती अगदी एखाद्याही अप्रिय शब्दाने काचेसारखी खळकन फुटून जातात, तुटून जातात. म्हणूनच नात्यांना खूप जपावं लागतं. नाहीतर ती अशी विस्कटतात की कधीच सावरता येणार नाहीत. सगळीच नाती टिकवायला हवीत. आणि ती टिकविण्यासाठी गरज आहे. विश्वासाची, परस्पर आपुलकीची, नाती जुळवायला खूप उशीर लागतो. पण, ती तुटायला एखादा बेसावध क्षणही पुरेसा आहे. तो नेमका क्षण ओळखून लागलीच त्याला एखादा पर्यायी क्षण शोधता आला तर नाती कायमसाठी टिकू शकतात. अगदी जगाच्या अंतापर्यंत सुद्धा.
नाती फक्त दिल्या- घेतल्याने टिकतात असे नाही तर ती आपल्या वागण्या- बोलण्यानेही टिकतात. पण, नाती ही कायमची सांभाळायची असतात. कुरकूर व्हायला लागली तर त्याला स्नेहाच वंगण घालायचं असतं. तुटेपर्यंत ताणायच नसतं आणि अगदी सैलही सोडायचं नसतं. आज काळाच्या ओघात, जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेत, आभासी व सुखवस्तू जीवनाच्या ओढीमुळे, परस्पर संवादाच्या अभावामुळे माणूस एकाकी होत चालला आहे. केवळ ग्रीनकार्ड मिळविण्यासाठी सुद्धा काही लग्न जुळवली जातात. अन् एकदा का ते मिळालं की पुन्हा घटस्फोट घेतला जातो. विवाहसंस्थेची, नातेसंबंधाची केवढी ही क्रूर घट्टा ! नाती म्हणजे दोन हृदयातील अदृश्य पूल ! आई- मुलाचं नातं निर्माण व्हायला अगोदर नाळ कापावी लागते. त्याअगोदर ते दोघंही एकच असतात. स्वतंत्र अस्तित्व दिलं की, नातं निर्माण झालं. म्हणजे एकरूपता असतानाही एकमेकांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं की नातं निर्माण होतं. म्हणजेच दोन व्यक्ती वेगळ्या असल्या तरी त्या दोघांना सांधणारा एक दुवा असतो. कधी तो प्रेमाचा असतो तर कधी सहकार्याचा, सहवेदनेचा. या दुव्यालाच आपण नातं म्हणतो. काही लोक पैशाच्या बळावर नाती निर्माण करतात. आणि पैशाच्या निकशावरच नात्या- नात्यांमध्ये तुलनासुद्धा करतात. जिकडे पैसा जास्त तिकडे माप झुकतं दिलं जातं. अशा नात्यांचा आणि हृदयाचा काहीएक संबंध नसतो.
दोन व्यक्तींना जोडणाऱ्या नात्यात मोठेपणाचा आव, श्रीमंतीचा बडेजाव आणि उपकाराची भाषा कधीच नसावी. नात्यातील एका व्यक्तीकडून अशा गोष्टी घडत असतील तर ते न दुसऱ्याला ओझं वाटायला लागतं. नात्यात दुभंगलेपणा आला की, तो लवकर सांधने अवघडच. मानवी संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्त्व आहे. परंतु, प्रगत मानवात संस्कृतीसोबतच काही विकृतीही निर्माण झाल्या आहेत. या विकृतीचा पहिला परिणाम जिवाभावाच्या प्रेमाच्या, आपुलकीच्या नातेसंबंधावर झाला आहे. मानवाला या नात्यांचा विसर पडत चालला आहे. अतिलोभ, आसक्ती, अहंकार, क्रोध, अलिप्तता या विखारी भावनांनी नातेसंबंधातील ओलावा रूक्ष करून टाकला आहे. माणूस वरचेवर अधिक बुद्धिवान होत चालला आहे. परंतु, या बुद्धीचा वापर विवेक आणि प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी न होता अतिमहत्वाकांक्षा आणि अविवेकासाठी होत आहे. अतिरेकी महत्वाकांक्षा, परवेश आणि स्वार्थ या भावनांमुळे मानवाला नाती म्हणजे बंधने वाटत आहेत.
आजच्या यूज अँड थ्रोच्या संस्कृतीत नात्यांकडेही त्याच दृष्टिकोनातून बघितले जाते. त्यामुळे आज कोणतंही नातं दीर्घकाळ टिकवणं तसं अवघडच बनलं आहे. आणि एखादं नातं तसं तुटलं तरी फारसं वाईट वाटून घेतलं जात नाही, आजकाल. यानंतर येणाऱ्या पिढ्या ‘नातं म्हणजे काय’? हे विचारायलाही कमी करणार नाहीत, अशी भीती वाटते. कारण, ‘पेराल तेच उगवेल’ हा निसर्गाचाच नियम आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध व्हायला हवं.
नाती टिकवणं ही एकतर्फी गोष्ट नाही तर त्याला दोन्हीकडूनही प्रतिसाद हवा असतो. यासाठी हवा असतो विश्वास, आपुलकी आणि आत्मीयता. नात्याचे बंध निर्माण करताना त्याचा एक धागा वा विश्वासाचा आणि दुसरा प्रेमाचा. कारण, विश्वासच नसेल तर सभोवताली नात्यांचा गराडा असूनही एकटं- एकटं वाटायला लागतं. आणि नाती टिकविण्यासाठी काही पथ्यही पाळावी लागतात. एक म्हणजे, अवास्तव अपेक्षांना फाटा द्यायला हवा आणि दुसरं म्हणजे अधिकाराऐवजी प्रेमाची भाषा वापरायला शिकलं पाहिजे. एकूणच जीवनात नातेसंबंध अतिशय आवश्यक आहेत. ते जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायलाच हवेत.
आपण आपल्याच मनाशी आपल्याशी निगडित नातेसंबंधाची उजळणी करून बघूया! काही नाती आणखीनही शाबूत असतील तर त्यांना आणखीन कसं दृढ करता येईल, याचा विचार करायला हवा. यासाठी कसलाही मुहूर्त बघण्याची गरज नाही. येणारा क्षणच शुभमुहूर्त ! नातेसंबंधाची दीपमाला अखंड प्रज्वलित ठेवूया! नाती जपूया!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.