आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगांत न्हाऊन आली...

दिवाळी हा सण भारताची सामाजिक व धार्मिक परंपरा जपण्याची उत्तम संधी असलेला उत्सव आहे. या उत्सवाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. पण सामाजिक महत्त्वही तितकेच महत्त्वाचे आहे.
आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगांत न्हाऊन आली...

- सायली संजय कुलकर्णी, अंबाजोगाई

आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगांत न्हाऊन आली... हे गाणं ऐकलं तरी आपल्या अंगात उत्साहाचं उधाण येतं. अगदी प्रसन्न वाटतं. मग खरीखुरी दिवाळी आल्यावर तर बघायलाच नको. सर्वांचा लाडका उत्सव म्हणजेच दिवाळी. दिवाळी मनामनांची, मनातील किल्मिषे, गैरसमज दूर करणारी... दिवाळी सणांची राणी. एकमेकांना भेटून मैत्र वाढवणारी... दिवाळी संस्कृती जपणारी. संस्कार वाढवणारी... आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणारी... दिवाळी हिंदूधर्मीयांचा सर्वांत मोठा उत्सव. भारतातच नव्हे तर आता परदेशीही आपले लोक हा सण अगदी उत्साहाने साजरा करतात.

दिवाळी हा सण भारताची सामाजिक व धार्मिक परंपरा जपण्याची उत्तम संधी असलेला उत्सव आहे. या उत्सवाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. पण सामाजिक महत्त्वही तितकेच महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या दिवसांत आपण आपले नातेवाईक, मित्र परिवार, आप्तेष्ट सगळ्यांची भेट घेत असतो. या सगळ्यांसोबत हा सण अगदी उत्साहाने साजरा होतो. फराळाची पंगत रंगते. अनेक कार्यक्रम योजले जातात. या सगळ्यांतून सामाजिक एकोपा टिकविण्यास मदत होते. धार्मिक आणि सामाजिक सोबतच कौटुंबिक महत्त्व असलेला हा उत्सव आहे. दिवाळीच्या या सहा दिवसांत कुटुंबातील सगळेच एकत्र येतात. गप्पागोष्टी रंगतात. फराळाची देवाणघेवाण होते. एकत्रित खरेदी होते. खूप उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण घरात असतं. सगळे सोबत राहिल्यामुळे एकमेकांबद्दल प्रेमभाव वाढीस लागण्यास मदत होते. सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आलेलं असतं. प्रत्येकजण आपापल्या परीने घरातल्या कामांना मदत करीत असतो. त्यामुळे दिवाळी हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा सण मानला जातो.

साधारणतः सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात हा उत्सव येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. कोजागरी पौर्णिमा झाली की आकाशकंदील लावले जातात आणि या दिव्याच्या प्रकाशाने अंगण आणि सगळा घराचा परिसर उजळून जातो. तसेच या दिवसांत वेगवेगळ्या पणत्या, आकर्षक रांगोळ्या, विद्युत रोषणाई, फुलांनी घराची व परिसराची सजावट केली जाते. दिवाळीचा उत्सव सहा दिवसांचा असतो. प्रथमतः वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या पद्धतीने हा सण साजरा होतो. तिथीनुसार दिवाळीचे दिवस कमी-जास्त होऊ शकतात; पण आपण याच क्रमाने दिवाळी साजरी करतो.

वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी गायीची पूजा करतात. भारत देश हा कृषिप्रधान असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गायीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा करतात. यादिवशी धन्वंतरीचे पूजनही करतात. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून सुवासिक उटणे लावून सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. प्रचलित कथेनुसार या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले होते. आपल्या मनातील नरकरूपी विचारांचे, भावनांचे पहाटे मर्दन करून आपल्यामध्ये सकारात्मक चांगली पावन ज्योत प्रकाशित व्हावी हा या मागचा विचार.

त्यानंतरचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून ही पूजा करतात. बत्तासे व लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. वहीपूजनही होते. त्याचबरोबर रांगोळ्या, दिव्यांची आरास केली जाते.

पाचवा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. म्हणजेच दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो. अशात सगळीकडेच दिवाळी पहाट पाडव्याचा कार्यक्रम सुद्धा खूप छान पद्धतीने आयोजित केला जातो. बरेचजण हा दिवस नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा करतात. या दिवशी पत्नी पतीला व मुलाला ओवाळते. त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. सगळ्यात शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊदेखील बहिणीला काहीतरी भेटवस्तू देत असतो. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. यशवंत पाटणे, आपल्या ‘सुंदर जगण्यासाठी’ या पुस्तकात म्हणतात, आपली भारतीय संस्कृती आपल्याला संदेश देते ‘तमसो मा ज्योतिर्गमय.’ अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाणे. अविवेकापासून विवेकाकडे जाणे. हे विवेकाकडे जाणे म्हणजेच स्वतःचं आनंदी विश्व उभारणे. आपण म्हणाल, तसा सर्व सुखी असा कोण आहे? पण प्राप्त परिस्थितीत सुख शोधता येते. आनंदी होता येते.

कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात,

‘या बसा...

रडणं तर नेहमीचंच,

थोडं तरी हसा.

अंधाराचा आसरा थोडावेळ विसरा

काळजामध्ये जपा उजेडाचा वसा’...

दिवाळीच्या निमित्तानं हा उजेडाचा वसा जपला जातो. उत्सव, सण हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. ते मानवी जीवनात चैतन्य निर्माण करतात. मंडळी अशा या मांगल्याची प्रसन्न पहाट मनाच्या गाभाऱ्यात उजाडायची असेल तर तेथे सद्विचारांचे धूप आणि विवेकाचे दीप उजळले पाहिजेत. संत ज्ञानदेव सांगतात,

मी अविवेकाची काजळी।

फेडूनी विवेक दीप उजळी।

ते योगिया पाहे दिवाळी। निरंतर।।

अविवेकाची, अविचारांची काजळी दूर केली तरच आयुष्यात निरंतर अशी दिवाळी उजाडेल. यासाठी गरज आहे ती स्वयंसंस्कारांची. मांगल्याच्या उपासनेची, अविचारांच्या उच्चाटनाची. यातूनच मग साकारतं जीवनाचं सुंदर लेणं. एकंदरीतच सगळ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करून आयुष्य लख्ख प्रकाशाने उजळवून टाकणारा उत्सव म्हणजेच दिवाळी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com